चहा ला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाच, चहा आणि भारतातील चहा प्रेमींचे नाते काही वेगळेच आहे. चहाशिवाय काही लोकांची दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा हा लागतोच. काही लोकं सकाळचा नाश्ता टाळून चहा - चपाती, चहा - ब्रेड, चहा - बिस्किटे असे कॉम्बिनेशन करून खातात.
मात्र, चहा आणि बिस्किटे हा कॉम्बिनेशन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. सध्या बिस्किटांचे अनेक प्रकार बाजारात मिळतात. अशी बिस्किटे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी घातक ठरतात. चहा आणि बिस्किटे खाऊन आपण बसल्या - बसल्या आजारांना आमंत्रण देतो.
यासंदर्भात, आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणतात, ''दिवसाची सुरुवात चहा - बिस्किटांनी केल्यास अॅसिडिटीची समस्या वाढते. पोटातील चरबी आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या देखील होऊ शकते. सकाळच्या नाश्त्यात रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने, शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा बिस्किटे खाऊ नये.''
सकाळी चहा बिस्किटे खाण्याचे दुष्परिणाम
चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांची समस्या
चहामधील कॅफीन आणि बिस्किटांमधील साखर हे दोन घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. ज्याचा थेट नकारात्मक परिणाम त्वचेवर होतो. चहा आणि बिस्किटांचे सेवन केल्याने मुरुमांची समस्या वाढू शकते. ज्यामुळे कमी वयातच स्किन एजिंगची समस्या निर्माण होऊ शकते.
बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते
बिस्किटे बनवण्यासाठी तेल, मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. ज्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता, छातीत जळजळ आणि पचनाशी संबंधित समस्या होऊ शकते. याशिवाय बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, त्याचा थेट परिणाम दातांवर होतो. दातांमध्ये बॅक्टेरिया आणि सडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम
बिस्किटांमध्ये साखर आणि कर्बोदकं याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. रक्तातील साखर जास्त झाल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यावर होतो.