आपल्याला इतर आजारांची ज्याप्रमाणे माहिती असते त्याचप्रमाणे मेंदूशी निगडीत आजारांची आपल्याला माहिती असतेच असे नाही. मात्र याबाबत वेळीच माहिती घेणे आणि योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असते. नाहीतर हे आजार झाल्यावर ते गंभीर स्वरुप धारण करणारे असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अचानक येणाऱ्या अपंगत्त्वामध्ये मल्टीपल स्क्लेरोसिस या आजाराचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ठराविक वयानंतर महिलांनी याबाबत जास्त काळजी घ्यायला हवी. जागतिक मल्टीपल स्क्लेरोसिस दिनाच्या निमित्ताने हा आजार नेमका काय आहे आणि महिलांमध्ये तो किती प्रमाणात होतो याबाबत समजून घेऊया (World Multiple Sclerosis Day)..
काय आहे हा आजार?
मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे (Multiple Sclerosis) रुग्णाला अपंगत्व येऊ शकते. तसेच त्याची चालण्याची क्षमता कमी होऊ शकते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांची हालचाल कमी होण्याची शक्यता असते. काही वेळा यामध्ये दृष्टी जाण्याचा धोकाही असतो. हा आजार कशामुळे होतो याचे नेमके कारण अद्याप संशोधकांना सापडलेले नाही. पण शरीर आणि मेंदू यांच्यातील संवाद तुटतो आणि हा आजार झालेल्या रुग्णांना मेंदूकडून योग्य पद्धतीने संदेश मिळत नसल्याने शरीराच्या कार्यांमध्ये समन्वय साधू शकत नाहीत. या आजाराच्या रूग्णांमध्ये चक्कर येणे, शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये अशक्तपणा येणे, हालचालीमध्ये असंतुलन, थरथरणे, थकवा, वेदना, दृष्टिदोष, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, मूत्राशय, पोटदुखी आणि लैंगिक समस्या यासह अनेक लक्षणे दिसतात. पूर्वी हा आजार दुर्मिळ म्हणून ओळखला जायचा पण वैद्यक शास्त्रात झालेल्या संशोधनामुळे विविध चाचण्यांच्या मदतीने या आजाराचे निदान व्हायला लागले.
याबाबत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. सुयोग दोशी सांगतात...
मेंदू आणि मणका यांमध्ये असणाऱ्या नसांना असणारे पांढऱ्या रंगाचे कव्हरींग निघून गेल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीराच्या प्रतिकारशक्तीचे नियंत्रण बिघडल्याने ही समस्या उद्भवते. महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते, यामागे नेमके कारण काय याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. साधारणपणे वयाच्या २५ वर्षानंतर ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. यासाठी औषधोपचार उपलब्ध असून त्यांना काही मर्यादा असल्याने हे औषधोपचार दिर्घकाळ करता येत नाहीत. यासाठी स्टेमसेल थेरपी, सेल्युलर थेरपी असे काही उपाय करता येऊ शकतात. रुग्णाच्या आजाराचे निदान केल्यानंतर उपचारपद्धती ठरवता येते.