जागतिक आरोग्य संघटनेने मिठाच्या आहारातील प्रमाणाच्याबाबत एक मार्गदर्शक कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांनी 2025 पर्यंत मीठाचा वापर निम्म्यावर आणण्याचं ठरवलं आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर 25 लाख मृत्यू कमी होतील असा अंदाज आहे. जीवनावश्यक मीठाच्या बाबतीतली ही ताजी बातमी वाचली की मनात काय येतं? जेवणाला तर मिठाशिवाय चव येत नाही. आता तर दात घासण्याच्या टूथ पेस्टमधेही मीठ आहे का हे आवर्जून विचारलं जातं, तिथे मृत्यू टाळण्यासाठी मिठाचं प्रमाण कमी करायचं म्हणजे मीठ खाणं हानीकारक आहे का? असाही प्रश्न पडू शकतो.
Image: Google
मीठ ही आहारातील आवश्यक बाब आहे. केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही मीठ आवश्यक आहे. मिठातून शरीराला सोडियम , पोटॅशिअम, आयोडिन हे महत्त्वाचे घटक मिळतात. पण मीठ आरोग्यासाठी तेव्हाच फायदेशीर असतं जेव्हा ते प्रमाणात खाल्लं जातं. मिठाचे आरोग्यावर दुष्परिणाम तेव्हाच होतात जेव्हा ते प्रमाणापेक्षा अधिक खाल्लं जातं.
Image: Google
काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना?
जागतिक आरोग्य संघटना सांगते, की प्रौढ व्यक्तीने 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ सेवन करु नये. आपल्या शरीराला 2 ग्रॅम सोडियम लागतं. त्यासाठी आहारात 5 ग्रॅम मीठ पुरेसं असतं. अन्नातून शरीराला सोडियम मिळण्याची मर्यादा 1500 मिलिग्रॅम आहे. पण जर आहारातून मिठाचं सेवन जास्त झाल्यास 2300 मिलीग्रॅमपेक्षाही जास्त सोडियम शरीरात जातं. हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटना जेव्हा काही इशारा देते, सल्ला देते तेव्हा तो जगभरात गांभिर्यानं घेतला जातो. म्हणूनच मिठाबाबत आपण आपली जागरुकता वाढवणं ही आपल्या आरोग्याची गरज आहे.
Image: Google
मीठ जास्त खाल्लं तर?
आज भाजीत मीठ जास्त झालं, माझ्याकडून नेहमीच मीठ जास्त टाकलं जातं किंवा मला थोडे खारट पदार्थ आवडतात असं आपण सहज बोलून जातो. पण मीठ जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे समजून घेतलं तर स्वयंपाक करताना मीठ टाकताना हात नक्कीच आखडता घेतला जाईल.
मीठ ही जीवनावश्यक बाब असली तरी मिठाची दुसरी बाजू ही जीवघेणी देखील आहे, हे समजून घ्यायला हवं. मीठ थोड्या प्रमाणात खाल्लं तर आरोग्यासाठी उत्तम पण थोडं जरी जास्त झालं तरी ते घातक ठरेल.
1. आहारातून शरीरात मीठ जास्त गेल्यास त्वचा रोग होतो. त्वचा खाजणं, जळजळणं, त्वचेवर लाल चट्टे येणं असेत त्रास उद्भवतात.
2. केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर शरीरात सोडियमचं प्रमाण जास्त झालं आहे असं समजावं. शरीरातील सोडियम मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास वाढतं. मिठाचं प्रमाण आहारात जास्त असल्यास त्याचा दुष्परिणाम केसांवर होतो. यामुळे केस कमजोर होवून केस गळतात.
3. आहारातून मीठ शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास त्याचा परिणाम हाडातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होण्यावर होतो. यामुळे हाडं ठिसूळ होतात. ऑस्टिओपोरोसिस सारखे हाडांचे गंभीर आजारही मिठाच्या जास्त सेवनातून होतात.
4. मीठ जास्त खाल्ल्यास घाम आणि लघवीवाटे शरीरातील पाणी वेगानं बाहेर पडतं. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.
