Join us   

थंडीमुळे भूक वाढली, मधल्या वेळेला खाता येतील असे ४ सोपे पर्याय, राहाल वर्षभर ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 5:39 PM

Winter Care Diet Tips healthy options to have in winter : जंक फूड किंवा तेलकट काही खाण्यापेक्षा आरोग्यासाठी उपयुक्त, शरीराला ताकद देणारे पदार्थ खायला हवेत..

थंडीचा काळ म्हणजे आरोग्यासाठी अतिशय उत्तम काळ मानला जातो. थंडीमुळे खाल्लेले अन्न पचत असल्याने शरीराचे चांगले पोषण होते. विशेष म्हणजे उन्हाळा किंवा पावसाळ्यापेक्षा थंडीत जास्त भूक लागते. या काळात शरीराला ऊर्जेची आवश्यकता असल्याने आहारात पौष्टीक पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा असेही सांगितले जाते. थंडीच्या दिवसांत आपल्याला दर काही वेळाने भूक लागते आणि सतत गरम, चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा होते. मात्र अशावेळी जंक फूड किंवा तेलकट काही खाण्यापेक्षा आरोग्यासाठी उपयुक्त, शरीराला ताकद देणारे असे काही खाल्ले तर त्याचा एकूणच चांगला फायदा होतो. आता असे पर्याय नेमके कोणते आणि त्यांचे फायदे काय हे समजून घेऊया (Winter Care Diet Tips healthy options to have in winter)...

१.नटस

घरात असलो की जाता येता आपल्याला काहीतरी सतत तोंडात टाकण्याची इच्छा होते. अशावेळी उगाच काहीतरी चिवडे, फरसाण असे खाण्यापेक्षा खारे शेंगदाणे, शेंगदाण्याची चिक्की, फुटाणे, सुकामेवा यांसारख्या गोष्टी अवश्य खाव्यात. यामुळे थंडीत आवश्यक असणारी ऊर्जा मिळण्यास मिदत होते. तसेच ओमेगा ३, विविध जीवनसत्त्वे, प्रथिने यांचे शरीरातील प्रमाण वाढण्यासही याचा चांगला उपयोग होतो. 

२. लाडू

थंडीच्या दिवसांत आपल्याकडे आवर्जून लाडू करण्याची पद्धत आहे. हे लाडू शरीराला पोषण देणारे असल्याने दाण्याचे, तिळाचे, सुकामेव्याचे, डींकाचे नाचणी, बेसन यांचे लाडू आवर्जून खायला हवेत. यामुळे तूप, गूळ आणि इतरही पौष्टीक जिन्नस पोटात जातात. हे सगळे घटक थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने लाडू हा भुकेच्या वेळी खाण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. 

३. सूप

थंडीत गारठा असल्याने आपल्याला चहा किंवा कॉफी पिण्याची तल्लफ येते. मात्र त्यापेक्षा थंडीच्या दिवसांत गरमागरम सूप प्यायल्यास त्यातून शरीराला भरपूर आवश्यक गोष्टी मिळण्यास मदत होते.  सूपमध्ये प्रामुख्याने भाज्यांचा वापर होत असल्याने भांज्यांतून शरीराला मोठ्या प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात. सूप हा करायला अतिशय सोपा आणि चविष्ट प्रकार असल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत सगळेच सूप घेऊ शकतात.

४. फळे

थंडीच्या दिवसांत फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. फळांमध्ये असणारे फ्रूक्टोज आणि इतर घटक इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नसतात. नैसर्गिक गोष्टींचा उत्तम स्त्रोत असल्याने फळे एरवीही आवर्जून खायला हवीत. पण थंडीच्या काळात चांगली फळे बाजारात उपलब्ध होत असल्याने त्यांचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना