३ वर्षापूर्वी जगात कोरोनाने हाहाकार माजवला आणि लाखो लोकांना यामध्ये प्राण गमवावे लागले. भारतासारख्या मोठी लोकसंख्य असलेल्या देशात तर या संसर्गजन्य आजाराने लोकांचे जगणे अवघड करुन टाकले. गेल्या वर्षभरापासून आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याची गाडी रुळावर येत आहे असे म्हटले जात आहे. मात्र कोरोनानंतर आरोग्याच्या बऱ्याच समस्यांनी जगभरात डोके वर काढले असून हा आजार झालेल्या रुग्णांना नव्याने आरोग्याच्या बऱ्याच समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोरोनामुळे आरोग्याच्या वाढत असलेल्या समस्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न (World Health Day 2023 post covid 19 Common 6 Chronic Illnesses)...
१. मानसिक आरोग्याच्या तक्रारी
भिती, नैराश्य, कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्या, एकाग्रतेत येणाऱ्या अडचणी, नातेसंबंधातील तणाव यांसारख्या तक्रारींमध्ये कोरोनानंतर वाढ झाली. ताणतणाव, घरात बंदिस्त असणे, जवळच्या नातेवाईकांना गमावणे ही त्यामागील प्रमुख कारणे होती.
२. कॅन्सर
कोरोनामुळे झालेल्या संसर्गामुळे त्यानंतर विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली.
३. श्वसन विकार
कोरोनामध्ये रुग्णांना सर्दी, खोकला, कफ, ताप यांसारख्या समस्या झाल्या होत्या. त्याचा परीणाम म्हणून अनेकांना त्यानंतर श्वसनाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागला.
४. हृदयरोग
कोरोना झालेल्या रुग्णांना कोलेस्टोरॉल, ब्लॉकेजेस होणे, हार्ट अॅटॅक, हृदयाच्या कार्यात अडथळे येणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचे जगभरात आढळून आले.
५. डायबिटीस
अनेकांना कोरोनानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून शुगरची समस्या मागे लागली. काहींची शुगर ही कमी कालावधीसाठी होती मात्र काहींची शुगर दिर्घकाळ तशीच राहिली आणि डायबिटीस असणाऱ्यांचे प्रमाण गेल्या ३ वर्षात झपाट्याने वाढले.
६. अस्थमा
अस्थमा म्हणजेच दमा हा कोरोनानंतर उद्भवलेला आणखी एक आजार आहे. शरीरात ऑक्सिजन ओढून घेणे आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकणे यांसारखी नियमित क्रिया करण्यात कोरोना झालेल्या रुग्णांना अडथळा निर्माण व्हायला लागला. म्हणजेच श्वसनाशी निगडीत समस्या वाढल्या.