शरीराच्या सगळ्या क्रिया योग्य पद्धतीने चालण्यामध्ये लिव्हरचा अतिशय महत्त्वाचा रोल असतो. खराब झालेल्या पेशी बदलण्याचे काम लिव्हर आपले आपण करते. त्यामुळे शरीर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या क्रिया पार पाडू शकते. शरीराचे सगळेच कार्य दिर्घकाळ सुरळीत सुरू ठेवायचे असेल तर शरीराचे सर्व अवयव योग्य पद्धतीने काम करणे आवश्यक असते. आपण चुकीच्या सवयींमुळे शरीराच्या अवयवांवर घातक परिणाम करतो आणि त्यामुळे आपल्या अवयवांची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. आज आपण अशा ४ सवयींबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे लिव्हर लवकर खराब होत जाते. लिव्हरच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल रोजी जागतिक लिव्हर डे (World Liver Day) साजरा केला जातो, त्यानिमित्ताने...
१. प्रमाणाबाहेर औषधे घेणे
आपण घेत असलेली औषधे, सप्लीमेंटस यांवर प्रक्रिया करुन ते संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम लिव्हर करत असते. हे ठिक असले तरी प्रमाणापेक्षा जास्त औषधे घेतल्यास लिव्हरला त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ताण पडतो. त्यामुळे लिव्हर खराब होण्याची समस्या उद्भवते. म्हणून प्रमाणाबाहेर औषधे घेणे टाळावे. त्यासाठी जीवनशैली आणि तब्येत कशी चांगली राहील असा प्रयत्न करावा.
२. कमी झोप
व्यक्तीला ८ ते १० तास झोप गरजेची असते. पण हल्ली सोशल मीडिया, कामाचा ताण, इतर गोष्टी यांमुळे आपली झोप कमी होते. याचा शरीरावर आणि लिव्हरवर ताण येतो. झोप कमी झालेली असेल तर लिव्हरला ऑक्सीडेटीव स्ट्रेस येतो. त्यामुळे डॉक्टरही आपल्याला किमान ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात. हा सल्ला आपण योग्य पद्धतीने पाळायला हवा.
३. चुकीचा आहार
लठ्ठपणा ही सध्या एक मोठी समस्या झाली आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे लठ्ठपणाची समस्या सर्वच वयोगटात वाढली आहे. हाय कॅलरी असलेले अन्नपदार्थ, सॅच्युरेटेड फॅट आणि साखर यांचे जास्त सेवन केल्यास लिव्हरवर फॅटस जमा होतात आणि लिव्हर खराब होते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार आणि इतर बाबतीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
४. व्यसने
व्यसनांमुळे लिव्हर खराब होते हे आपल्याला माहित आहे. असे असूनही आपला स्वत:वर ताबा नसल्याने आपण व्यसने करत राहतो. दारु, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे लिव्हरला त्रास होतो. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत आणि ती शरीरात साठल्याने लिव्हर खराब होत जाते. त्यामुळे व्यसन करणे शरीरासाठी हानिकारक असल्याने त्यावर वेळीच नियंत्रण आणायला हवे.