जेवणाची चव वाढवणारं मीठ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. WHO च्या मते, जगभरात दरवर्षी जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्याने १९ लाखांचा मृत्यू होत आहे. WHO च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सोडियमचा वापर कमी करण्यासाठी पोटॅशियमयुक्त मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
अन्नातील मीठाच्या प्रमाणाबद्दल आरोग्य तज्ज्ञ वारंवार इशारा देतात. परंतु बहुतेक लोक दररोज सल्ला दिलेल्या सोडियमच्या प्रमाणापेक्षा त्याचा दुप्पट वापर करतात. जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोक होतो. हे तीन आजार अचानक होणाऱ्या मृत्यूची सर्वात मोठी कारणं आहेत. WHO ने नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत, ज्यामध्ये लोकांना निरोगी पर्याय म्हणून पोटॅशियमयुक्त मीठ खाण्याचं आवाहन केलं आहे.
मीठाचं जास्त सेवन धोकादायक का आहे?
शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मीठाचं सेवन आवश्यक आहे. मात्र त्याचं जास्त सेवन केल्याने गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. WHO च्या रिपोर्टनुसार, दरवर्षी जगभरात १९ लाख मृत्यू जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे होतं. एका व्यक्तीने दिवसाला २ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ सेवन करू नये, परंतु बहुतेक लोक दररोज ४.३ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरतात.
WHO ने पोटॅशियमयुक्त मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे, जो कमी सोडियमयुक्त पर्याय आहे. यामध्ये काही सोडियम क्लोराइड पोटॅशियम क्लोराइडने बदललं जातं. या बदलामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते, अचानक होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी होतो.
हृदय आणि स्नायूंच्या कार्यात पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावतं. बहुतेक लोक ते पुरेसे सेवन करत नाहीत. WHO च्या मते, दररोज ३.५ ग्रॅम पोटॅशियम सेवन केलं पाहिजे. पोटॅशियमयुक्त मीठ खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं.