Join us   

जपानी लोक जास्त जगतात त्याचं कारण काय? 5 गोष्टी.. हेल्दी जगण्याचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2022 7:59 PM

जपानी लोकं शिस्तबध्द असतात ती फक्त कार्यालयीन कामाच्या बाबतीतच नाही तर आपलं आरोग्य जपण्याच्या बाबतीतही.. खाण्या पिण्याचे, त्यांच्या जीवनशैलीचे म्हणून खास असे नियम आहेत. हे नियम खूप अवघड की सोपे, वाचून ठरवा!

ठळक मुद्दे जपानमधील लोकांच्या जेवणाच्या ताटाचा निम्म्यापेक्षा जास्त भाग हा उकडलेल्या आणि कच्च्या सॅलेडरुपातील भाज्यांनी व्यापलेला असतो.वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, निरोगी राहाण्यासाठी कमीत कमी दोन वेळा ग्रीन टी पिणं हा जपानी लोकांचा नियम. त्यांचा ग्रीन टीही असतो विशेष! निरोगी आणि भरपूर वर्ष जगायचं तर व्यायाम हा करायलाच हवा, हे जपानी लोकांना शिकवावं/ सांगावं लागत नाही. 

जपान म्हणजे निरोगी लोकांचा, भरपूर वर्ष जगणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. जपानमधील नागरिकही काळानुसार बदलली, आधुनिक झाली. पण निरोगी जगण्याची आपली पारंपरिक ओळख मात्र त्यांनी बदलू दिली नाही. जपानी लोकं शिस्तबध्द असतात ती फक्त कार्यालयीन कामाच्या बाबतीतच नाही तर आपलं आरोग्य जपण्याच्या बाबतीतही.. खाण्या पिण्याचे, त्यांच्या जीवनशैलीचे म्हणून खास असे नियम आहेत. हे नियम जपानमधे स्त्री -पुरुष, लहान - मोठे, तरुण-वृध्द असे प्रत्येकजण पाळतोच. जपानी लोकांसारखं निरोगी जगायचं असेल तर त्यांचे हे नियम समजून घ्यायला हवेत.

Image: Google

जपानी लोकांचं आरोग्य जपणारे नियम

1. आहार

जपानमधील लोकं आहारात फायबरला महत्त्व देतात. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, आहारात कर्बोदकं जास्त असूनही केवळ फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोकांच्या आर्युमानात वाढ झालेली दिसून आली आहे.  अशा ब्ल्यू झोनमधे ग्रीक, इटली, जपान, कोस्टारिका कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा या मोजक्या देशांचा आणि मोजके देश आणि  शहरं येतात.  जपानमधील लोकांच्या जेवणाच्या ताटाचा निम्म्यापेक्षा जास्त भाग हा उकडलेल्या आणि कच्च्या सॅलेडरुपातील भाज्यांनी व्यापलेला असतो. त्यांच्या आहारात भाज्यांसोबतच शेंगवर्गीय भाज्या, डाळी यांचा समावेश असतो. जपानी लोकांसारखं आपल्यालाही निरोगी राहायचं असेल तर तज्ज्ञ आहारात फायबरचं प्रमाण वाढवायला सांगतात. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कच्चं सॅलेड, नाशपती, स्ट्राॅबेरी यासारखी फायबरयुक्त फळं, हरभरा, राजमा, मटार, मसूर या शेंगवर्गीय भाज्या ,कडधान्यांचा, बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड या सुक्या मेव्याचा समावेश करण्यास सांगतात. कारण यातून फायबरसोबतच शरीरास आवश्यक प्रथिनं , खनिजं, जीवनसत्त्वं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात.  अशा स्वरुपाच्या आहारानं पचनक्रिया मजबूत होते. वजन नियंत्रित ठेवण्यास आणि निरोगी राहाण्यास रोजच्या आहारात या घटकांच्या समावेश आवश्यक असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google

2. ग्रीन टी

जगभरात ग्रीन टीवर भरपूर अभ्यास आणि संशोधन झालं आहे. हे अभ्यास आणि संशोधनांचे निष्कर्ष ग्रीन टीचं प्रमाणशीर सेवन हे आरोग्यास लाभदायक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असल्याचं सांगतात. जपानी लोकं दिवसभरात कमीत कमी दोन कप ग्रीन टी पितातच. अगदी पाण्यासारखा पातळ, रंगाला हिरवा असणारा ग्रीन टी हे येथील ग्रीन टीचे वैशिष्ट्य. ग्रीन टीमधे ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा परिणाम त्वचा निरोगी राहाण्यास, वजन नियंत्रणात राहून फिटनेस राखण्यास होतो. त्यामुळे तज्ज्ञ निरोगी जगण्यासाठी रोज ग्रीन टी पिणं आवश्यक असल्याचं सांगतात. 

