शाळेत, कॉलेजला किंवा अगदी ऑफीसला जातानाही आपण डबा नेतो. हा डबा बहुतांशवेळा प्लास्टीकचा असतो. काही डबे हे मायक्रोव्हेव सेफ असल्याने किंवा विशिष्ट ब्रँडचे असल्याने त्यामुळे काही अपाय होत नाही असा दावा कंपन्या करताना दिसतात. मात्र अशाप्रकारे प्लास्टीकच्या डब्यातून पदार्थ नेणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. अनेकदा आपण प्लास्टीकच्या पिशव्या, प्लास्टीकच्या बाटल्या आणि डबे यातून सर्रास काही ना काही पदार्थ नेतो. अनेकदा फ्रिजमध्ये ठेवण्यासाठीही आपण प्लास्टीकचाच वापर करतो. पण आपल्याही कळत-नकळत आपल्या पोटात प्लास्टीक जात असते हे लक्षात ठेवायला हवे. हे प्लास्टीक आरोग्यासाठी अतिशय धोकादायकक असते (Why We Should Avoid Using Plastic Container according to Expert ).
गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. प्रविण झा यांच्या म्हणण्यानुसार, काही प्लास्टीक पदार्थांच्या संपर्कात आल्यावर हानिकारक रसायनांची निर्मिती करतात. या प्लास्टीकला काही कारणाने गरम केले किंवा ते झाले तर ते आरोग्यासाठी चांगले नसते. प्लास्टीकचे डबे तयार करण्यासाठी पॉलीइथाइलीन टेरेफ्थेलेटच्या रुपात प्लास्टीकचा उपयोग होतो. हे प्लास्टीक एकदाच वापरण्यासाठी उपयुक्त असते. ते पुन्हा पुन्हा वापरणे किंवा गरम करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. गरम, आम्लिय आणि तेल असलेले पदार्थ प्लास्टीकच्या डब्यात किंवा पिशवीत ठेवायला नकोत. त्यापेक्षा काच, स्टेनलेस स्टील, सिलिकॉन, बांबू यांपासून तयार केलेले कंटेनर केव्हाही जास्त चांगले.
प्लास्टीकचे डबे खरेदी करताना लक्षात ठेवा..
१. डबे खरेदी करताना त्याच्या लेबलवर लक्ष द्या, BPA फ्री कंटेनरच खरेदी करा, BPA हे रसायन आरोग्यासाठी घातक असते.
२. प्लास्टीकचे डबे शक्यतो मायक्रोव्हेवमध्ये ठेवू नका. कारण गरम झाल्यावर प्लास्टीकमधून रासायनिक घटक बाहेर येऊ शकतात.
३. प्लास्टीकचा डबा थोडा जरी तुटला असेल किंवा चरा गेला असेल तर तो वापरासाठी चांगला नाही हे वेळीच लक्षात घ्या.
४. कमीत कमी वेळासाठी म्हणजे साधारण १ ते २ दिवसांसाठी अन्नपदार्थ स्टोअर करायचा असल्यास प्लास्टीकचा डबा वापरण्यास हरकत नाही.