Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बायकांचं 'सांगता न येणारे' नाजूक दुखणे! हा अवघड जागेचा त्रास होतो कशाने..

बायकांचं 'सांगता न येणारे' नाजूक दुखणे! हा अवघड जागेचा त्रास होतो कशाने..

' माझ्याकडे लक्ष द्या, मला भावनिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक, वैवाहिक त्रास होतोय, तो मला सांगता येत नाही '- हे अनेक बायकांचं खरं 'दुखणं' असतं! यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 04:33 PM2021-10-12T16:33:26+5:302021-10-12T16:47:47+5:30

' माझ्याकडे लक्ष द्या, मला भावनिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक, वैवाहिक त्रास होतोय, तो मला सांगता येत नाही '- हे अनेक बायकांचं खरं 'दुखणं' असतं! यावर उपाय काय?

Women's suffers pains but can't tell about.. Why this happened? | बायकांचं 'सांगता न येणारे' नाजूक दुखणे! हा अवघड जागेचा त्रास होतो कशाने..

बायकांचं 'सांगता न येणारे' नाजूक दुखणे! हा अवघड जागेचा त्रास होतो कशाने..

Highlightsप्रदर म्हणजे बरेचदा अन्य त्रासाची अन्योक्ती. लेकी बोले सुने लागे, असा प्रकार. ‘कसंतरी होणे’ छाप तक्रारी उद्भवल्या तर, बायका त्याचा संबंध ‘धातू जाण्याशी’ जोडतात आणि नॉर्मल स्त्रावही मग तक्रारीचं स्वरूप घेतात. कुचंबणेचा शरीर भाषेत उद्गार होणे हर एक देशी दिसते. त्या त्या संस्कृतीनुरूप आजाराची लक्षणेही ठरलेली असतात. लोककथा असतात तशा ह्या ‘लोकव्यथा’.

- डॉ. शंतनू अभ्यंकर

आजकाल काही बायकांना अति स्वच्छतेची बाधा होते. दोन थेंब साबणात भांडी स्वच्छ आणि निर्जंतुक. मग, त्या हात धुवून शरीरशुद्धीच्या मागे लागतात. मग, चेहऱ्याचा, हाताचा, पायाचा, अंगाचा असे वेगवेगळे खास साबण घेतात. इथे मळापेक्षा परिमळाला महत्त्व असतं. अशात योनीशुद्धीसाठी खास साबणाचा शोध लागतो. पण, यातल्या काही प्रकारांनी तिथल्या आरोग्य-जंतूंची वस्ती उद्ध्वस्त होते आणि मग, नको ते जंतू (गार्डेनेल्ला व्हजायनॅलीस) वस्तीला येतात. याला म्हणतात बॅक्टेरियल व्हजायनॉसिस. मग पांढरा, पातळ, धुरकट, हिरव्या रंगाचा स्त्राव जातो. लघवीला जळजळ, खाज अशा तक्रारी सुरू होतात. यासाठी पाच ते सात दिवस औषधे घ्यावी लागतात. हा वसा पूर्ण करावा. घेतला वसा टाकला तर, वारंवार त्रास ठरलेला. शरीरसंबंधही काही काळ टाळावेत. म्हणजे शरीरसंबंधातून पुन्हा पुन्हा लागण होणार नाही.
कधीकधी इतर काही कारणे अँटीबायोटिक्स दिली जातात आणि ती योनीमार्गातील परोपकार-जीवींचाही खातमा करतात. कधी स्टिरॉईडस दिली जातात. प्रतिकारशक्ती रोडावते. मग रोगजंतू आपला डाव साधतात. कधी कधी अन्य कारणांनी इथे रोगजंतू प्रविष्ट होतात. अन्य रोगजंतूंमध्ये गुप्तरोग, ट्रायकोमोनस, बुरशी हे कॉमन. लघवीचे इन्फेक्शन, गर्भमुखाला इजा/सूज, कुपोषण, ॲनिमिया, डायबेटीस, अस्वच्छता हे पूरक घटक. ट्रायकोमोनास हा एक सूक्ष्मजीव (Protozoa) आहे. हा ठाण मांडून बसला तर, पांढरा, पिवळा, फेसाळ स्त्राव जातो, किंचित वास येतो, खाज सुटते, जळजळ होते, सारखी लागते. हा आजारही जोडीदाराकडून येऊ शकतो. तेव्हा गरजेप्रमाणे कंडोम वापरलेला बरा. पांढरे जाण्यात कँडीड ही बुरशी कुप्रसिद्ध आहे.

Image: Google

काळजी कशी आणि काय घेणार?

प्रदर होऊ नये किंवा वारंवार उद्भवू नये म्हणून नीट काळजी घेतली पाहिजे.

१. शी-शू झाल्यावर, बाह्यांग पुसून घेताना, नेहमी पुढून पाठीमागे असे पुसावे. शीच्या जागेकडून शूच्या जागेकडे पुसल्यास, शीच्या जागेचे जंतू, वाटेत, योनीमार्गात ढकलले जाऊ शकतात.

