Join us   

World cancer day : स्त्रियांना होण्याची शक्यता असलेले ५ कॅन्सर, ते कसे टाळता येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2023 4:56 PM

Top 5 Cancers Affecting Women : Cancer Prevention Basic Tips To Reduce Your Risk : भारतीय महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. आज कर्करोग दिनानिमित्त स्त्रियांमधील कॅन्सर या विषयाबद्दल माहिती घेऊयात.

कॅन्सर अर्थात कर्करोगाचं (Cancer) निदान झालं तर संबंधित रुग्णासह त्याच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतं. कॅन्सर हा जीवघेणा आजार समजला जातो. कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आढळून येतात. त्यापैकी बहुतांश प्रकार हे महिला आणि पुरुष अशा दोघांमध्ये दिसून येतात. मात्र काही प्रकार हे केवळ महिलांमध्ये (Women) दिसतात. भारतीय महिलांमध्ये हा कॅन्सर होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. आज कर्करोग दिनानिमित्त स्त्रियांमधील कॅन्सर या विषयाबद्दल माहिती देताना  कॅन्सर म्हणजे काय? महिलांमध्ये प्रामुख्याने होणारे कॅन्सरचे ५ प्रकार कोणते आहेत? त्यावर प्राथमिक उपाय काय करता येतील... याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेऊयात (The Top 5 Cancers Affecting Women : Cancer Prevention Basic Tips To Reduce Your Risk).   

कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?  शरीरामध्ये असाधारण पेशींची वाढ होणे, त्याची वाढ अनियंत्रित असणे, त्यामुळे एखाद्या अवयवांमध्ये ही घटना घडून त्याचे पर्यवसान कर्करोगात होते. या पेशींची वाढ खूप झपाट्याने होते. त्यांच्यामध्ये निकटच्या अवयवांमध्ये लागण होण्याची क्षमता असते. त्यामुळे हा आजार लवकर पसरला जातो व वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हा आजार मृत्यूला कारणीभूत ठरतो. 

महिलांमध्ये प्रामुख्याने होणारे कॅन्सरचे ५ प्रकार... 

१. स्तनांचा कॅन्सर - महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये या प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्तनामध्ये अनियंत्रित पद्धतीने गाठी होणे, पेशींची अनियमित वाढ होणे हे या प्रकारच्या कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे. 

 प्राथमिक उपाय काय आहेत ?  १. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी दर वर्षी मॅमोग्राफी म्हणजे यंत्राद्वारे स्तन तपासणी करून घ्यावी. २. ६० वर्षे वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी वर्षातून दोन वेळा मॅमोग्राफी करावी. ३. ज्या महिलांच्या कुटुंबात कॅन्सरची अनुवंशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्या खूप स्थूल आहेत अशांनी दुर्लक्ष किंवा कंटाळा न करता सदर तपासण्या अवश्य करून घ्याव्यात.

२. गर्भाशयाचा कॅन्सर - गर्भाशयाच्या आतील अस्तरात जेव्हा पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागते तेव्हा अशा पद्धतीचा कॅन्सर झालेला असण्याची शक्यता असते. मासिक पाळी दरम्यान अतिशय जास्त प्रमाणात रक्तस्राव हे याचे प्रमुख लक्षण आहे. अगदी सुरुवातीला ह्या कॅन्सरचे निदान झाले तर शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढून टाकून या कॅन्सरवर सहजपणे मात करता येऊ शकते.

प्राथमिक उपाय काय आहेत ?  १. मासिक पाळी दरम्यान खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असणाऱ्या महिलांनी याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. २. डॉक्टरांना आवश्यक वाटल्यास किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार गर्भाशयाच्या आतील बाजूच्या अस्तराची तपासणी म्हणजेच बायोप्सी करून कॅन्सर आहे किंवा  नाही याचे निदान करता येते.

३. आतड्यांचा कॅन्सर - या पद्धतीचा कॅन्सर गोठे आतडे आणि गुदाशय येथील पेशींच्या अनियमित वाढीमुळे होऊ शकतो. शरीराचे हे दोन्ही भाग पचनाशी निगडित आहेत. या पद्धतीचा कॅन्सर होणे काही अंशी आनुवंशिक असले तरी बैठी जीवनशैली आणि वाढलेले वजन देखील त्यासाठी कारणीभूत होऊ शकते.

प्राथमिक उपाय काय आहेत ? १. ज्या महिलांना बद्धकोष्ठता, मलावरोध अशा शारीरिक तक्रारी आहेत तसेच ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी कोलोनोस्कोपी, कॉम्प्युटरच्या सहाय्याने कोलोनोग्राफी या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात.  २. पॅथॉलॉजी लॅबमध्ये स्टूल टेस्ट दरवर्षी करावी. 

४. अंडाशयाचा कॅन्सर - महिलांच्या ओव्हरी म्हणजेच अंडाशयात होणारी पेशींची अनियमित वाढ म्हणजेच अंडाशयाचा कॅन्सर. याची लक्षणे सुरुवातीला लवकर दिसून येत नाहीत. महिलांकडून या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. पोट फुगलेले असणे, पोटात जड वाटणे अशा लक्षणांकडे दुसऱ्याच काही कारणांमुळे असे होत आहे असे वाटून दुर्लक्ष केले जाते.

प्राथमिक उपाय काय आहेत ?  १. या कॅन्सरच्या तपासणीसाठी ३० वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिलांनी ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाउंड तपासणी करून घ्यावी.  २. याचबरोबर सीए १२५ ही तपासणी देखील करता येते. त्याबद्दल तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ३. ज्यांच्या परिवारात ओव्हेरियन कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री आहे अशा महिलांनी या तपासण्या अवश्य करून घ्याव्यात. 

५. गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर - आधी साधारणपणे वयाच्या ३८,३९ व्या वर्षी अशा पद्धतीचा कॅन्सर होण्याची उदाहरणे समोर येत असत. परंतु आता हे वय १५ पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे या कॅन्सर बद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यक बनले आहे.

प्राथमिक उपाय काय आहेत?  १. २१ वर्षापर्यंतच्या महिलांना या पद्धतीच्या कॅन्सरच्या तपासणीची तितकीशी आवश्यकता नसते. परंतु ११ ते १९ वयादरम्यान दर तीन वर्षांनी पॅप स्मिअर पद्धतीने पेशींची तपासणी करून घ्यावी.  २. ३० ते ६५ वयादरम्यान दर पाच वर्षांनी पॅप स्मिअर पद्धतीची तपासणी करून घ्यावी. ३. ६५ वर्षे वयानंतर आधी तपासणी करून झाली असेल आणि काही त्रास नसेल तर तपासणी करण्याची आवश्यकता नाही.  ४. ज्या महिलांची गर्भाशय काढून टाकण्याची शस्रक्रिया झाली आहे त्यांना ह्या तपासणीची आवश्यकता नाही.  ५. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरवर असणारी लस घेतली असल्यास अशा पद्धतीच्या तपासणीची आवश्यकता नाही. अशी लस आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येते.

टॅग्स : कर्करोगहेल्थ टिप्स