स्वच्छता ही निरोगी आरोग्यासाठीची अत्यावश्यक बाब आहे. स्वयंपाकघरापासून टॉयलेट बाथरुमपर्यंत सगळीकडे स्वच्छतेचे प्राथमिक नियम पाळले तरच आरोग्य निरोगी राहतं हे वास्तव आहे. त्यामुळे आजही वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्वच्छता पाळा, स्वच्छ हात धुवा हे संदेश जाहिरातीतून दिले जातात. घरातल्या स्वच्छतेची काळजी जाते. पण बाहेरच्या स्वच्छतेचं काय?
आज आपला निम्मा दिवस घरात आणि निम्मा दिवस ऑफिस, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर जातो. ऑफिसात/ प्रवासात जातो. साहजिकच दिवसातून अनेकवेळा सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो. ही स्वच्छतागृहं अस्वच्छ असली तर ( मुळात ती अस्वच्छच असतात) घरात आपण कितीही स्वच्छाता पाळून अरोग्याची काळजी घेत असू पण सार्वजनिक स्वच्छतागृहतील अस्वच्छतेचा व्हायचा तो परिणाम आपल्या आरोग्यावर होतोच.
19 नोव्हेंबर हा दिवस ‘वर्ल्ड टॉयलेट डे’(World Toilet Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रामुख्यानं स्वच्छतागृहांच्या महत्त्वाबद्दल, त्याचा योग्य आणि सुरक्षित वापर करण्याबद्दल बोललं जातं. 2021 ची ‘वल्र्ड टॉयलेट डे’ची थीम आहे ‘व्हॅल्युइंग टॉयलेटस’ आपल्या जगण्यात टॉयलेटसला महत्त्व द्या. आजही अनेक देशात घरात टॉयलेटची व्यवस्था नाही, पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहं नाहीत. निरोगी जगायचं असेल तर स्वच्छ टॉयलेटही तितकंच गरजेचं आहे हे प्रत्येकानं समजून घेणं, त्याबाबत स्वत: जागरुक राहाणं, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करतांना जबाबदार राहाणं गरजेचं आहे हे जगभरात सांगितलं जातं.
Image: Google
सार्वजनिक स्वच्छतागृह आणि महिलांचं आरोग्य हा विषय कायम चर्चेत असतो, पण म्हणून त्यावर योग्य तोडगा निघाला आहे असं नाही. आज महिला जेवढ्या प्रमाणात घराबाहेर पडून काम करतात तेवढ्या प्रमाणात त्यांच्यासाठी बाहेर स्वच्छतागृहांची सोय नाही. यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आंदोलनं उभारली. आज जेवढी सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांसाठी म्हणून उपलब्ध आहेत ती वापरण्याची देखील अनिच्छा व्हावी इतकी परिस्थिती वाईट आहे. पण नाइलाजास्तव महिलांना ती वापरावी लागतात. इतकंच नव्हे तर बहुतांश सरकारी, खाजगी कार्यालयांमधील महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. आता याबाबत तेथे काम करणार्या महिलांनीच आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छतेचा महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणम होत असल्याचं अनेक अभ्यास आणि निरीक्षणातून पुढे आलं आहे. येथील अस्वच्छता ही गरोदर स्त्रियांमधे आजार उद्भवण्यास, मासिक पाळीदरम्यान संसर्ग होण्यास कारणीभूत ठरत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञदेखील सांगत आहेत.
सार्वजनिक स्वच्छतागृह आणि संसर्गाचा धोका
1. वेगवेगळ्या सामान्य जिवाणुंचा आणि घातक विषाणुंचा संसर्ग हा अस्वच्छ टॉयलेट सीटद्वारे होतो. यातून घसा, त्वचा याच्याशी निगडित आजारांचा संसर्ग होतो. अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहातील केवळ टॉयलेटचे पॉटसच नाही तर तेथील दारं, हॅण्डल्स, नळ हा प्रत्येक घटक संसर्गाचं माध्यम ठरु शकतं. येथील अस्वच्छतेमुळे थंडी ताप, पिंक आय ( संसर्गजन्य डोळ्यांचा दाह) यासारखे आजार उद्भवतात.
