१४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून ओळखला जातो. सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे जगभरातच डायबिटीस आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. भारतात तर दरवर्षी मधुमेहींचे वाढत जाणारे प्रमाण चिंताजनक आहे. आजकाल तरुण वयातच अनेकांना हा आजार जडत आहे. म्हणूनच या आजाराविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभुमीवर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती तथा गायक निक जोनास (Priyanka Chopra's husband Nick Jonas) याने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून त्यामध्ये तो त्याचा डायबिटीसचा स्वानुभव (4 Common Symptoms of Diabetes) सांगतो आहे.
कोणताही आजार जडण्यापुर्वी आपलं शरीर आपल्याला त्यासंबंधीच्या सूचना नक्कीच देत असतं. पण कधी कधी आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. किंवा मग आपल्या शरीरात होणारे बारीकसे बदल आपण ओळखूच शकत नाही. ही लक्षणं वेळीच ओळखली आणि त्यांच्याकडे गांभिर्याने लक्ष दिलं, तर नक्कीच आजार गंभीर स्वरुपात बदलण्याआधी आपण तो ओळखू शकतो. म्हणूनच निकने शेअर केलेला व्हिडिओ प्रत्येकासाठीच अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. यामध्ये त्याने त्याला डायबिटीसचे निदान होण्यापुर्वी नेमकी कोणकोणती लक्षणं जाणवली होती, याविषयीची थोडक्यात माहिती दिली आहे.
निक जोनासने सांगितलेली डायबिटीजची पुर्वलक्षणे
१. वेटलॉस
वजन कमी करण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न न करताही वजन कमी होत असल्याचं जाणवत असेल, तर ते डायबिटीसचं एक लक्षण असू शकतं. यामुळे मग थकवा, अशक्तपणाही जाणवू लागतो.
डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये, मधुमेहींसाठी ५ व्यायाम, नियमित करा- फिट रहा
२. सारखी तहान लागणे
भरपूर पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. पण घशाला सारखी कोरड पडते आहे. घसा सुकल्यासारखा होतो, असं वारंवार होत असेल आणि सारखी तहान लागत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३. वारंवार लघवी लागणे
मधुमेहींना वारंवार लघवीला जावे लागते. त्यामुळे या त्रासाकडेही दुर्लक्ष नकोच.
४. चिडचिड होणे
डायबिटीस होण्यापुर्वी असाही त्रास निकला जाणवला होता.