निस्वार्थीपणानं केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान ठरतं. रक्तदान हे असंच निस्वार्थी दानापैकी एक समजलं जातं. जीव वाचवणाऱ्या रक्तदानाला सामाजिक दृष्टीकोनातून फार महत्व आहे. पण हे उत्तम आणि महत्वाचं काम इतरांनी करावं आपण नाही कारण रक्तदानाशी निगडित गैरसमज. या गैरसमजामुळेच रक्तदान हे उत्तम असतं हे माहीत असूनही ते करायला मन धजावत नाही. रक्तदानाशी निगडित गैरसमज असले तरी ते खोडून काढणारे शास्त्रीय उत्तरं देखील आहेत. तज्ज्ञ म्हणतात की इतरांच्या फायद्यासाठी प्रत्येक सुदृढ व्यक्तीनं रक्तदान हे करायलाच हवं.
Image: Google
रक्तदान आणि गैरसमज
-डाॅ. राणी प्रेम कुमार
1. रक्तदान केल्यानं फार अशक्तपणा येतो.
रक्तदानाच्या प्रक्रियेत शरीरातील एकूण 5 लिटर रक्तापैकी केवळ 350 मिली एवढंच रक्त घेतलं जातं. हे रक्तही 24 तासाच्या आत शरीरात पुन्हा तयार होतं. त्यामुळे रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो हा केवळ गैरसमज असून याला काहीही शास्त्रीय आधार नाही.
2. रक्तदान केल्यानंतर पूर्ण आराम करावा लागतो.
रक्तदानानंतर तो किंवा ती आपली नेहमीची कामं सहज करु शकतात. फक्त रक्तदान केलं त्यादिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं दिवसभरात 10-12 ग्लास पाणी पिणं. जास्त उन्हात जाणं टाळावं. रक्तदान केल्यानंतर पुढील 2-3 तास वाहन चालवू नये. एवढी काळजी घेऊन रक्तदान केलेली व्यक्ती आपली दैनंदिन कामं विना अडथळा करु शकते.
3. रक्तदान ही खूपच वेदनादायी प्रक्रिया आहे.
रक्तदान ही अजिबात वेदनादायी प्रक्रिया नाही. रक्ततपासणी करताना शरीरात जशी सूई टोचली जाते तेव्हा जेवढी मुंगी चावल्याप्रमाणे वेदना होते तितकीच वेदना रक्तदान करताना होते. त्यामुळे रक्तदान अजिबत वेदनादायी प्रक्रिया नाही.
Image: Google
4. सतत रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो.
कोणतीही सुदृढ व्यक्ती वर्षातून तीन महिन्याच्या अंतराने 4 वेळा रक्तदान करु शकते. वर म्हटल्याप्रमाणे दिलेलं रक्त 24 तासांच्या आत शरीरात तयारही होतं. त्यामुळे रक्तदानानं शरीरास अशक्तपणा येत नाही.
5. रक्तदान केल्यानं डोकं दुखतं, उलट्या होतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते
रक्तदान हे सुदृढ व्यक्तीच करु शकते. रक्तदान केल्यानं रक्तदाबाशी निगडित कोणतीही समस्या निर्माण होत नाही. त्यामुळे रक्तदान केल्यानं डोकं दुखत नाही की उलट्या होत नाही. रक्तदान करणारी व्यक्ती ही सुदृढच असते. रक्तदान केल्यानं तिच्यात कोणत्याही आरोग्यविषयक समस्या निर्माण होत नाही. रक्तदानानंतर तर फिट राहाण्याचं महत्व त्या व्यक्तीत वाढलेलंच आढळतं. ती व्यक्ती व्यायाम आणि आहार याद्वारे स्वत:चा फिटनेस आणखी वाढवत असल्याचं आढळून आलं आहे त्यामुळे रक्तदानानं रोगप्रतिकारशक्ती कमी होते हा केवळ गैरसमज आहे.
