सौंदर्य , फिटनेस हे महिलांचे आवडते मुद्दे. पण यासाठी आरोग्य चांगलं हवं असतं याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष होतं. महिलांच्या शरीरात वयात येताना, गरोदर असताना, मेनोपाॅज येण्याआधी आणि आल्यानंतर अनेक बदल होतात. या बदलांनुसार त्यांच्या शरीरासाठी आवश्यक पोषणाची गरज बदलते.. म्हणजेच पाळी सुरु झालेल्या किशोरवयीन मुलीच्या शरीराची किंवा आरोग्याची पोषणमुल्यांच्या दृष्टीकोनातून जी गरज असते ती मेनोपाॅज सुरु झालेल्या महिलांच्या आरोग्याची नसते. दोघींच्या आवश्यक पोषण मुल्य घटकात फरक असतो.
Image: Google
पण सर्व वयोगटातील महिलांच्या आरोग्यासाठी काही पोषणमुल्यं ही मुलभूत घटक म्हणून ओळखली जातात. ती त्यांच्या शरीराला मिळायलाच हवीत. ही मुलभूत पोषणमुल्यं असलेला आहार त्यांनी घ्यायला हवा असं स्त्री रोग तज्ज्ञ म्हणतात. ही मुलभूत पोषण मुल्यं आहारातून जेव्हा कमी मिळतात तेव्हा डाॅक्टर सप्लिमेण्टस सुचवतात. पण तज्ज्ञ म्हणतात महिलांच्या आरोग्य, सौंदर्य , फिटनेस आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणून आवश्यक असणारी पोषण मुल्यं रोजच्या आहारात मिळाली तर मग शरीरात त्यांची कमतरता निर्माण होऊन सप्लिमेण्टस घेण्याचे गरज पडत नाही.
महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषणमुल्यं
Image: Google
1. ड जीवनसत्त्वं
ड जीवनसत्त्व हे स्निग्ध पदार्थात विरघळतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हाडांचं आरोग्य सांभाळण्यासाठी आणि स्नायुपेशींच्या निर्मितीसाठी हे जीवनसत्त्व आवश्यक मानलं जातं. हे जीवनसत्त्वं त्वचेद्वारे निर्माण होतं. यासाठी त्वचेला पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्यप्रकाशाबरोबरच हे जीवनसत्त्वं मश्रूम, गायीचं दूध, सोया दूध, संत्र्याचा रस यातून मिळतं. त्यामुळे रोजच्या आहारात त्याच समावेश हवा. हे जीवनसत्व कमी पडल्यास डाॅक्टर ड जीवनसत्वाच्या सप्लिमेण्टस घेण्यास सांगतात. डाॅक्टरांच्या सल्याशिवाय ड जीवनसत्वाच्या सप्लिमेण्टस घेतल्या आणि शरीरात त्याचं प्रमाण जास्त झाल्यास शरीरात अतिप्रमाणातल्या ड जीवनसत्वाचे विषारी घटक तयार होतात आणि आरोग्यांसंबंधी इतर तक्रारीस ते कारणीभूत ठरतात.
Image: Google
2. क जीवनसत्व
क जीवनसत्व हे पाण्यात विरघळतं. क जीवनसत्व हे मुक्त मुलकांपासून आरोग्याचं रक्षण करण्यासाठी, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वाचं असतं. रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारपणं टाळायची असल्यास महिलांनी त्यांच्या रोजच्या आहारात क जीवनसत्वाचा समावेश असलेले पदार्थ सेवन करायला हवेत. त्यासाठी तज्ज्ञ आंबट चवीची फळ मोसंबी, संत्री, किवी , स्ट्राॅबेरीसारखी फळं, ब्रोकोली, लाल आणि पिवळी सिमला मिरची यांचा समावेश रोजच्या आहारात करायला लावतात.
Image: Google
3. फोलेट
फोलेट म्हणजे पाण्यात सहज विरघळणारं ब जीवनसत्व आहे, ब जीवनसत्व पेशींच्या आणि उतींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. रक्तातील लाल पेशींच्या निर्मितीत फोलेटची भूमिका महत्त्वाची असते. केस आणि त्वचा यासाठी हा घटक खूप महत्त्वा मानला जातो. केस आणि त्वचा तेव्हाच निरोगी आणि सुंदर होते जेव्हा पेशींची सतत निर्मिती होत राहाते. फोलेट पेशी निर्मितीला चालना देणारं पोषणमूल्य आहे. ब्रोकोली, मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या, कोबी, पालक चवळी यातून फोलेट मिळतं.
Image: Google
4. लोह
शरीराच्या विविध कार्यात लोह हे पोषणमूल्य महत्त्वाची भूमिका बजावतं. रक्तातील हिमोग्लोबीनची निर्मिती त्यासोबतच मायोग्लोबिनच्या निर्मितीसाठीही ते महत्त्वाचं असतं., मायोग्लोबिन म्हणजे स्नायुंना ऑक्सिजन पुरवणारं प्रथिनं. लोहाची शरीरात कमतरता निर्माण झाल्यास थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो तसेच श्वास घेण्यास अडथळा येतो. शरीरावर सूज येणं, जीभ सुजणं, आग होणं हे त्रास होतात. तसेच ॲनेमियासारखे गंभीर आजार होण्यास लोहाची कमतरता कारणीभूत ठरते. त्यामुळे लोहयुक्त पदार्थ कोणत्याही वयोगटातल्या महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, नागली, बेदाणे, काळ्या मनुका आणि तृणधान्यं असावेत असं तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
5. कॅल्शियम
हाडांचं आणि दातांचं आरोग्य सांभाळण्यात कॅल्शियम हे खनिज महत्त्वाचं ठरतं. रक्तवाहिन्या, मज्जातंतू यांचं काम नीट होण्यासाठे ,हार्मोन्स निर्मिती यासाठीही कल्शियम या खनिजाची आवश्यकता असते. शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात कॅल्शियम मिळालं नाही तर स्नायू कमजोर होतात. स्नायुंमधे गोळे येतात तसेच सांधेदुखीही होते. या समस्या महिलांमधे प्रामुख्याने आढळून येतात ते आहारात कॅल्शियमच्या अभावामुळे. आहारातील कॅल्शियमचं महत्त्व दुर्लक्षित झाल्यास ऑस्टिओपोरोसिस हा हाडांचा गंभीर आजार होतो. म्हणूनच दूध, दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, मका, सोयाबिन केळ, सीताफळ ही फळं आहारात महत्त्वाची ठरतात.
Image: Google
6. मॅग्नेशियम
मॅग्नेशियम म्हणजे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेलं सूक्ष्म खनिज आहे. या खनिजाचं महत्त्व ताण नियंत्रणासाठी, झोपण्या उठण्याचं चक्र सांभाळणयासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याठी असतं. मॅग्नेशियम या घटकाची कमतरता निर्माण झाल्यास डोकेदुखी , मळमळ, स्नायुदुखी, भूक कमी होणं, स्नायुत गोळे येणं , थकल्यासारखं गळल्यासारखं वाटणं हे त्रास उद्भवतात. 'द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन ऑफ द नॅशनल अकॅदमी ऑफ सायन्स'ने केलेला अभ्यास सांगतो, 31 वर्षांच्या पुढील महिलांच्या आहारात 320 मिलिग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. डांगर बिया, बदाम, पालक, काजू , शेंगदाणे यातून मॅग्नेशियम हा घटक मिळतो.