झोपेचं खोबरं झालं ग माझ्या! हे वाक्य आपण बायकांच्या तोंडी कायमच ऐकतो. एकूणच झोप हा स्त्री-पुरुष दोघांचाही प्रश्न असला तरी बायकांचं स्वत:च्या झोपेकडे अजिबात लक्ष नसतं. रात्री उशीरापर्यंत काम, सकाळी लवकर उठून डबे, ऑफिसला जाणाऱ्यांची वेगळीच घाई. होममेकर महिला इतरांच्या सेवेत कायम तत्पर. त्यात तब्येतीच्या कुरकुरी. पण कधी आपण असा कधी विचार करतो की,आपली झोपच नीट होत नाही. गाढ झोप लागत नाही. आपण मध्यरात्री झोपतो, त्याचा आपल्या शरीरावर, त्वचेवर,मनावर, सौंदर्यावर आणि वाढत्या वजनावरही परिणाम होतो. असा विचार केलाच जात नाही. पण नुकताच झालेला जागतिक झोप दिनही म्हणतो की, जरा झोपेकडे लक्ष द्या. त्यांची २०२२ ची थीमच आहे, 'Quality Sleep, Sound Mind, Happy World'. झोप अपूरी असेल किंवा झोप गाढ लागत नसेल तरी मनावर परिणाम होतो, स्ट्रेस प्रचंड वाढतो, त्यात स्ट्रेसचं ओझं वाहून नातेसंबंध बिघडतात. आणि तब्येतही. त्यामुळेच जरा आपल्या झोपेकडे लक्ष द्यायला हवं. पण त्यासाठी करायचं काय?
मुळात हे पाहू की आपलं चुकतं कुठं?
१. आपला स्क्रीन टाईम वाढवत झोपेचं खोबरं करत असतो. अंधार पडत चालला की आपल्याला एकेक ऊत येतो. मग स्क्रीनवर सिनेमे लाव, रात्री उशिरा जेवणं कर, रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्या असं सगळं सुरु होतं.दिवस मावळला की जणू आपलं उजाडतं.
२. आपल्याला रात्रीच उशिरापर्यंत मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलायचं असतं. राहून गेलेली एकेक कामं रात्रीच आठवायला लागतात. त्यात हातात फोन घेऊन नेट सर्फिंग सुरु झालं की विचारूच नका! त्याने झोपेचं खोबरं झालंच.
३. हे सगळं आटोपून आपण झोपायला जाणार. आपली अपेक्षा असते की पलंगावर पडल्या पडल्या झोप यायला हवी. ती अपेक्षा पुरी होईलच असं नाही. मग "करवटें बदलते रहे, सारी रात हम" अशा तक्रारी सुरु होतात.
रात्री गाढ शांत झोप लागतच नाही असं का?
१. जसं आपल्याला रोजची रोजच भूक लागते आणि ती रोजची रोजच भागवावी लागते, तसंच झोपेचं देखील असतं. ती रोजची रोजच घ्यावी लागते. तिचा दर्जा जितका चांगला तितकं आपलं आरोग्य उत्तम असायची शक्यता जास्त.
२. पलंगावर पडल्या पडल्या आपल्याला झोप येईलच असं नाही. अशावेळी झोप येत नाही, म्हणून आपण आणखीन अस्वस्थ होतो. कोणी म्हणतं काहीतरी वाचायला घ्या. वाचता वाचता झोप येईल. ते ही आपण करून बघतो. त्यासाठी आपल्याला दिवा सुरु ठेवावा लागणार किंवा एखादी स्क्रीन! झोपेवर काम करायचं सोडून भलतंच काही आपण सुधारायला घेणार.
३. आपण झोपतो ती खोली किती स्वच्छ आहे, छताला जाळी जळमटी किती लागलीत, किती पसारा एकावर एक कपाटांवर कोंबून ठेवलेला आहे, ते ही जरा बघू या. किमान सहा आठ दिवसांत पलंगावरची चादर धुवून बदलू या. नेटकी चादर टाकणं हे एक स्किल आहे, ते शिकू या.
४. झोपायच्या आधी काही वेळ आपण स्क्रीन एक्स्पोजर पासून दूर राहून ट्रायल घ्यायच्या. जे अर्जंट असतं ते फोनवर थोडक्यात बोलून घ्यायची सवय करायची. म्हणजे स्क्रीन टाईम आटोक्यात ठेवता येतो.
५. आपला आहार झोपेच्या किमान दोन तीन तास आधीच आटोपून घ्यायचा. हळूहळू आपल्या शरीराचे तापमान कमी झाले की आपण झोपेच्या गुहेत शिरायला लागतो.
६. किमान सहा ते आठ तास छान झोप येईल, अशाप्रकारे सर्व प्लॅन आखायचे आणि ते पाळायचा प्रयत्न करायचा. झोप चांगली होत नसेल तर आपल्या आयुष्याचं, करिअरचं, तब्येतीचं सगळंच गाडं कायमचंच बिघडू शकेल एवढं लक्षात ठेवलेलं बरं.