Image: Google
6. रक्तदान केल्यानं रक्तदाब, रक्तातील साखर वर खाली होते
मुळात रक्तदान हे सुदृढ व्यक्तीच करु शकते. मधुमेह असलेल्या व्यक्ती रक्तदानासाठी पात्रं नसतात. आणि रक्तदानानंतर रक्तदाब वाढत किंवा कमी होत नाही. हायपर टेन्शन, रक्तदाबाशी निगडिर्त समस्या असलेल्या व्यक्ती रक्तदानास पात्रं नसतात.
7. सतत रक्तदान केल्यानं शरीरातील लोह कमी होतं.
सुदृढ व्यक्ती जिच्या खाण्यापिण्याच्या सवयी अगदी आरोग्यदायी आहेत, ते वर्षातून 4 वेळा सहज रक्तदान करु शकतात. यामुळे त्यांच्या शरीरात कोणत्याही पोषण मुल्यांची कमतरता निर्माण होत नाही.
8. रक्तदाना खूप वेळ लागतो.
रक्तदानाच्या प्रक्रियेचं नोंदणीकरण ते प्रत्यक्ष रक्तदान या पूर्ण प्रक्रियेस केवळ अर्धा तास लागतो.
9. रक्तदान केल्यानं आजाराचा संसर्ग होतो.
रक्तदानासाठी रक्त घेताना डिस्पोजेबल निडल्स वापरल्या जातात. तसेच घेतलेल्या रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या करुन रक्त सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. त्यामुळे रक्तदान केल्यानं आजारांचा संसर्ग होत नाही.
10. रक्तदान केल्यानं स्थूलत्व येतं.
रक्तदानाचा आणि स्थूलतेचा काहीच संबंध नसतो. रक्तदानानंतर शरीरातलं रक्त कमी झालं या समजानं काहीजण जास्त खातात, व्यायाम करणं टाळतात यामुळे वजन वाढू शकतं> पण रक्तदानाचा आणी स्थूलतेचा थेट संबंध नाही.
Image: Google
रक्तदान आणि महिला
-सुजाता सोनवणे ( मेडिकल ऑफिसर, जनकल्याण रक्तपेढी, नाशिक)
1. कोणतीही सुदृढ महिला रक्तदान करु शकते. सुदृढ म्हणजे जिचं वय 18 ते 65 दरम्यान आहे. वजन 45 ते 55 किलोग्रॅम आहे, नाडीचे ठोके दर मिनिटाला 72 हवेत, शरीराचं तापमान सामान्य हवं. रक्तदाब 120 बाय 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असतं ( रक्तदाब याच्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही), हिमोग्लोबीन 12 ग्रॅम टक्क्यांच्या वरच हवं.. अशा महिला रक्तदानासाठी पात्रं समजल्या जातात.
2. महिलेला कोणता आजार असल्यास, औषधोपचार सुरु असल्यास त्या महिला रक्तदान करु शकत नाही. प्रसूतीनंतर सामान्य प्रसूती झालेल्या महिला सहा महिन्यानंतर तर सीझर झालेल्या महिला वर्षभरानंतर रक्तदान करु शकतात. स्तनपान करणाऱ्या महिला रक्तदान करु शकत नाही.
3. 12 तासाच्या आत/ 24 तासांच्या आत अल्कोहोल घेतलेल्या महिला रक्तदान करु शकत नाही.
4. महिनाभराच्या आत अंगावर टॅटू केलेलं असल्यास रक्तदान करता येत नाही.
5. नुकांच लसीकरण झालेलं असल्यास ( 28 दिवसांच्या आत) रक्तदान करता येत नाही.
6. मासिक पाळीतही रक्तदान करता येतं. पण अनेकजणींना भीती वाटते. पाळीत आधीच रक्तस्त्राव होतो. कोणाला उलट्या मळमळीचा त्रास असतो त्यामुळे अशा महिलांना पाळीत रक्तदान करण्याची भीती वाटते. पाळीनंतर पाच दिवसांनी महिला रक्तदान करु शकते. पाळीतही सुदृढ या कक्षेत येणारी महिला रक्तदान करु शकते.