आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर सतत लॅपटॉप नाहीतर मोबाइलवर असतो. सध्या कामाला त्याच्याशिवाय पर्यायही नाही. मात्र याच्या अतिवापराने कालांतराने आपल्याला पाठ दुखणे, मान अवघडणे, खांदे दुखणे अशा समस्या उद्भवतात. या समस्या सर्वच वयोगटांमध्ये अगदीच सामान्य झाल्या आहेत. मात्र कामाला पर्याय नसल्याने हे दुखणे सुरुवातीला डोकं वर काढते आणि हळूहळू वाढत जाते. एकवेळ अशी येते की आपली मान आणि खांदे इतके दुखतात की आपल्याला दैनंदिन व्यवहार करणेही अवघड होऊन जाते. मान अवघडली की आजुबाजूचे सगळेच स्नायू दुखायला लागतात. अशी अवघडलेली मान घेऊन आपल्याला कुठे जाताही येत नाही आणि इतर कामेही करणे अवघड होते. मानेचे दुखणे सुरू झाल्यावर त्यापासून आराम मिळावा म्हणून करता येतील अशी सोपी योगासन (Yoga asana For Neck Pain Relief)...
१. मार्जारासन
मांजर ज्याप्रमाणे अंग वार खाली करते तसे या आसनात केले जात असल्याने याला मार्जारासन म्हटले जाते. मानेवर आलेला ताण कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. सामान्यपणे पाठ आणि पोटासाठी केला जाणारा हा व्यायामप्रकार मानेचे स्ट्रेचिंग होण्यासाठीही तितकाच उपयुक्त असतो. अवगडलेली, दुखत असलेली किंवा ताण आलेली मान व्यवस्थित होण्यास हे आसन उपयुक्त ठरते.
२. भुजंगासन
मानेचे दुखणे कमी होण्यासाठी कोबरा पोज म्हणजेच भुजंगासन अतिशय उपयुक्त ठरते. मानेच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. ओटीपोटापासूनचा सगळा भाग वरच्या बाजूला उचलल्यामुळे मान आणि मणक्यावरील दबाव वाढतो. यावेळी पेशींची सक्रियता वाढून तणाव कमी होतो. त्यामुळे मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी भुजंगासन उपयुक्त असते.
३. नटराजासन
नटराजासन हे आसन शरीराच्या एकूण ठेवणीत सुधारणा करण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. पेशींचा ताण कमी करण्यासाठी, पाठीच्या कण्याला ताण पडण्यासाठी आणि मानदुखी कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आसन आहे. मानेबरोबरच खांदे, पाठ, हात आणि पाय या सगळ्यांना ताण पडत असल्याने हे आसन करणे उपयुक्त ठरते. मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करण्यासाठी या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे नियमितपणे नटराजासन केल्यास आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात.