Join us   

टेंशन आणि बीपी : आयुष्यभर छळणाऱ्या त्रासाचं काय करायचं? डॉक्टर सांगतात उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 6:50 PM

world hypertension day 2023 : १७ मे हा दिवस जागतिक हायपरटेंशन दिवस म्हणून साजरा केला जातो. वाढलेला रक्तदाब आणि बिघडणारी तब्येत याचा आपल्या मनाशी काय संबंध असतो?

ठळक मुद्दे ताणतणावाला योग्य पद्धतीने तोंड न देऊ शकल्याने हायपरटेंशन होते, याची नोंद शास्त्रज्ञांनी केलेली आहे.

- डाॅ. ऋचा सुळे खोत

माधवी, वय ४२ वर्षे, शाळेत शिक्षिका आणि दोन मुलांची आई. ती सांगत होती, अचानक छातीत धडधड होते, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर आल्यासारखे वाटते, म्हणून मग ती जवळच्या डाॅक्टरांकडे गेली. डाॅक्टरांनी तपासले. ब्लड प्रेशर मोजले, तो काय? १५०/१०० होते. डाॅक्टरांनी गोळ्या दिल्या आणि पुढच्या तपासण्यांसाठी कार्डिओलाॅजिस्टकडे (हृदयाच्या डाॅक्टर) पाठवले. त्या डाॅक्टरांकडे गेल्यावर डाॅक्टरांनी माधवीताईच्या हृदयाच्या सर्व तापसण्या केल्या. पण त्याचबरोबर काही प्रश्न विचारले, माधवीताई तुमची झोप चांगली होते का? सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटते का? सध्या शाळेचे पेपर घरी तपासायला आणले आहेत ते कधीपर्यंत परत द्यायचे आहेत? सासूबाईंचा दमा सध्या कंट्रोलमध्ये आहे का? घरातली सर्व कामं आवरून तुम्ही स्वत:च्या आवडीचे असे काय करता? माधवीताईंनी वेळ मारण्यापूरती उत्तरं डाॅक्टरांना दिली. पण घरी येताना त्या विचार करत होत्या की, या सर्व गोष्टी मला कार्डिओलाॅजिस्ट का विचारत असावेत? याचा माझ्या बीपीच्या त्रासाशी काय संबंध? आपण हाच विचार करू की, जर वाढलेलं बीपी हा एक शारीरिक आजार आहे तर माझ्या आयुष्यातल्या घडामोडींशी त्याचा काय संबंध आहे?पण शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं आहे की, शारीरिक आजारांची नाळ कुठेतरी मनाशी सुद्धा जोडलेली असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना आपण कसे सामोरे जातो याचादेखील आपल्या कळत नकळत शरीरावर परिणाम होत असतो. जगताना प्रत्येक जण आपापल्या परीने चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देत असतो. त्याला आपण आपली 'कोपिंग स्टाइल' म्हणजेच जमवून घेण्याची पद्धत असे म्हणू शकतो.

(Image : google) ही 'कोपिंग स्टाइल' बऱ्याच वेळा आपल्या स्वभाव (पर्सनॅलिटी) वर अवलंबून असते. त्यामुळे एकाच प्रसंगाला दोन वेगळी माणसं वेगळ्याच पद्धतीने प्रतिक्रिया देतात. वेगवेगळे वागतात. जे वाट्याला आलं त्याचा एकाला 'स्ट्रेस'वाटू शकतो, पण दुसरा तोच प्रसंग अगदी सहजतेने हाताळतो. काही ताण तणावाचे प्रसंग तात्पुरते असतात. पण काही असे असतात की, जे दीर्घकाळ आयुष्याचा भाग असतात. या प्रसंगांना तोंड देताना आपलं शरीर आणि मन सतत 'अलर्ट' मोडवर असतं. ताणतणावाला तोंड देण्यासाठी शरीर सतत युद्धजन्य परिस्थिती असल्यासारखे वागत असते. स्नायू सतत ताणलेल्या परिस्थितीत असतात. शरीरात अतिरिक्त ग्लुकोज बनून वापरलं जातं. मेंदू सतत सतर्क अवस्थेत असतो. त्याचबरोबर रक्त वाहिन्यांमध्ये रक्तदेखील अतिरिक्त दाबाने वाहत राहते. हे सगळे बदल आपल्या शरीरातील मज्जासंस्थेचा एक भाग करत असतो. हे करण्याचे ट्रेनिंग या मज्जासंस्थेला अगदी आदीम काळापासून मिळालेले असते. त्यामुळे हे सगळे आपल्या नकळत होत असतं. जेव्हा ताण दीर्घकाळासाठी सतत राहतो त्यावेळेला ही संस्था 'ओव्हरटाइम' काम करते आणि त्याचे हळूहळू दुष्परिणाम शरीराला जाणवायला लागतात. जसे की डायबेटिस, संधीवात, सोरायसिस, हायपरटेन्शन, ॲसिडिटी. हायपरटेंशनचा त्रास महिलांनाही मोठ्या प्रमाणात होतो. ताणतणावामुळे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होत असतात. या हार्मोन्समुळे आपल्या हृदयाची स्पंदने गतिमान होतात आणि रक्तवाहिन्या निमुळत्या होतात. थोडक्यात काय तर ३ इंची पाइपमधून ६ इंच पाणी वाहायला लागते व त्यामुळे त्याचा दाब जास्त होतो आणि कालांतराने याचे रूपांतर 'हायपरटेंशन'च्या आजारात होते. असा कोणताही शोध ठामपणे हे मांडू शकलेला नाही की, ताणतणावामुळे बीपीचा त्रास जडतो. पण ताणतणावाला योग्य पद्धतीने तोंड न देऊ शकल्याने हायपरटेंशन होते, याची नोंद शास्त्रज्ञांनी केलेली आहे.

(Image : google)

त्रास होऊ नये म्हणून काय करायचे?

१. डाॅक्टरांनी सांगितलेल्या पथ्यपाणी व गोळ्या औषधांबरोबर बीपी कंट्रोल करण्यासाठी ताणतणावाला योग्य पद्धतीने तोंड द्यायला शिकणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. २. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या नियंत्रणाखाली काय आहे आणि नियंत्रणाबाहेर काय आहे हे ओळखले पाहिजे. जसे की हवामान, वीज कधी येते, कधी जाते किंवा आपल्या भवतालचा, संपर्कातला माणूस कसा वागेल. काय बोलेल हे आपल्या नियंत्रणाबाहेरचे घटक आहेत. पण आज फार ऊन आहे तर सनकोट घालावा किंवा लाइट जातील, शनिवारचे जे आधीच विचार करून पाणी भरणे हे आपल्या नियंत्रणाखाली असणारे घटक आहेत. ३. वर्तमान क्षणात जगायला शिकायला हवे. यासाठी ध्यान, योग, प्राणायाम, खोल श्वासाचे व्यायाम याचा चांगला फायदा होतो. ४. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांची भावनांची आणि शारीरिक संवेदनाची अधिक चांगली जाणीव होते. ५. आपल्याला त्रास न होऊ देता या संवेदनांचे नियोजन करणे अधिक सोपे जाते. याला 'माइंडफुलनेस' पद्धती असं म्हणतात. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायला त्याचा फायदा होतो.

(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्य