Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नॉर्मल ‘पांढरं’ जातंय ! अंगावरुन पांढरं जाणं हा आजार असतो की नसतोच?

नॉर्मल ‘पांढरं’ जातंय ! अंगावरुन पांढरं जाणं हा आजार असतो की नसतोच?

प्रदर याचा अर्थ अंगावरून पांढरे जाणे. काही पेशंटच्या भाषेत ‘व्हाईट ब्लीडिंग’! हा आजार आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 04:11 PM2021-10-05T16:11:49+5:302021-10-05T16:29:35+5:30

प्रदर याचा अर्थ अंगावरून पांढरे जाणे. काही पेशंटच्या भाषेत ‘व्हाईट ब्लीडिंग’! हा आजार आहे की नाही?

white discharge-women is it normal or disease? | नॉर्मल ‘पांढरं’ जातंय ! अंगावरुन पांढरं जाणं हा आजार असतो की नसतोच?

नॉर्मल ‘पांढरं’ जातंय ! अंगावरुन पांढरं जाणं हा आजार असतो की नसतोच?

Highlightsआजकाल काही बायकांना अति स्वच्छतेची बाधा होते.

डॉ. शंतनू अभ्यंकर

पांढरे जाणे ही तर कितीतरी कॉमन तक्रार. इतकी कॉमन की पेशंटला विचारलं,
‘अंगावरून पांढरे जाते आहे का?’
तर, कधी कधी उत्तर येतं, ‘नॉर्मल जातंय !’
पण, असं उत्तर आलं की, मला फायनल इअरच्या अभ्यासाची आठवण होते. एमडीची परीक्षा जवळ आली होती. अभ्यासाची धामधूम सुरू होती. आणि अशातच एके दिवशी माझ्यावर केस प्रेझेंटेशनची वेळ आली. केस प्रेझेंटेशन म्हणजे, एखाद्या पेशंटची सगळी माहिती, तपासणी, असं सगळं सरांच्या समोर मांडायचं आणि विचारतील त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. ही परीक्षेची रंगीत तालीम.
जी पेशंट सरांनी तपासायला सांगितली त्या बाईंना विशेष काही म्हणजे काहीच होत नव्हतं. अंगावरून पांढरं जातंय, ‘नॉर्मल जातंय’, एवढीच त्यांची तक्रार होती. तपासणीतही अब्नॉर्मल म्हणावं असं काहीही आढळलं नाही. अर्थात विशेष काहीच आजार नसलेली पेशंट एमडीच्या तयारीसाठी कोण कशाला तपासायला सांगेल? असाच विचार माझ्या मनात थैमान घालू लागला आणि आपल्या लक्षात न आलेला काहीतरी दोष असणारच असं समजून, मी अनेकदा, अगदी सखोल, तपासणी केली. पण, व्यर्थ. खरोखरच विशेष काहीही आढळलं नाही.

मी परीक्षेला सज्ज झालो. अपेक्षेप्रमाणे आमचं गाडं अंगावरून पांढरे जातंय या पहिल्याच वळणावर अडकलं. सरांनी मला अंगावरून पांढरे जाण्याची कारणं वगैरे विचारायला सुरुवात केली. मी धडाधड सांगितली. त्यातलं या पेशंटला कोणतं लागू आहे ते विचारलं. मी कोणतंही नाही असं सांगितलं. मग, सरांनी पुढील तपासण्या कोणत्या ते विचारलं. मी सांगितलं अमुक तपासणी. सर म्हणाले, ती नॉर्मल आली तर? मी सांगितलं तमुक तपासणी. सर म्हणाले, ती नॉर्मल आली तर? हा अमुकतमुकचा खेळ काही वेळ चालला. मग तपासण्या वगैरेवर सखोल चर्चा झाली. पण, सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत असं सर सांगत राहिले. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत होती. पण, सगळंच नॉर्मल म्हटल्यावर, आता ‘पेशंटला सांगणार काय आणि औषध काय देणार?’ ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र येत नव्हतं.
मी अगदी वरमलो. मला दरदरून घाम फुटला. सरांनी पुन्हा तोच प्रश्न केला. शेवटी जीवाचा धडा करून मी उत्तर दिलंच; ‘तुम्हाला काहीही होत नाहीये. हा प्रकार नॉर्मल आहे. तुम्हाला औषधाची गरज नाही, असं सांगीन!’
सरांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटलं. ‘मग हे बोलायला इतका का रे वेळ लावलास?’
‘सर, अमुक आजार आहे, असं सांगणं सोपं आहे; पण तुम्हाला काहीही आजार नाही हे सांगणं अवघड.’
‘छान ! हे तर ब्रम्हवाक्य समजायला हरकत नाही. झालास तू एमडी !!’ प्रसन्न होत्साते सरांनी आशीर्वाद दिला.

