हिवाळा म्हणजे तब्येत कमावण्याचा आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा कालावधी. या काळात खाल्लेले चांगले पचत असल्याने आणि हवाही चांगली असल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. थंडीचे दिवस व्यायामासाठी तर चांगले असतातच पण खाल्लेले अन्न पचण्यासाठीही हे दिवस चांगले असतात. या काळात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असल्याने आपण साधारणपणे उष्णता देणाऱ्या पदार्थांचा या काळात आवर्जून समावेश करतो. थंडीचे दिवस म्हणजे दिवाळी, दसरा, ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांचेही. त्यामुळे या काळात आपण भरपूर फिरायचे प्लॅन करतो, या दिवसांत लग्नसराईही असते. त्यामुळे या काळात तब्येत ठणठणीत ठेवायची तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहोली थंडीच्या दिवसांत करायलाच हव्यात अशा काही गोष्टी सांगतात, पाहूयात त्या गोष्टी कोणत्या (Winter Care Health Tips)...
१. तेलाने मसाज
थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी होते. अशावेळी त्वचेतील आर्द्रता टिकून राहावी यासाठी शरीराला तेलाने मसाज करायला हवा. यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यासही चांगली मदत होते. त्यामुळेच थंडीत आपल्याकडे अभ्यंग आवर्जून केले जाते.
२. हळद-दूध
हळद आणि दूध हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि शरीराला पोषण देणारे असे पेय असून. थंडीच्या दिवसांत सर्दी-कफ यांपासून दूर राहण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होत असल्याने हळद-दूध आवर्जून घ्यायला हवे.
३. च्यवनप्राश
आवळा शक्तीवर्धक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा असल्याने थंडीच्या दिवसांत आवळ्यापासून तयार केलेले च्यवनप्राश खाल्लेले चांगले. पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींचा विसर पडू न देता त्यांचा आहारात समावेश करायला हवा.
४. पालेभाज्या
थंडीत काही वेळा कोठा जड होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून आहारात पालेभाज्यांचा समावेश अवश्य करायला हवा. या काळात भाज्या भरपूर प्रमाणात आणि चांगल्या मिळत असल्याने शरीराचे पोषण देण्यासाठीही त्या उपयुक्त ठरतात.
५. चालण्याचा व्यायाम
दिवसातील काही वेळ व्यायामासाठी आवर्जून राखून ठेवायला हवा. चालणे हा सर्वात सोपा आणि सहज जमणारा व्यायाम असून थंडीत तो आवर्जून करायला हवा.