हृदयरोग हा गेल्या काही वर्षातील वाढलेली आरोग्या समस्या आहे. हृदयावर विविध कारणांनी येणारा ताण, रक्तवाहिन्यांमध्ये होणारे ब्लॉकेजेस, आहाराच्या चुकीच्या पद्धती आणि व्यायामाचा अभाव ही आपल्याला माहित असलेली काही सामान्य कारणे आहे. पण पुरुषांमध्ये या समस्येचा होणारा त्रास आणि स्त्रियांमध्ये होणारा त्रास यामध्ये बराच फरक असल्याचे दिसते. नुकताच हृदयरोगाविषयी एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये भारतासह ५० देशांचा समावेश करण्यात आला होता. जवळपास १५ अभ्यासांच्या विश्लेषणानुसार हृदयविकाराच्या समस्यांचे निदान आणि उपचार करताना स्त्रियांना त्याचा जास्त प्रमाणात त्रास भोगावा लागतो. महिलांना छातीतील वेदना पुरुषांपेक्षा काही प्रमाणात जास्त होत असल्याचे यामध्ये या अहवालात नोंदवण्यात आले आहे (Women Suffer More Than Men In Cardiac Issues).
आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्क्युलर बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात याबद्दलची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. हृदयविकार असलेल्या महिलांमध्ये उलट्या होणे, जॉईंट पेन आणि पोटात दुखणे या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे दिसते. अनेकदा महिलांना हृदयाच्या तक्रारींमुळे छातीतही वेदना होतात. तरुण वयात म्हणजेच वयाच्या ३५ ते ५१ वर्षे वयात हार्ट अॅटॅक येणाऱ्या तरुणींच्या संख्येत गेल्या काही वर्षात साधारण २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्ट अॅटॅक किंवा हार्टशी निग़डीत समस्यांमध्येही वेगावे वाढ होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
महिलांना सतत असणारे ताणतणाव हेही हृदयरोगाचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. महिलांमध्ये असणारे हार्मोन्स पुरुषांपेक्षा वेगळे असल्याने कदाचित त्यांना हृदयरोगाचा जास्त त्रास होत असावा असा अंदाज काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी महिलांनी हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. सतत तणावाखाली न राहणे, नियमित व्यायाम आणि उत्तम आहार घेणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.