विसरुन जाण्याचा आजार म्हणजे अल्झायमर इतकंच आपल्याला अनेकदा माहित असतं. आपल्या आजुबाजूला अल्झायमरचे रुग्ण असतील तरच आपल्याला या आजाराचे गांभिर्य लक्षात येते. व्यक्ती जीवंत आहे पण तिला भूतकाळातील आणि भविष्यातीलही कोणत्याच गोष्टी आठवत नसतील तर असंबंध बोलणे, विचित्र वागणे असे प्रकार साहजिकच घडतात. अल्झायमर होण्याची काही नेमकी कारणे असतील तरी या रुग्णांसाठी आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्यांसाठी या सगळ्या गोष्टी तितक्या सोप्या नसतात. 1 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस (Alzheimer’s Day) म्हणून ओळखला जातो. विस्मृतीच्या या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे म्हटले जाते. यामागे नेमकी काय कारणं असावीत याबद्दल समजून घेऊया (Why Women Tend To Be Affected By Alzheimer’s More Than Men World Alzheimer’s Day 2022)...
साधारणपणे ६५ वर्षाच्या पुढील व्यक्तींमध्ये अल्झायमर होत असल्याचे दिसते. साधारणपणे १४ पैकी एका व्यक्तीला हा आजार झाल्याचे दिसते. मुंबईमध्ये संशोधक म्हणून काम करणारे डॉ. प्रदिप महाजन सांगतात, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अल्झायमर होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचे नेमके कारण सांगता येत नसले तरी वय वाढल्यावर महिला जास्त असुरक्षित होतात तसेच महिला जास्त वर्षे जगतात म्हणून त्यांच्यामध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे डॉ. महाजन यांचे म्हणणे आहे. तसेच महिलांमध्ये नैराश्य, भावनिकता, हार्मोन्समध्ये होणारे बदल या कारणांमुळे महिलांमध्ये अल्झायमर हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडण्याचे कामही अतिशय वेगाने होते.
अल्झायमर हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात. तसेच मन आता त्याचे काम करू शकत नाही. ते समजून घेणे, गोष्टी लक्षात ठेवणे, निवड करणे यासारख्या गोष्टी करण्यात त्रास होतो. याचा त्रास झालेला व्यक्ती वर्षानुवर्षे करत असलेल्या अन्न चावणे, कपडे घालणे, पैसे मोजणे इत्यादी गोष्टीही विसरायला लागतो. डोक्याला झालेली गंभीर दुखापत, अनुवंशिकता, डाऊन सिंड्रोम, वय, चुकीची जीवनशैली ही अल्झायमरची काही महत्त्वाची कारणे असतात. 2012 पासून दरवर्षी जागतिक अल्झायमर दिवस जगभरात साजरा केला जातो. या आजारावर जर्मन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अलोइस अल्झायमर यांनी 1901 मध्ये उपचार केले. त्यांच्या नावावरून या आजाराला 'अल्झायमर' असे नाव देण्यात आले. प्रत्येक देशात अनेक जागरुकता मोहिमा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. अल्झायमर रोग हे जगभरातील मृत्यूचे सहावे प्रमुख कारण आहे. त्यामुळे या आजाराची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.