अंगावरून पांढरं जातंय आणि नॉर्मल जातंय, म्हणजे तक्रार करावी असे नाही. हे खरंच आहे. नॉर्मली सुद्धा अंगावरून जात असतं. निसर्गत: योनीमार्ग किंचित ओलसर राखला जातो. ह्या स्त्रावाबरोबर तिथल्या मृत पेशी बाहेर पडतात. पाळीच्या चक्रानुसार हा स्त्राव किंचित बदलतो.
पाळीच्या अलीकडे पलीकडे एखाद दोन दिवस पांढरट स्त्राव जातो. हे नॉर्मल आहे. दोन पाळ्यांच्या मधल्या दिवशी, साधारण स्त्रीबीज निर्मितीच्या आसपास, पाण्यासारखा पातळ स्त्राव जातो किंवा थेंबभर लाल जातं. हे नॉर्मल आहे. गरोदरपणी तिथला रक्त पुरवठा वाढल्याने एकूणात स्त्राव वाढतो आणि ओलेपणा जाणवतो. हे नॉर्मल आहे. ह्याला काहीही उपचार लागत नाही. करून काही उपयोगही नाही. शरीराचे ‘नॉर्मल टेंपरेचर’ कमी करण्यासाठी औषधोपचार घेणे हास्यास्पद आहे. तसंच हे. साधारण स्त्रावाबरोबर वेदना, कंबरदुखी, खाज, दुर्गंधी, पुरळ अथवा जळजळ असं काही नसेल तर ‘नॉर्मल जातंय’ असं समजायला हरकत नाही. पण, सोबत वरील काही तक्रारी असतील तर, तपास आणि उपचार लागू शकतात.
हे जे ‘नॉर्मल’ जातं ना, ते म्हणजे निसर्गत: आसरा दिलेले ‘आरोग्य-जंतू’ (Commensals) तिथे सुखेनैव वास करून आहेत याचं निदर्शक आहे. नॉर्मली आपल्या अंगप्रत्यंगावर कोट्यवधी जंतू वास करून असतात. कातडी, आतडी, तोंड, डोळे, मूत्रमार्ग, योनीमार्ग अशी सगळीकडे त्यांची वस्ती असते. हे आरोग्य-जंतू ! रोगजंतू, रोग निर्माण करतात. आरोग्य-जंतू, आरोग्य राखतात. उदाहरणार्थ आतड्यात हे काही जीवनसत्वे निर्माण करतात. अन्यत्र हे आहेत, ठाण मांडून बसून आहेत, म्हणून रोगजंतू तिथे राहू शकत नाहीत ! हे तर परोपकार-जीवी (Commensals). उगीच परोपजीवी (Parasites/ बांडगूळ) म्हणून त्यांना हिणवणे बरे नाही. योनीमार्ग, साबणाने, आतून धुवून काढण्याची गरज नसते. रोज झकास आंघोळ करणे एवढी स्वच्छता पुरते.
पण, आजकाल काही बायकांना अति स्वच्छतेची बाधा होते. अशात योनी शुद्धीसाठी खास साबणाचा शोध लागतो. यातल्या काही प्रकारांनी आरोग्य-जंतूंची वस्ती उद्ध्वस्त होते आणि मग नको ते जंतू (गार्डेनेल्ला व्हजायनॅलीस) वस्तीला येतात. याला म्हणतात बॅक्टेरियल व्हजायनॉसिस. मग पांढरा, पातळ, धुरकट, हिरव्या रंगाचा स्त्राव जातो. लघवीला जळजळ, खाज, अंबूस वास अशा तक्रारी सुरू होतात.
त्यानंतर काय होतं,
त्याविषयी पुढच्या भागात..

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: white discharge-women is it normal or disease?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.