Join us   

सायंकाळच्यावेळी डोक्यावर डास का जमतात? याचा कधी विचार केलाय का? जाणून घ्या कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 10:47 PM

Mosquitoes Gather around Head संध्याकाळ होताच डोक्यावर डास फिरतात. यामागचे नेमके कारण तुम्हाला माहीत आहे का?

हिवाळ्यात डासांचा वावर सर्वत्र दिसतो. ६ वाजले की घरातले खिडक्या आणि दार बंद होतात. सायंकाळच्या समयी बाहेर गेलं की डास अवतीभवती फिरू लागतात. इतकंच नाही तर आपण कुठेतरी बसलेले किंवा उभे असता तेव्हा देखील डोक्यावर डासांचा थवा फिरू लागतो. हे बहुतेकवेळा मोकळ्या जागेत घडते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, डास तुमच्या डोक्यावर का फिरतात? यामागील नेमके कारण काय? तर आज आम्ही तुम्हाला डास नेमके असे का करतात याबद्दल माहिती देणार आहोत..

जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते तेव्हा ऑक्सीजन आत खेचतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या कार्बन डायऑक्साइड वायूने ​​आकर्षित होऊन डास आपल्या डोक्यावर घिरट्या घालू लागतात. याशिवाय घामामुळे देखील डोक्यावर डास फिरू लागतात. घामामध्ये आढळणाऱ्या ऑक्टेनल नावाच्या रसायनाकडे आकर्षित होऊनही डास डोक्यावर घिरट्या घालू लागतात. घाम शरीरापेक्षा डोक्यावर जास्त काळ टिकतो. यामुळेच डास शरीराच्या इतर भागावर नसून फक्त डोक्यावर फिरतात.

घरात एक जरी मच्छर असला तरी तो चावतोच. मात्र, बाहेर आल्यावर डोक्यावर डास घिरट्या घालतात. असे का होते ? असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. मात्र, यामागील खरं कारण म्हणजे, आपल्याला फक्त मादी डास चावतात. नर डास चावत नाही. बाहेर असताना डोक्यावर घिरट्या घालणाऱ्या डासांच्या कळपात नर आणि मादी दोन्ही डास असतात. परंतु त्यावेळी ते चावत नाही. रात्री झोपतानाही नर डास नसून फक्त मादी डास आपल्याला चावतात. त्यामुळे डोक्यावर बसणारे काही डास आपल्याला चावतात तर काही चावत नाहीत.

डास चावल्याने अनेक गंभीर आजार शरीरात उद्भवतात. ज्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, जपानी एन्सेफलायटीस हे आजार मुख्य आहेत. या आजारांपासून वाचण्यासाठी आजूबाजूला स्वच्छता असणे आवश्यक आहे. त्यामुळे डास चावल्यावर काळजी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स