निरामय आरोग्य आणि सुदृढ शरीर यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त पोषक घटक असणं गरजेचं असतं. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारातील पोषक घटकांचं प्रमाण कमी आणि आरोग्यास हानिकारक घटक जास्त झाले आहेत. धावपळीच्या जगण्यात प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड यांचं आहारातलं प्रमाण वाढलं आहे,. पण या बदललेल्या आहाराशैलीमुळे आपल्या ताटात पांढर्या विषाचं प्रमाण वाढलं आहे असं आहारातील विषारी घटकांवरचा अभ्यास सांगतो.
डॉक्टर, आहार तज्ज्ञ नेहेमी आहारात पांढरे घटक कमी खा असं म्हणतात. यामागचं कारण म्हणजे आहारातील पांढरे घटक म्हणजे त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे या पदार्थातील पोषक घटक नष्ट करतात. हे पदार्थ आहारात असल्यास वजन वाढणे, रक्तदाब वाढणे, मधुमेह यासारख्या समस्यांचा धोका वाढतो. हे पांढरे पदार्थ म्हणजे ताटातलं पांढरं विष असून त्यांचं ¸मर्यादित सेवन हेच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं असं तज्ज्ञ म्हणतात. पांढरे विष म्हणून ज्या घटकांचा उल्लेख केला आहे त्यात साखर, मीठ, मैदा, पांढरे तांदूळ आणि बटाटा यांचा समावेश आहे. यांना पांढरं विष म्हणण्यामागे त्यांच्यातील गुणधर्म कारणीभूत ठरतात
ताटातले पांढरे विष
Image: Google
1. साखर - अभ्यासक म्हणतात की साखर ही आरोग्यास हानिकारक आहे यात अजिबात शंका नाही. कारण साखरेवर शुध्दीकरणाची सर्वात जास्त प्रक्रिया केली जाते. रिफाइंड साखरेला ‘एम्प्टी कॅलरी’ असं म्हणतात. प्रक्रिया आणि शुध्दीकरण केलेल्या साखरेत आरोग्यास लाभदायक गुणधर्म नसतात. उलट साखर अन्ननलिकेत गेल्याबरोबर त्याचं रुपांतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजम्धे होतं. ज्यांना अंगमेहनतीची कामं नसतात त्यांच्या शरीरात साखर चरबीच्या स्वरुपात जमा होते. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच साखरेमुळे यकृताला धोका निर्माण होतो. तसेच दात खराब होण्यास, कर्करोग होण्यासही ही रिफाइंड साखर जबाबदार ठरते.
Image: Google
2. तांदूळ- प्रामुख्याने अनेकांच्या आहारात भात मोठ्या प्रमाणावर असतो. जेवणात केवळ भातच हवा असं म्हणणारे आणि त्यानुसार आहार घेणारेही आहेत. पण अभ्यासक म्हणतात की, पांढर्या तांदुळावर पॉलिशची प्रक्रिया जास्त झालेली असते. त्यामुळे तांदळातील पोषक घटक नष्ट होतात. अभ्यासात असं आढळून आलं आहे की, पांढरे तांदूळ आहारात जास्त प्रमाणात असल्यास टाइप 2 डायबिटीजचा धोका वाढतो. अभ्यासक म्हणतात पांढर्या तांदुळामुळे निर्माण होणारे धोके टाळायचे असतील तर ब्राऊन राइस किंवा रेड राइस खावा.
Image: Google
3. मीठ- अभ्यासक आहारातून मीठ काढूनच टाका असं म्हणत नाही. कारण आहारात अजिबात मीठ नसणं यामुळेही आरोग्याचं नुकसान होतं. शरीरास आवश्यक सोडियम आणि क्लोराइडचा पुरवठा मीठातूनच होतो. पण मीठ जर अधिक प्रमाणात सेवन केलं गेल्यास त्याचा परिणाम शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर होतो. मीठाचा घातक परिणाम रक्त वाहिन्यांवर होतो. तसेच जास्त मीठ खाल्ल्यानं हाडं कमजोर होतात. पोटात अल्सर आणि कॅन्सरचा धोकाही वाढतो. अभ्यासक म्हणतात आपल्या आहारात रोज फक्त एक छोटा चमचा मीठ असलं पाहिजे.
Image: Google
4. मैदा- ब्रेड, बिस्किट, केक, शंकरपाळे , समोसे , कचोरी, पिझ्झा या सर्व पदार्थात मैद्याचा वापर केलेला असतो. आणि हे सर्व पदार्थ आहारात जास्त असण्याचं प्रमाण वाढलं आहे. गव्हाचं पीठ रिफाइंड करुन मैदा तयार केला जातो. या प्रक्रियेदरम्यान गव्हाच्या पिठातील फायबर, गुड फॅट, जीवनसत्त्व, खनिजं, फायटोन्यूट्रिएंटस हे घटक निघून जातात. मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीरात एचडीएलची ( हाय डेन्सिटी लिप्रोप्रोटीन)अर्थात गूड कोलेस्टेरॉलची कमतरता निर्माण होते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधे प्रामुख्याने मैदा असतो आणि असे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्राइग्लिसराइड यामधे वाढ होते. हे घटक हदयाच्या आरोग्यासाठी घातक असतात. तसेच वजन वाढवण्यासोबतच मधुमेहाचा, टाइप 2 डायबिटीजचा धोकाही वाढवतात.
Image: Google
5. बटाटा- बटाटा ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. बटाटा , बटाट्याचे पदार्थ आहारात जास्त असल्यास ते वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. उकडलेल्या बटाट्यात स्टार्च आणि कर्बोदकं जास्त असतात. बटाट्याचे पदार्थ हे प्रामुख्याने तळलेले असतात. तसेच त्यात बटरही जास्त प्रमाणात वापरलेलं असतं. अभ्यासक म्हणतात की तळलेले बटाट्याचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्यास कर्करोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो.