आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव त्याचे काम अतिशय योग्य पद्धतीने पार पाडत असतो. पण आपली जीवनशैली योग्य असेल तर हे अवयव दिर्घकाळ उत्तम पद्धतीने कार्यरत राहतात. मात्र आपण शरीराकडे दुर्लक्ष केले आणि चुकीची जीवनशैली अवलंबली तर मात्र हे अवयव खराब होत जातात आणि मग शरीराचे कार्य थांबते. किडनी हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनी महत्त्वाचे काम करत असते. खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते. हे रक्त योग्य पद्धतीने धुसळून संपूर्ण शरीराला पोहचविणे आणि त्यातील अनावश्यक घटक मलमूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकण्यासाठी किडनी अविरत कार्य करत असते. पण या किडनीच्या आरोग्याकडे आपण योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही तर किडणी खराब होते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडत नाहीत. त्याचा शरीरावर ताण यायला लागतो आणि आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात. जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने (World Kidney Day 2022) किडनीची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याविषयी....
किडनी खराब होण्याची कारणे
१. डायबिटीस, बीपी
२. सतत औषधे घेणे
३. जास्त काळ लघवी दाबून धरणे
४. पाणी कमी पिणे
५. व्यसनाधिनता
किडनीचे काम चांगले व्हावे यासाठी ५ महत्त्वाच्या सवयी
१. लघवी दाबून न धरणे
अनेकदा आपण बाहेर असलो आणि आपल्याला लघवीला जायचे असेल की आपण कंटाळा करतो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सार्वजनिक शौचालयांमध्ये असणारी अस्वच्छता. पण अशाप्रकारे लघवी दिर्घकाळ दाबून ठेवल्याने किडनीचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. लघवी बराच वेळ दाबून ठेवल्यास किडनीवर त्याचा ताण येतो आणि किडणी लवकर खराब होऊ शकते.
२. पाणी किंवा द्रव पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन
लघवी लागेल म्हणून अनेकदा आपण कमी पाणी पितो. इतकेच नाही तर कामाच्या नादात अनेकदा आपल्याला पाणी प्यायचे लक्षात राहत नाही. पण यामुळेही किडन्या खराब होण्याची शक्यता असते. पाण्यामुळे शरीरातील खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यास मदत होते आणि अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. पण पाणी कमी प्यायल्यास किडनीवर ताण येतो आणि किडन्या लवकर खराब होतात. त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असायला हवा.
३. डायबिटीस आणि बीपी नियंत्रणात नसणे
डायबिटीस आणि बीपी या सध्या अतिशय सामान्य समस्या झालेल्या आहेत. शुगर आणि रक्तदाब दिर्घकाळ नियंत्रणात नसेल तर त्याचा एकूणच शरीरावर पण प्रामुख्याने किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळे डायबिटीस आणि बीपी असणाऱ्या रुग्णांना कालांतराने किडनीचे विकार उद्भवतात आणि अखेर त्यांना डायलिसिस करणे किंवा किडनी ट्रान्सप्लांट करणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. पण तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असल्याने सुरुवातीपासूनच काळजी घेतलेली चांगली.
४. सततचे औषधोपचार
आपले थोडे डोके दुखले किंवा पित्त झाले, पोट खराब झाले की आपण मेडीकलमध्ये जातो आणि गोळ्या घेऊन त्या खातो. त्यावेळी असणारी समस्या तात्पुरती नियं६णात येण्यासाठी या औषधांचा उपयोग होत असला तरी दिर्घकाळ अशाप्रकारची औषधे घेणे किडनीच्या आरोग्यासाठी घातक असते. सतत डोकेदुखी, पोटदुखी, अंगदुखी किंवा पित्तासाठी गोळ्या घेतल्यास त्याचा किडनीवर थेट परिणाम होतो आणि किडनी खराब होऊन अखेर तिचे काम थांबू शकते.
५. व्यसनाधिनता
कोणतेही व्यसन हे आरोग्यासाठी घातकच असते. पण तुम्ही प्रमाणाच्या बाहेर व्यसने करत असाल तर ते व्यसन शरीरातील एक एक अवयव खराब करण्यास कारणीभूत ठरतात. धूम्रपान, प्रमाणाबाहेर अल्कोहोलचे सेवन, तंबाखू यांसारख्या व्यसनांचा किडणीवर घातक परिणाम होतो. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहिलेलेच बरे.