उच्च रक्तदाब ही आरोग्यविषयक समस्या हायपरटेन्शन नावानेही ओळखली जाते. जीवनशैलीशी संबधित हा आजार केवळ पुरुषांनाच होतो हा गैरसमज असून महिलांनाही हायपर टेन्शनचा पुरुषांइतकाच धोका असतो असं संशोधन आणि अभ्यास सांगतो. आपल्याला रक्तदाबाशी निगडित कोणताही आजार होणार नाही असा समज बाळगून गाफिल राहू नये, रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे उपाय हा आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग असायला हवा अस्ं तज्ज्ञ म्हणतात. महिलांना पुरुषांइतकाच रक्तदाबाचा / हायपर टेन्शनचा धोका असतो हे खरं मात्र, महिला आणि पुरुषांमधील रक्तदाबाची कारणं मात्र वेगवेगळी असतात.
Image: Google
का असतो महिलांना हायपर टेन्शनचा धोका?
महिलांना रक्तदाबाची समस्या का होते? यावर संशोधन आणि अभ्यास झालेला आहे. या अभ्यासातले निष्कर्ष महिलांना वेगवेगळ्या कारणांनी महिलांना रक्तदाबाचा त्रास होतो हे सांगतात.
1. महिलांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शारीरिक मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. विशेषत: गरोदरपण, गर्भनिरोधक गोळ्या घेणे, मेनोपाॅज काळात आणि मेनोपाॅजनंतर महिलांना हायपर टेन्शनचा धोका असतो.
2. ज्या महिलांना गरोदरपणात रक्तदाबाचा त्रास होतो , ज्या धूम्रपान करतात आणि ज्यांचं वजनही जास्त आहे अशा महिलांना रक्तदाबाचा धोका पुढेही असतो.
3. गरोदरपणात 20 आठवड्यानंत्र होणारा रक्तदाबाचा त्रास हा 'गॅस्टेशनल हायपरटेन्शन ' म्हणून ओळखला जातो. प्रसूतीनंतर हा त्रास बरा होतो. मात्र तज्ज्ञ म्हणतात गॅस्टेशनल हायपरटेन्शनवर योग्य वेळी योग्य उपचार होणे आवश्यक असतं.
4. किशोरावस्थेत पाळी सुरु होण्यापूर्वी, मायग्रेनच्या त्रासात मुलींमध्ये रक्तदाबाची समस्या आढळते.
5. गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांना रक्तदाबाचा त्रास होतो/ धोका असतो.
6. मेनोपाॅज सुरु होण्यापूर्वी, मेनोपाॅज सुरु असताना हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. या बदलांमुळे महिलांमध्ये रक्तदाब आढळतो. तसेच मेनोपाॅजपूर्वी रक्तदाबाचा त्रास नसला तरी मेनोपाॅजमध्ये हार्मोन्समधील बदल, वजन वाढणं यामुळे रक्तदाबाचा त्रास होतो.
7. वजन जास्त असणं, रक्तदाबाच्या बाबतीत अनुवांशिकता असणं, बैठी जीवनशैली असणं, व्यायामाचा कंटाळा/ अभाव, अनियंत्रित खाणं पिणं, धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यसेवन , अती प्रमाणात ताण घेण्याचा स्वभाव यामुळे महिलांमध्ये रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
Image: Google
रक्तदाबाची समस्या असल्यास/ धोका टाळायचा असल्यास?
1. नियमित व्यायाम, आठवड्यातून पाच दिवस रोज अर्धा ते पाऊण तास व्यायाम करणं. दिवसभर कार्यशील राहाणं. एका जागी तासनतास बसणं टाळणं.
2. उष्मांक नियंत्रित, फायबरयुक्त आणि पोषण मुल्यांनी संपन्न आहार घेणे.
3. आहारात मीठ आणि सोडियमचं प्रमाण कमी असणं. फास्ट फूड, बाहेरचं खाणं टाळणं.
4. धूम्रपान, अल्कोहोल सेवन , तंबाखू सेवन टाळणं.
5. वजन नियंत्रित ठेवणं.
6. चाळीशीनंतर नियमित रक्तदाब तपासणं आवश्यक आहे.
या उपायांद्वारे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. रक्तदाबाचा धोका टाळता येतो.