Join us   

जागतिक कावीळ दिवस : हिपॅटायटीस बी म्हणजे नेमकं काय? शरीरसंबंधातून संसर्ग होऊ शकतो का, तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 11:33 AM

World Hepatitis Day hepatitis B : काही रुग्णांमध्ये विषाणू सतत सक्रीय राहून यकृताच्या पेशी मारीत राहतो. अशांना लिवर सिर्होसीस होतो तर काहींना यकृताचा कर्करोग होतो.

डॉ. दाक्षायणी पंडित 

सरिता पाळी चुकल्याने  स्त्रीरोगतज्ञांकडे गेली. डॉक्टरांनी  तिला तपासून गोड बातमी दिली. त्यांनी  सांगितलेल्या रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल पाहून डॉक्टर म्हणाले, ”सर्व छान आहे पण तुमच्या रक्तात ब प्रकारच्या काविळीच्या विषाणूचा संसर्ग दिसतोय.  तुम्हाला पूर्वी कुठल्याही कारणासाठी रक्त दिलं होतं का किंवा कधी कावीळ झाली होती का?” सरिताला  काही आठवत नव्हतं. डॉक्टर म्हणाले, “तुमच्या मिस्टरांची ही एक चाचणी करून अहवाल दाखवा.” सरिताच्या पतीच्या रक्तातही ब प्रकारच्या काविळीच्या विषाणूचा संसर्ग होता (World Hepatitis Day hepatitis B). 

आजाराचं नाव –

हिपॅटायटीस बी (ब प्रकारच्या विषाणूने होणारा यकृतदाह व त्यामुळे होणारी कावीळ)

रोगकारक जंतू -

हिपॅटायटीस बी विषाणू. विषाणूजन्य यकृतदाह व कावीळ निर्माण करणाऱ्या पाच (अ, ब, क, ड आणि ई) विषाणूंपैकी  ब विषाणू हा जास्त धोकादायक. भारतात ३-४ टक्के व्यक्तींना याचा संसर्ग असतो. संसर्गित व्यक्तीच्या रक्तात व शरीरातील सर्व स्त्रावात  [रक्तद्रव (सीरम), मेंदूतील पाणी (सीएसेफ), पोटातील तसेच छातीतील पाणी, पुरुषांच्या वीर्यात आणि प्रोस्टेट ग्रंथीच्या स्त्रावात व स्त्रियांच्या योनिमार्गातील स्त्रावात] विषाणू राहतो. 

(Image : Google)

संक्रमण कसे होते? 

१.संसर्गित रक्तदात्याचे रक्त व रक्ताचे घटक दिले गेलेल्या व्यक्तीस; 

२. लैंगिक संबंधातून; 

३. आरोग्यसेवेतील व्यक्तींना संसर्गित रक्त अथवा स्त्राव यांच्या संपर्काने. 

४. गर्भधारणे आधीच किंवा गर्भवती असताना संक्रमित असलेल्या मातेकडून बाळास.     

बाळ जन्मत:च संसर्गित असेल व ते  लक्षात न आल्यास ( दुर्गम भागात, खेड्यांमध्ये) त्याला खूप लवकर (२५ वर्षांच्या आसपासच) लिवर सिर्होसिस/यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. सदर विषाणू शरीरात शिरल्यावर ९५% रुग्णांमध्ये त्याच्या विरुद्ध प्रतिपिंडे निर्माण होतात. ती साधारण ६ महिन्यांत विषाणूचा पूर्ण नाश करतात व रुग्ण बरा होतो. १% रुग्णांना अतिगंभीर यकृतदाह होऊन त्यांचा मृत्यू होतो. उरलेल्या ४ टक्क्यांपैकी काही लक्षणरहित विषाणू वाहक होतात व त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकतो; काही रुग्णांमध्ये विषाणू सतत सक्रीय राहून यकृताच्या पेशी मारीत राहतो. अशांना लिवर सिर्होसीस होतो तर काहींना यकृताचा कर्करोग होतो.   

लक्षणे – 

बऱ्याचदा लक्षणरहित असणारा ब विषाणूचा संसर्ग काही कारणासाठी चाचणी केल्यावरच लक्षात येतो. काही रुग्णांना प्रथम संसर्गाच्या वेळी ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या होतात व नंतर कावीळ होते. त्वचा, डोळे, नखे, जीभ पिवळे होतात. लघवी पण गर्द पिवळी होते.  

निदान- 

लक्षणरहित गर्भवतीच्या  रक्ताची  हेपाटायटिस बी सरफेस अँटिजेन चाचणी करतात. तिच्यात दोष असल्यास तर प्रसूतीनंतर बाळाला एकाच वेळी विषाणूरोधी लस विषाणूरोधी प्रतिपिंडे देतात. प्रतिपिंडे रक्तातील विषाणू मारतात. लस बाळाच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करते. (आजाराच्या बाकी लक्षणांबद्दल नंतर स्वतंत्रपणे बोलूया). लक्षणे असतील तर यकृत दाहकारक सर्व विषाणूंसाठी चाचण्या कराव्या लागतात. 

उपचार –

ब विषाणूसाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत पण ती गंभीर परिस्थितीतच वापरतात. 

प्रतिबंध-

यासाठी अत्यंत प्रभावी लस उपलब्ध आहे.  काँडोमचा वापर संसर्ग रोखतो. हल्ली बाळाच्या जन्मानंतरच्या प्राथमिक लसीकरणातच या लसीचा समावेश केल्याने बहुतांश बालकांना ती दिली जाते पण तेव्हा ती घेतली नसेल तर कधीही घेता येते. लसीच्या तीन मात्रा असतात- पहिल्या मात्रेनंतर १ महिन्याने दुसरी व पहिल्या मात्रेनंतर ६ महिन्यांनी तिसरी आणि दर ५ वर्षांनी एक वर्धक मात्रा घ्यावी.   

(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलैंगिक जीवनलैंगिक आरोग्य