दिवाळी सरली आणि थंडीचे दिवस सुरु झाले. सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी थंडी आता दिवसेंदिवस बोचरी होत चालली आहे. जसा थंडीचा जोर वाढत चालला आहे, तसे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचे प्रमाणही वाढते आहे. सध्या तर अशी परिस्थिती आहे की प्रत्येक घरात सर्दी झालेली किंवा नुकतीच होऊन गेलेली एक व्यक्ती तरी हमखास सापडते. वातावरणात बदल झाल्यामुळे असा त्रास होणे साहजिक आहे. पण आपण तब्येत जर चांगली सांभाळली आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवली तर असा ऋतू बदलाचा त्रास जाणवत नाही. त्यामुळेच हिवाळ्यातल्या थंडीपासून स्वत:चे आणि घरातल्या सदस्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून खा आणि काही गोष्टींपासून दूर रहा..
हिवाळ्यात या पदार्थांचे सेवन जास्त करा
१. गुळ आणि तूप
गुळ हा उष्ण पदार्थ आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला उर्जा देण्यासाठी गुळ अवश्य खावा. गुळाचा खडा आणि त्यावर साजूक तूप असे दररोज दूपारी जेवणानंतर खाल्ले तर हिवाळ्यातील अनेक संसर्गजन्य आजारांपासून आपण दूर राहू शकतो. गुळामुळे अंगात उष्णता टिकून राहते, तर तुपामुळे शरीराचे आतून पोषण होते. गुळामुळे अंगातली रक्ताची कमतरता देखील दूर होते. हा उपाय केल्याने महिलांच्या मासिक पाळीच्या वेदनाही कमी होतात.
२. सुकामेवा
थंडी सुरू होताच घरोघरी सुकामेव्याचे लाडू बनवणं सुरू होतं. फार पुर्वीपासून आपल्याकडे असे थंडीतले लाडू बनविण्याची पद्धत आहे. वजन वाढतं म्हणून असे पारंपरिक पद्धतीने बनविले जाणारे, सुकामेवा घातलेले लाडू खाणं टाळू नका. जर दररोज पेढ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा सुकामेव्याचा लाडू खाल्ला तर तो तब्येतीसाठी खूपच पोषक ठरतो. या लाडूमुळे आणि त्यात असलेल्या तुपामुळे थंडीत हाडांची होणारी झीज रोखली जाते आणि संपूर्ण शरीर आतून मॉईश्चराईज होते. फक्त हे लाडू बनविताना त्यात साखरेऐवजी गुळ घाला.
३. व्हिटॅमिन सी असणारी फळं
हिवाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. सर्दी- खोकला असे आजार झालेल्या व्यक्तीच्या सहवासात आपण थोडा वेळ जरी बसलो तरी बऱ्याचदा त्यांचा संसर्ग आपल्याला होतो. त्यामुळे अशा काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती सर्वोत्तम असणे खूप गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारी फळं खाणं गरजेचं आहे. त्यामुळे हिवाळ्यात संत्री, मोसंबी, आवळा अशी फळं नियमितपणे खायला पाहिजे.
४. हिरव्या पालेभाज्या
भाज्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हिवाळा हा अतिशय मस्त ऋतू आहे. कारण हिवाळ्यात मेथी, पालक, करडी अशा सगळ्याच पालेभाज्या अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे पालेभाज्या खाण्याचा सगळ्यात जास्त आनंद हिवाळ्यातच मिळतो. हिवाळ्यात मिळणारी पालेभाज्यांची ही मेजवाणी अजिबात चुकवू नका. मेथी, करडी, कोथिंबीर जास्तीत जास्त कच्ची खाण्याचा प्रयत्न करा. कारण या भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात लोह, प्रोटीन्स, फायबर्स असतात. त्यामुळे आपली पचनशक्ती तर सुधारतेच पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
५. गाजर
सध्या हायब्रिड गाजर अगदी वर्षभरदेखील मिळतात. पण गाजराचा मुळ हंगाम हिवाळ्यातच असतो. त्यामुळे हिवाळ्यात जास्तीतजास्त गाजर खा. गाजराचं लोणचं, गाजराचा हलवा, गाजराचा ज्यूस किंवा गाजराचं सॅलड अशा कोणत्याही पद्धतीने गाजर खाल्लं तरी ते हिवाळ्यात आरोग्यदायीच आहे. कारण गाजरामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे अंगातली ताकद टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात नियमितपणे गाजर खावं.