Image: Google
5. मिठाच्या अति सेवनामुळे शरीरातील सोडियम वाढतं. याचा परिणाम रक्तदाब वाढण्यावर होतो. उच्च रक्तदाबामुळे हदयविकाराचा धोका निर्माण होतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आहारात मिठाचं प्रमाण अगदीच कमी ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
6. शरीरात मीठ प्रमाणापेक्षा जास्त गेल्यास हाडातील कॅल्शियम लघवीवाटे बाहेर पडतं. यामुळे हाडं तर कमजोर होतातच पण मूतखड्याची समस्या निर्माण होवून् किडनीला धोका निर्माण होतो.
7 . मीठ जास्त खाल्लं गेलं तर शरीरातून पाणी जसं जास्त बाहेर टाकलं जातं तसंच ते शरीरात विशिष्ट ठिकाणी साचून राहाण्याची समस्याही निर्माण होते. यामुळे शरीरावर सूज येते.
8. मिठाच्या सेवनाच्या अतिप्रमाणावर झालेलं संशोधन सांगतं की मिठाचं अति सेवन केल्यास पोटात गॅसचं प्रमाण जास्त होतं. या गॅसमुळे आतड्यांना सूज येते. फायबरयुक्त पदार्थात जर मीठ जास्त असेल तर गॅस जास्त होतो आणि फायबर पचण्यास जे जिवाणू आवश्यक असतात ते निर्माण होत नाही.
9. संशोधक आणि अभ्यासक सांगतात की मिठाच्या जास्त प्रमाणामुळे हेलिकोबॅक्टर पायलोरी म्हणजेच एच पायलोरी हा जिवाणू गंभीर रुप घेऊन पचन व्यवस्था खराब करतो. यामुळे अल्सरसारखे आतड्यांचे गंभीर आजार होतात.
10 . आहारातून शरीरात मीठ जास्त गेल्यास खूप तहान लागते. गोड पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त उष्मांक जातात. तज्ज्ञ म्हणतात की लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांनी प्रमाणापेक्षा एक ग्रॅम जास्त मीठ खाल्लं तर ते 27 टक्के साखरेचे पदार्थ, पेय जास्त प्रमाणात सेवन करतात. याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो.
Image: Google
कोणतं मीठ खावं?
मिठाचे साधं मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ, काळं मीठ असे चार प्रकार आहेत. सैंधव मीठ आणि काळं मीठ हे आरोग्यास लाभादायक असल्याचं तज्ज्ञ सांगतात , पण कोणतंही मीठ प्रमाणातच सेवन करायला हवं.
1. साधं मीठ- साध्या मिठात सोडियम आणि आयोडिनचं प्र्माण पुरेसं असतं. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण हे मीठ जास्त खाल्लं तर धोके जास्त आहेत. त्यामुळे हे मीठ वापरताना त्याच्या प्रमाणाकडे अवश्य लक्ष द्यावं असं तज्ज्ञ म्हणतात.
2. सैंधव मीठ- या मिठावर शुध्दीकरणाची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे या मिठात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या खनिजांचं प्रमाण जास्त असतं. यामुळे हे मीठ आरोग्यास लाभदायक मानलं जातं. हदयरोग किंवा किडनीसंबंधी आजार असलेल्यांना आहारात सैंधव मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो.
3. काळं मीठ- या मिठावरही शुध्दीकरणाची प्रक्रिया होत नाही. पचनासाठी या मिठाचा फायदा होतो. बध्दकोष्ठता, पोटदुखी, अपचन, चक्कर येणं, उलटी होणं, मळमळणं, अस्वस्थता वाटणं या समस्यांवर या मिठाच्या सेवनानं आराम मिळतो. उन्हाळ्यात लिंबू पाणी किंवा ताक पितांना काळं मीठ टाकून पिल्यास फायदा होतो. पण या मिठात फ्लोराइडचं प्रमाण जास्त असल्यानं हे मीठ प्रमाणात सेवन करावं.
4. लो सोडियम मीठ- या मीठाला पोटॅशियम मीठ असंही म्हटलं जातं. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांना लो सोडियम मीठ आहारात वापरण्याचा सल्ला दिला जातो. हदयासंबंधी व्याधीत उपयुक्त असलेलं हे मीठ मधुमेही रुग्णांसाठीही फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.