आजकाल वयस्करच नाही तर तरूण वयोगटातही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पुरूषांसह महिलांनाही हृदयाच्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. रोजच्या जगण्यातील काही चूका हृदयाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. नानावटी मॅक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलचे वरिष्ट सल्लागार आणि कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर सलिल शिरोडकर (Dr Salil Shirodkar, Senior Consultant, Cardiology, Nanavati Max Super Speciality Hospital) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
१) लठ्ठपणा
तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळेग्रस्त लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक दिसून येतो. खरं तर, तरुण स्त्रियांमध्ये लठ्ठपणामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोषक घटक आणि ऑक्सिजनची गरज वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. उच्च रक्तदाब हा तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे. लठ्ठपणामुळेही अनेक आजार होतात.
२) डायबिटीस
डायबिटीस हा जीवनशैलीचा आजार आहे. परंतु हे किडनी आणि हृदयरोगाचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. डॉ सलिल म्हणतात की गेल्या काही वर्षांमध्ये डायबिटीसमुळे ग्रस्त असलेल्या तरुणींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. डायबिटीसमुळे होणारी चयापचय विकृती तरुण स्त्रियांमध्ये धमनी प्लेक तयार होण्याचा आणि स्ट्रोक, हृदयविकाराचा धोका वाढवते.
३) ताण-तणाव
तणाव हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण आहे. हृदयरोग आणि हृदयविकाराच्या झटक्यासाठी तणाव कारणीभूत ठरतो. तरुण स्त्रिया स्वतंत्र राहतात आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतात. दरम्यान, त्यांना तणावालाही सामोरे जावे लागते. ताण, तणाव कोरोनरी धमन्यांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस किंवा प्लेक तयार करण्यास उत्तेजन देते.
४) गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन
तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन देखील असू शकते. गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर हार्मोन्सवर प्रभाव टाकतो. हार्मोनच्या पातळीत बदल केल्यास रक्तदाब बदलू शकतो आणि तरुण स्त्रियांच्या हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे बिघडणारं संतुलन तरुण स्त्रियांमध्ये गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
५) खराब जीवनशैली
आजचे तरुण विचित्र जीवनशैलीसह जगत आहेत. म्हणजे, व्यायाम न करणे, स्क्रीनवर (फोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर) अवलंबून राहणं, चांगला आहार न घेणे. या प्रकारच्या दिनचर्या किंवा जीवनशैलीमुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. वाईट जीवनशैली हृदयाव्यतिरिक्त इतर अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
६) अनहेल्दी आहार आणि पुरेशी झोप
हृदय निरोगी ठेवण्यासाठी, चांगला आहार आणि पूर्ण झोप घेणे खूप महत्वाचे आहे. पण आजचे तरुण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत नाहीत, तसेच पुरेशी झोपही घेत नाहीत. प्रक्रिया केलेली साखर, ट्रान्स-फॅट्स, सोडा आणि कोलेस्टेरॉलचा वापर धमन्या किंवा एथेरोस्क्लेरोसिसमध्ये प्लेक तयार होण्यास जबाबदार म्हणून ओळखला जातो. अस्वस्थ आहाराचा झोपेवरही परिणाम होतो. यामुळे पुढे तरुणींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या निर्माण होतात. म्हणून, निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घ्या आणि 7-8 तास झोप घ्या.
७) धुम्रपान आणि दारू पिणं
तरुणांमध्ये धूम्रपान आणि अल्कोहोल पिण्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि हृदयाचे ठोके बदलतात. या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने तरुण महिला आणि पुरुषांमध्ये अचानक कार्डियाक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्हाला हृदयाचे आजार टाळायचे असतील तर ही सर्व कारणे लक्षात ठेवा आणि ती टाळा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, चांगला आहार घ्या, पुरेशी झोप घ्या. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहा, तसेच व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा. हृदयरोग टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे.