जेव्हा आपण वजन कमी करत असतो तेव्हा अनेक जण येऊन विविध डाएट संदर्भात सांगत असतात. व्यायामासह शरीराला योग्य आहार मिळणे देखील महत्त्वाचे आहे. नेहमी नवनवीन डाएट आणि प्रकार ऐकायला मिळत असतात. सध्या व्यायाम, डाएट यासोबतच इंटरमिटेंट फास्टिंगकडे लोकांचा कल दिसून येत आहे. आपल्याला कोणता डाएट सूट होतो कोणता नाही यासंदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला देखील इंटरमिटेंट फास्टिंगचं नाव ऐकून माहीत असेल, मात्र इंटरमिटेंट फास्टिंग कशाला म्हणतात, त्याची योग्य पद्धत काय, याने कितपत फरक पडतो यासंदर्भात माहिती घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
दिल्ली एम्सच्या माजी मुख्य आहारतज्ज्ञ रेखा शर्मा यांच्या मते, "लोक सहसा काय खावे यावर लक्ष केंद्रित करतात. मात्र, इंटरमिटेट फास्टिंगमध्ये केव्हा अन्न खावे हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. दररोज काही तास उपवास केल्याने किंवा आठवड्यातून फक्त दोनववेळचं जेवण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होऊ शकतात. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते".
इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय
इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे अतिरिक्त चरबी कमी करण्यास यासह निरोगी जीवनशैलीसाठी उपवास ठेवणे. काही ठराविक तास उपाशी राहणं अथवा उपवास करणं. डाएटप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी प्रकार सध्या प्रचलित आहे. यात आपल्याला दिवसाचे काही ठराविक तास उपाशी राहावे लागेल. या फास्टिंगची वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही ठरवू शकता. या प्रकारात तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता याला जास्त महत्व आहे.
काय फायदे ?
इंटरमिटेंट फास्टिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झपाट्याने वजन कमी होणे. यासह बेली फॅटची अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, निरोगी जीवनशैलीसाठी, सुदृढ शरीरासाठी तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंगचा वापर नक्कीच करू शकता.
कोणते प्रकार?
'इंटरमिटेंट फास्टिंग' मध्ये अनेक प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे १६/८- ज्यामध्ये तुम्ही दिवसातले १६ तास खाण्यापासून दूर राहता आणि उरलेल्या 8 तासांतच जेवण करता.
इंटरमिटेंट फास्टिंग'चा दुसरा प्रकार आहे ५/२. यामध्ये तुम्हाला आठवड्यातले पाच दिवस नॉर्मल डाएट घ्यायचं असतं. मात्र आठवड्यातले उरलेले दोन दिवस शरीराला केवळ 500 ते 600 कॅलरी मिळतील एवढाच आहार घ्यायचा. शिवाय हे दोन दिवस सलग येता कामा नयेत. म्हणजे या दोन दिवसांच्या मध्ये किमान एक दिवस तरी नॉर्मल डाएटचा असायला हवा.
आहार कसा असावा?
फायबरयुक्त पदार्थ, फळं, ज्युस, काही प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ, प्रोटिन्सयुक्त पदार्थ आणि जास्तीत जास्त पाणी आणि जलयुक्त पदार्थ सेवन करू शकता. मात्र हे डाएट सुरू करताना योग्य डायटीशिअनचा सल्ला घेणे आवश्यक.