महिलांच्या दृष्टीने कोरोनाचे एक ते दिड वर्ष खूपच त्रासदायक ठरले. पुरूषांनाही हा त्रास सहन करावा लागला यात वादच नाही. पण महिलांना शारिरीक आणि मानसिक या दोन्ही आघाड्यांवर लढावे लागले. संपूर्ण कुटूंबाच्या आरोग्याची काळजी त्या घरातल्या महिलेवरच असते. त्यामुळे काेरोनाकाळात आपले कुटूंब सुरक्षित रहावे, यासाठी महिलांनी अक्षरश: डोळ्यात तेल घालून आपल्या कुटूंबाला जपले. यासाठी वेगवेगळे काढे, औषधी इथपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीतही मोठा बदल केला.
महिलांचे काम इथवरच थांबले नाही. कोरोनाकाळात घरकाम करण्यासाठी येणाऱ्या मदतनीसांची मदत घेणेही बहुतांश घरांमध्ये बंद झाले होते. त्यामुळे स्वयंपाकापासून ते अगदी धुणी- भांडी करण्यापर्यंत सर्व शारिरीक कष्ट महिलांनी सोसले. यामध्ये अर्थातच अनेक जणींना त्यांच्या कुटूंबियांची मदत झाली पण शेवटी घरातली कर्ती स्त्री म्हणून महिलांना कामाचा मोठा ताण सहन करावा लागला. वर्किंग वुमनला तर या काळात घरकाम सांभाळून ऑफिसचे कामही करावे लागले.
लॉकडाऊन काळात अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. त्यामुळे बहुसंख्य कुटूंबांना आर्थिक झळ सोसावी लागली. बंद झालेले किंवा कमी झालेले उत्पन्न, यामुळे कुटूंबाचा खर्च भागविताना करावी लागणारी कसरत, उत्पन्न थांबल्यामुळे मानसिक त्रासातून जाणाऱ्या पतीला सावरणे, अशाही अनेक त्रासांमधून महिलांना जावे लागले. यामुळे अनेक महिलांना कमी वयातच हायपर टेन्शनचा त्रास सुरू झाला आहे.
जागतिक आराेग्य संघटनेने नुकतेच एक संशोधन केले आहे. यानुसार जगभरात गेल्या ३० वर्षांमध्ये हायपर टेन्शनने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा आकडा ६.५ अब्जांवरून १२. ७ अब्जांपर्यंत पोहोचला आहे. त्यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे.
हायपरटेन्शनची कारणे - बदलती जीवनशैली - कामाचा ताण - सततचे जागरण - व्यायामचा अभाव - चिंता - झोपे कमी होणे - चुकीचा आहार - लठ्ठपणा
हायपर टेंशनची लक्षणे वयाच्या तिशी- पस्तीशीमध्ये खूपच कमी लोक स्वत:चे बीपी तपासतात. तपासणीच न केल्यामुळे आपल्याला रक्तदाब आहे की नाही, हे देखील समजत नाही. म्हणून हायपर टेन्शनची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. - थकल्यासारखे वाटणे - झोप न येणे, पण सारखे सुस्तावल्यासारखे वाटणे - हृदयाचे ठोके वाढणे - चक्कर येणे - छातीत दुखणे - सर्दी नसतानाही जोरात श्वास घ्यावा लागणे. श्वासाचा आवाज येणे.
हायपर टेन्शन कमी करण्यासाठी - आहारावर नियंत्रण ठेवा - रात्रीचे जागरण करू नये - वजन कमी करणे - दररोज नियमितपणे व्यायाम करणे किंवा ३० मिनिटे चालणे - मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करणे - मीठाचा वापर कमी करणे. कोणत्याही पदार्थावर वरून मीठ घेणे टाळावे.
- पोटॅशियम जास्त असणारे केळी, भोपळा असे पदार्थ नियमित खाणे. - व्यसनांवर नियंत्रण - चिंता, ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे. खूप विचार न करणे. - मन सकारात्मक ठेवण्यासाठी योगा करणे.