Join us   

World Thyroid Day : ५ लक्षणं देतात थायरॉईडचा त्रास असल्याचे संकेत, दुर्लक्ष टाळा-डॉक्टरांना भेटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 11:14 AM

World Thyroid Day : आपल्याला एखादी समस्या असेल तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण असे करणे आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरु शकते.

ठळक मुद्दे एकाएकी खूप जास्त प्रमाणात केस गळत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईडची चाचणी करुन घेणे हिताचे ठरते. कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यावर वेळीच उपचार केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

आपण रोजच्या धावपळीत आपल्याला काही होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करतो. थोडे दिवस वाट पाहू आणि मग डॉक्टरांकडे जाऊ असे आपण म्हणतो खरे. पण अशाप्रकारे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. कारण आपण दिर्लक्ष करत असलेली लक्षणे थायरॉईडसारख्या समस्येची असू शकतात. (World Thyroid Day) शरीरातील काही हार्मोनमध्ये झालेल्या बदलांमुळे आपल्याला एकाएकी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मग अशावेळी आपल्याला अचानक काय झाले असा प्रश्न आपल्याला पडतो. पण मग योग्य ती तपासणी केल्यानंतर थायरॉईड झाल्याचे निदान होते. आता अशी कोणती लक्षणे आहेत ज्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असून दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

(Image : Google)

१. वजन अचानक खूप वाढणे किंवा कमी होणे 

वजन अचानक खूप वाढणे किंवा खूप कमी होणे हे थायरॉईडचे सर्वात पहिले लक्षण आहे. शरीरात थायरॉईड हार्मोन कमी झाला की वजन अचानक वाढायला लागते, याला हायपोथायरॉईडिझम म्हणतात. तर थायरॉईड हॉर्मोनचे प्रमाण वाढले की वजन खूप कमी होते, याला हायपरथयरॉईडिझम म्हणतात. 

२. गळ्याला सूज 

गळ्याला सूज येणे हे थायरॉईडचे आणखी एक लक्षण आहे. हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड अशा दोन्हीमध्ये ही सूज येते. त्यामुळे गळ्याला सूज येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 

३. हृदयाच्या गतीमध्ये बदल

थायरॉईड हा हार्मोन शरीराच्या जवळपास सर्व गोष्टींवर परिणाम करतो. त्यामुळे या हार्मोनमध्ये बदल झाल्यास हृदयाच्या गतीमध्येही बदल दिसून येतो. ज्यांना हायपोथायरॉईडिझम आहे त्यांच्या हृदयाची गती कमी होत जाते तर ज्यांना हायपरथायरॉईडिझम आहे त्यांच्या हृदयाची गती एकाएकी खूप वाढते. तसेच थायरॉईडमुळे ब्लड प्रेशरही वाढते.    

(Image : Google)

४. सतत मूड बदलणे 

थायरॉईड हार्मोनमध्ये बदल झाल्यास आपल्या मूडमध्येही सतत बदल होत राहतात. हायपोथायरॉईडिझममध्ये रुग्णाला थकवा, सुस्ती, उदासिनता येते. तर हायपरथायरॉईडिझममुळे सतत झोप येणे, अस्वस्थता, काळजी वाटणे, चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात. याचा आपल्या दैनंदिन आरोग्यावर परिणाम होतो.

५. केस गळणे 

केस गळणे हे हार्मोनमध्ये बदल होण्याचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. ही समस्या हायपोथायरॉईडिझम आणि हायपरथायरॉईडिझम अशा दोन्हीमध्ये आढळते. एकाएकी खूप जास्त प्रमाणात केस गळत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईडची चाचणी करुन घेणे हिताचे ठरते. एकदा थायरॉईडवरील उपचार पूर्ण झाले की पुन्हा नव्याने केस यायला लागतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स