Image: Google

3. नाश्ता चुकवायचा नाही! 

काट्यावर काटा अशा पध्दतीन रोजच्या जगण्याचे नियम पाळणारे जपानी लोक आपल्या नाश्त्यास कधीही फाटा देत नाही. रोज नाश्ता हे त्यांच्या आरोग्याचं रहस्य. नाश्त्याला सूप, सॅलेड, पौष्टिक पदार्थ, ग्रीन टी असा मेन्यू असतो. नाश्ता असू देत किंवा संध्याकाळचं स्नॅक्स पौष्टिक पदार्थांना महत्त्व देणारी जपानी माणसं आपलं आरोग्य जपण्यासाठी  आहारात फास्ट फूड आणि जंक फूड असणार नाही हा नियम पाळतात. त्याचे परिणाम त्यांच्या निरोगी आरोग्यात आणि काम करण्याच्या क्षमतेतून दिसून येतात. 

Image: Google

4. व्यायाम आणि मार्शल आर्ट

निरोगी जगण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहारासोबतच नियमित व्यायामाचा नियम जपानी लोकं पाळतात. मार्शल आर्ट हा तर पारंपरिक खेळ असून तो प्र्त्येकाला यायलाच हवा अशा पध्दतीने शिकला आणि शिकवला जातो. जपानमधील स्त्री पुरुष हे ज्युडो, कराटे, अकिदो यासारख्या मार्शल आर्टमधे पारंगत असतात. याचा सराव ते रोज करतात. यामुळे फिटनेस राखला जातो. जपानी लोकांसारखा फिटनेस बाळगण्यासाठी आपण किमान रोज व्यायाम करण्याचा शिरस्ता पाळायला हवा असं तज्ज्ञ म्हणतात.

Image: Google

5. खाण्यापिण्याचे नियम

जपानी माणसं खाण्यापिण्याचे नियम काटेकोर पाळतात. एका वेळी खूप खाण्यापेक्षा ते दिवसातून थोडं थोडं पण पौष्टिकच खातात. जेवणात किमान चार ते पाच भाज्यांचा समावेश करतात. पचनास त्रास होतो, चयापचय बिघडतं, त्याचा वजनावर, आरोग्यावर विपरित परिणाम होतो म्हणून रात्री उशिरा जेवण करण्याचं टाळतात. रात्रीचं जेवण म्हणून सूप, सॅलेड हे पदार्थ सेवन करतात. दुधाचे पदार्थ कमी खातात. दूध देखील फॅटरहित सेवन करतात. तळण्या-शिजवण्यापेक्षा ते पदार्थ उकडून किंवा भाजून खातात. भाज्या या कच्च्या सॅलेड रुपात किंवा एक वाफ आणून खातात. ते भाज्या जास्त शिजवत नाही. त्यामुळे भाज्यातील पोषणमूल्यं अति शिजवण्यानं नष्ट होत नाहीत.

Image: Google

स्वयंपाक करताना कमी मसाले, कमी तेल वापरतात. जपानी लोकं जास्त गोड खात नाही. साखरेचे पदार्थ कमी खाण्याचं त्यांचं पथ्यं त्यांना निरोगी आणि दीर्घ आर्युमान् देतो असं तज्ज्ञ म्हणतात. जपानी लोकं खूप जगावेगळे , अवघड, अशक्यप्राय वाटणारे नियम पाळत नाही. उलट त्यांचे नियम इतके सोपे आणि सहज आहेत की आपणही त्यांच्या नियमांची काॅपी आपल्या रोजच्या जगण्यात नक्कीच करु शकतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनाफिटनेस टिप्सजपान