Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > यामी गौतमला आहे बरा न होणारा स्किनचा आजार, केराटोसिस पिलारीस; काय असतो हा आजार? कशाने होतो?

यामी गौतमला आहे बरा न होणारा स्किनचा आजार, केराटोसिस पिलारीस; काय असतो हा आजार? कशाने होतो?

यामी गौतम आपल्या आजाराविषयी जितक्या मोकळेपणाने बोलते, तसा स्वतःचा स्वीकार जमेल आपल्याला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 02:26 PM2021-10-05T14:26:10+5:302021-12-28T14:44:07+5:30

यामी गौतम आपल्या आजाराविषयी जितक्या मोकळेपणाने बोलते, तसा स्वतःचा स्वीकार जमेल आपल्याला?

Yami Gautam has incurable skin disease, keratosis pilaris; What is this disease? What happens | यामी गौतमला आहे बरा न होणारा स्किनचा आजार, केराटोसिस पिलारीस; काय असतो हा आजार? कशाने होतो?

यामी गौतमला आहे बरा न होणारा स्किनचा आजार, केराटोसिस पिलारीस; काय असतो हा आजार? कशाने होतो?

Highlightsमाझे हे आजारपण मला लपवता येणार नाही. त्यामुळे याविषयी लोकांना सांगायला हवंसमस्येला स्विकारा, सामोरे जा आणि स्वत:वर आधीइतकेच प्रेम करा

अभिनेत्री यामी गौतम ही तिच्या सुंदर दिसण्यामुळे आणि उत्तम अभिनयामुळे आणि वेगळेपणामुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकताच यामीने आपल्याला असलेल्या एका आजारपणाविषयी खुलासा केला आहे. तिला लहानपणापासून त्वचेचा एक आजार आहे पण मागील चार वर्षांपासून या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून सध्या आपण त्याचा सामना करत असल्याचे तिचे म्हणणे आहे. हा आजार त्वचेशी निगडित असून त्याचे नाव केराटोसिस पिलेरिस (Keratosis Pilaris) असे आहे. यामध्ये त्वचा कोरडी पडते आणि त्वचेवर काही डाग पडतात. या आजारावर अद्याप कोणते ठोस उपचार नसले तरीही मी डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे तिने यामध्ये म्हटले आहे. यामी सोशल मीडियावर कायम एक्टीव्ह असते. तिचे फॅन फॉलोइंगही खूप मोठे आहे. आपल्या या समस्येबाबतही तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली असून त्यामध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत्.

यामीने नुकतेच एक फोटोशूट केले आणि त्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्टही केले. त्यावर तिने एक मोठी पोस्ट लिहीत आपल्या या समस्येबाबत सांगितले आहे. यामी म्हणते, मी फोटोशूट पूर्ण केले आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये माझ्या फोटोंवर बरीच प्रक्रिया करावी लागली. त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे माझे हे आजारपण मला लपवता येणार नाही. त्यामुळे याविषयी लोकांना सांगायला हवं. म्हणूनच जे आहे त्याचा मी स्विकार करायचे ठरवले आहे आणि ही गोष्ट तुमच्याशी शेअर करत आहे. पोस्टच्या शेवटी यामी लिहीते, डोळ्याखाली आलेले काळे डाग एकसारखे करावेत किंवा वाढलेली कंबर आकारात आणावी असे मला वाटत नाही, तरीही मला खूप छान वाटते.

त्यामुळे तुम्हालाही आरोग्याची अशाप्रकारची कोणती समस्या असेल तर तुम्ही आत्मविश्वास गमावू नका. त्या समस्येला स्विकारा, सामोरे जा आणि स्वत:वर आधीइतकेच प्रेम करा. आपल्याला भेडसावणाऱ्या एखाद्या समस्येने घाबरुन न जाता त्यावर बोला. त्यामुळे तुम्हाला त्याबाबत काही गोष्टी समजायला नक्कीच मदत होऊ शकते. यामीने ज्याप्रमाणे स्वत:ला सत्य लपविण्याबाबत प्रश्न विचारला तसाच प्रश्न तुम्हीही स्वत:ला विचारु शकता. आता हा आजार नेमका काय असतो ते समजून घेऊया...

(Image : Googel)

आजारात नेमके काय होते?

१. ही त्वचेची एक समस्या असून यामध्ये त्वचा कोरडी पडणे आणि त्वचेवर पुरळ येतात.

२. अनेकदा हे व्हॅक्सिंगमुळे झाले आहे असे आपल्याला वाटते.

३. हे पुरळ किंवा कोरडेपणा हाताबरोबरच मांड्या, गुडघे, कोपर याठिकाणीही होऊ शकतो.

४. वातावरणातील बदलांमुळे याचे प्रमाण कमी-जास्त होते.

५. आपल्या त्वचेत केरेटीन नावाचा एक घटक असतो. या घटकाचे प्रमाण शरीरात ज्याठिकाणी जास्त असते तिथे अशाप्रकारची समस्या उद्भवते.

६. मॉइश्चरायझरमुळे त्वचेवरील हा कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.

७. याबरोबरच डॉक्टर काही क्रीम देतात त्याचाही ही समस्या कमी होण्यास मदत होते.

( Image : Google)
( Image : Google)

ताण घेऊ नका, अगदी सामान्य समस्या - डॉ. केतकी गोगटे, त्वचारोगतज्ज्ञ

याबाबत बोलताना त्वचारोगतज्ज्ञ डॉ. केतकी गोगटे म्हणाल्या, अनेक मुलींमध्ये ही समस्या असते. मात्र त्याचा फार ताण घ्यायची आवश्यकता नाही. ही समस्या म्हणजे खरं तर त्वचेचा आजार म्हणण्यापेक्षा सौंदर्याच्यादृष्टीने त्याकडे जास्त पाहिले जाते. कारण त्वचेवरील हा कोरडेपणा आणि पुरळ कधी कमी होतात तर कधी एकाएकी वाढतात. त्याचे नेमके कारण, उपाय यावरही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. अनेक मुलींना ही समस्या काही काळासाठी उद्भवते आणि नंतर एकाएकी त्वचेवरील हे पुरळ नाहीसेही होते. त्यामुळे तरुणींनी याचा फार बाऊ करायचे कारण नाही. मात्र तुम्ही कला किंवा हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात कार्यरत असाल तर मात्र हे दिसू नये यासाठी वेळीच त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला चांगला.  

Web Title: Yami Gautam has incurable skin disease, keratosis pilaris; What is this disease? What happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.