२. दिवसा सुती अंतर्वस्त्र वापरावीत आणि रात्री वापरूच नयेत. खेळ, पार्टी, वगैरे वेळी वापरायचे अतिघट्ट कपडे तेवढ्या पुरतेच वापरावेत. यांनीही इन्फेक्शनचा त्रास वाढतो.

३.आजकाल अनेक प्रकारचे कंडोम मिळतात. रस-रंग-गंध-स्पर्श अशी सारी सुखें त्यात सामावलेली असतात. पण, ह्यातल्या काहींतील काही घटकांची ॲलर्जी म्हणूनही पांढरे जाऊ शकते.

Image: Google

४. आपल्याकडे लैंगिक स्त्रावांना ‘धातू’ असं नाव प्रचलित आहे. धातू मौलिक असून जपावे लागतात असं समजलं जातं. धातू वाहून जाण्याने अशक्तपणा, अंगदुखी, चक्कर, ‘कसंतरी होणे’ असे अनेक दोष होतात, अशीही समजूत आहे. तेव्हा ‘कसंतरी होणे’ छाप तक्रारी उद्भवल्या तर, बायका त्याचा संबंध ‘धातू जाण्याशी’ जोडतात आणि नॉर्मल स्त्रावही मग तक्रारीचं स्वरूप घेतात.

५. लोकमानसातील शरीरशास्त्रानुसार एक थेंब धातू तयार होण्यासाठी शंभर थेंब रक्त लागतं. अशी जर, समजूत असेल तर, असं होणारच. विविध शारीरिक तक्रारींसाठी ‘धातू जातोय’ हे एकच कारण चिकटवणारे, त्यापायी कुढणारे आणि लिंग वैदूंच्या जाहिरातींना बळी पडणारे, पुरुषही आहेतच.

६. प्रदर म्हणजे बरेचदा अन्य त्रासाची अन्योक्ती. लेकी बोले सुने लागे, असा प्रकार. माझ्याकडे लक्ष द्या, मला भावनिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक, वैवाहिक त्रास होतोय, तो मला सांगता येत नाही, सबब प्रदर ही तक्रार ! म्हणजे आता निदान डॉक्टरकडे जाता येईल, कुणाबरोबर तरी बोलता येईल, कदाचित डॉक्टर मनीची व्यथा ओळखून घेईल.. अशी आशा, अपेक्षा म्हणजे प्रदर. हे त्या तक्रारीचं योग्य भाषांतर.

Image: Google

असला प्रकार फक्त भारतात आढळतो असं नाही. कुचंबणेचा शरीर भाषेत उद्गार होणे हर एक देशी दिसते. त्या त्या संस्कृतीनुरूप आजाराची लक्षणेही ठरलेली असतात. लोककथा असतात तशा ह्या ‘लोकव्यथा’. शरीररचना आणि कार्य यांच्या बद्दलच्या लोकांतील समजुतींमुळे उद्भवणाऱ्या व्यथा. आपल्याकडे तेल, तूप, अंडी, मांस वगैरे ‘उष्ण पदार्थ’ खाल्ल्याने शरीरातील ‘हीट वाढते’ आणि परिणामी पांढरे जाते असाही प्रवाद आहे.

इराणी बायकांच्या कुचंबणेचा उद्गार छातीत दुखणे, धडधड होणे अशा हृदय-विकारांनी होतो म्हणे. दक्षिण अमेरिकेत नर्व्हीओस नावाचा असाच एक अ-वैद्यकीय आजार आहे. चक्कर चिंता आणि धाप अशी लक्षणे आढळतात म्हणे. चिनी बायकां-पुरुषांत मुंग्या येणे, अशक्तपणा, चक्कर हे त्रास-त्रिकुट संस्कृतीसंमत आहे.

प्रदर या तक्रारीला असे सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक पदर आहेत. अर्थात प्रत्येक दुखण्याला असतात ते. दुखणं, हे काही निव्वळ शारीरिक दुखणं असेल असं नाही. म्हणूनच पांढरं जातंय, असं सांगणाऱ्या बहुतेक बायकांना, तपासणीत शून्य भोपळा त्रास आढळतो. म्हणूनच कँडीडा, ट्रायकोमोनास, गार्डेनेल्ला अशा भारदस्त नावाचे जंतू नावालाही आढळत नाहीत, पण, तक्रार मात्र सर्रास प्रदर ! हा प्रकार नॉर्मल आहे. तुम्हाला औषधाची गरज नाही’, असं सांगायला अधिक धैर्य लागतं. हे ब्रह्मवाक्य आहे असं सर म्हणाले ते, काही उगीच नाही.

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत)

faktabaykanbaddal@gmail.com

Web Title: Women's suffers pains but can't tell about.. Why this happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.