लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु अनेक वेळा पालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याला हानी पोहोचते. जगात सुमारे ३५० कोटी लोक तोंडाशी संबंधित लहान-मोठ्या आजारांनी ग्रस्त आहेत. चार वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली होती. नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम २०२० च्या रिपोर्टनुसार, ९५% भारतीय तरुण हिरड्यांच्या समस्येने ग्रस्त आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव.
दरवर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश दाताच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आहे. लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बेबी बॉटल सिंड्रोम, हा लहान मुलांना बाटलीतून दूध पिण्यामुळे होऊ शकतो. हा सिंड्रोम नेमका काय आहे आणि त्याच्यापासून आपला बचाव कसा करायचा हे जाणून घेऊया...
बेबी बॉटल सिंड्रोम
बेबी बॉटल सिंड्रोमला 'बॉटल कॅरीज' किंवा 'नर्सिंग बॉटल कॅरीज' असंही म्हणतात, ही एक डेंटल कंडीशन आहे ज्यामध्ये लहान मुलांचे दुधाचे दात किडायला लागतात. जेव्हा मुलाला वारंवार बाटलीतून दूध, ज्यूस किंवा गोड पेयं दिली जाता तेव्हा ही समस्या उद्भवते. याचे मुख्य कारण म्हणजे बाटलीतून घेतलेल्या द्रवात असलेली साखर, जी दातांवर जमा होते आणि बॅक्टेरियांना वाढण्याची संधी देते.
हे बॅक्टेरिया एसिड तयार करतात जे दातांच्या वरच्या थराला (इनेमल) नष्ट करतात आणि पोकळी निर्माण करतात ज्यामुळे दात किडतात. जर त्याची लक्षणे दुर्लक्षित केली तर मुलाला दात दुखणं, दात पडणं, हिरड्यांचा इन्फेक्शन आणि बोलण्यात अडचण यासारख्या समस्या येऊ शकतात.
बेबी बॉटल सिंड्रोमची लक्षणं
दातांवर पांढरे किंवा तपकिरी डाग हे कॅविटीचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. दात दुखतात, गरम किंवा थंड अन्न खाल्ल्याने झिनझिन्या येतात. दात पिवळे किंवा काळे पडणे, दात किडल्यामुळे दातांचा रंग बदलू शकतो. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे हिरड्यांना सूज येते किंवा रक्तस्त्राव होतो. दात किडण्याचे प्रमाण वाढल्याने तोंडाला दुर्गंधी येते.