2. महिलांमधे प्रामुख्याने योनिमार्गाचा संसर्ग हा आजार आढळून येतो. सार्वजनिक स्वच्छतागृहातील अस्वच्छता आणि योनिमार्गाचा संसर्ग यांच्या संबधाबद्दल वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, महिलांमधे हा संसर्ग होण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे गुदद्वार आणि योनीमार्ग हे एकमेकांच्या खूपच जवळ असतात. त्यामुळे एका ठिकाणचा जिवाणू सहजपणे दुसर्या ठिकाणीही वसाहत करतो. त्यामुळेच अस्वच्छ स्वच्छतागृहांचा वापर करतांना हा जीवाणूसंसर्ग झाला तर तो योनीमार्गातून पटकन मूत्रमार्गापर्यंत पसरतो. हा संसर्ग थेट मूत्राशयातही सहज पसरतो. यामुळे योनीमार्गात दाह होणं, अती पांढरा स्त्राव जाणं, लघवी करतांना योनीमार्गात दहा आणि ओटीपोटात वेदना होणं यासारख्या त्रासापासून थंडी ताप, उलट्या यासारखे गंभीर त्रास होवून अनेक महिलांना दवाखान्यात दाखल करावं लागतं. यात टॉयलेटची अस्वच्छता हे प्रमुख कारण असतं.
3. उपायाचे अपाय हा देखील गंभीर परिणाम याबाबतीत महिलांमधे दिसून येतो . बाहेर दीर्घकाळपर्यंत वावरायचं तर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणं अनिवार्य असतं. पण तेथील अस्वच्छतेचा अनुभव असल्यामुळे अनेकजणी बाहेर टॉयलेटला जायलाच नको म्हणून लघवी आली तरी रोखून धरतात. आणि घरी आल्यानंतरच लघवीला जातात. पण स्रीरोग तज्ज्ञ म्हणतात हा उपाय महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. हा उपाय होवूच शकत नाही. लघवी रोखून धरणं ही अशी कृती आहे ज्यामुळे मूत्राशयात जिवाणुंची वाढ होते आणि संसर्ग होतो. योनीमार्गातील संसर्गाला लघवी रोखून धरणं हे देखील प्रमुख कारण असतं.
Image: Google
चेन्नई येथील अपोलो हॉस्पिटलमधील सल्लागार युरोगायनॉकलॉजिस्ट डॉ. विजयश्री सर्वानन म्हणतात की, याविषयीचा अभ्यास सांगतो की दर दोन महिलांपैकी एका महिलेला योनीमार्गातील संसर्गाचा सामना करावा लागतो. तर योनिमार्गाचा संसर्ग झालेल्या एकूण महिलांच्या एक तृतियांश महिलांना पुन्हा पुन्हा योनिमार्गाच्या संसर्गाला सामोरं जावं लागत असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे लघवी रोखणं हा संसर्ग टाळण्याचा मार्ग असूच शकत नाही. उलट यामुळे योनीमार्गाच्या संसर्गाबरोबरच किडनीस्टोनसारख्या गंभीर समस्याही उद्भ्वतात. 'लघवी रोखणं= योनीमार्गातील संसर्ग' असं समीकरण डॉ. विजयश्री सांगतात.
4. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर टाळण्यासाठी अनेक महिला बाहेर गेल्यानंतर लघवी लागूच नये म्हणून पाणीच पित नाही. यामुळे अशा महिलांना लघवी साफ न होण्याचा त्रास होतो. यामुळे लघवी करताना लघवी थोडी थोडी होणं, लघवी करताना जळजळणं असे त्रास होतात.
म्हणूनच यावर्षीच्या 'वर्ल्ड टॉयलेट डे'च्या थीमचा पुन्हा एकदा नीट विचार करायला हवा. तो जितका महिलांनी करणं गरजेचं आहे तितकाच व्यवस्थांनी करणं देखील महत्त्वाचं आहे. आपल्या जगण्यात टॉयलेटला महत्त्व द्या. टॉयलेट बांधा आणि त्याचा वापर करा. सोबतच स्वच्छ देखील ठेवा हे सांगण्याची आज जास्त गरज आहे!
हे लक्षात ठेवा!
- सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करताना आधी पाणी टाकून टॉयलेट सीट स्वच्छ करुन घ्यावं.
- आपण स्वत: स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर जबाबदारीनं पुरेसं पाणी टाकून ते स्वच्छ ठेवणं.
- स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणं.
- बाहेर असताना पुरेसं पाणी पिणं.
- नैसर्गिक धर्म रोखून न धरणं.