सिद्धी शाह
रिमोटने ज्याप्रमाणे रोबोट्सना ताब्यात ठेवले जाते त्याचप्रमाणे सध्याच्या यंत्रयुगात आपण सर्वजण यंत्रांच्या ताब्यात आहोत. तंत्रज्ञान हे एक वरदान समजले जात असले तरीही या तंत्रज्ञानाचे आपल्या शरीरावर विशेषत: डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम देखील लक्षात घेतले पाहिजेत. कोरोना महामारीच्या काळाने आपल्याला स्क्रीनसमोर जास्त वेळ बसण्यास भाग पाडले आणि पर्यायाने, आपण अधिक प्रमाणात यंत्रांच्या स्वाधीन झालो. मुलांच्या ऑनलाईन शाळा, संगणकासमोर तासानतास बसावे लागणे, नोकरदार वर्गासाठी असलेल्या ऑनलाईन बैठका, एवढेच नव्हे तर आपल्या मित्र व कुटुंबीयांचे स्नेहमेळावे देखील व्हिडीओ द्वारे भरू लागले (Yoga for Eyes). आपण या नव्या जीवनशैलीला सरावलो खरे; परंतु घरात सुरक्षित राहण्याच्या नादात आपण या सर्व यंत्रांवर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो (International Yoga Day 2022).
कोणत्याही कारणास्तव स्क्रीनसमोररचा वाढलेला वेळ आरोग्यासाठी घातक असतो तसेच तो डोळ्यांच्या आरोग्यासाठीही घातकच ठरतो. अनेक लोकांना डोळ्यांना थकवा येणे, कोरडेपणा येणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोकेदुखी, डोळ्यांना खाज सुटणे अशी बरीच लक्षणे जाणवतात. अशा वेळी आपण घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने आपणच आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायची गरज असते. डोळ्यांचा योग किंवा डोळ्यांचे व्यायाम आपल्या डोळ्यांना आराम देऊन त्यांना पुन्हा ताजेतवाने करण्यास मदत करतात.
डोळ्यांचा योग म्हणजे काय?
डोळ्यांचा योग म्हणजे काही सोप्या व्यायामांच्या मदतीने आपण नैसर्गिकरित्या डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंध करून डोळ्यांचे संरक्षण करू शकतो. डोळ्यांचे हे व्यायाम आपण घरी अथवा ऑफिसमध्ये केव्हाही करू शकतो.
हे व्यायाम आपण का करावेत?
डोळ्यांचा योग हा संगणकासमोर बसल्याने डोळ्यांना होणाऱ्या त्रासावर (कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम) उपचार करण्याचा एक अत्यंत सोपा व प्रभावी मार्ग आहे. CVS हे सर्वसामान्यपणे डोळ्यांना जाणवणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासांचे नाव आहे. यालाच डिजिटल ताण असेही म्हणतात. डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोकेदुखी, मान व खांदे दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांची अतिरिक्त उघडझाप होणे, डोळ्यांना थकवा येऊन डोळे दुखणे, डोळे जड होणे, दृष्टी धूसर होणे, डोळ्यांची एकाग्रता न होणे, डोळ्यांची शक्ती वाढवणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. गेल्या काही वर्षात यंत्रांच्या अतिवापरामुळे लहान मुले व तरुण वर्गांमध्ये CVS चे प्रमाण वाढते आहे.
डोळ्यांचा योग केल्याने काय फायदा होतो?
शारीरिक व्यायाम व योग्य आहाराच्या मदतीने आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. परंतु,डोळे हा तितकाच महत्वाचा असलेला अवयव मात्र कायम दुर्लक्षित राहतो. डोळ्यांचा योग केल्याने आपल्याला दररोज डोळ्यांची काळजी घेण्याची एक प्रकारची शिस्त लागते. दररोज काही मिनिटे आपल्या डोळ्यांकडे लक्ष दिल्याने आपण डिजिटल ताणावर मात करू शकतो तसेच विविध समस्यांपासून डोळ्यांचा बचाव करू शकतो.
व्यायाम कधी व कसा करावा ?
१. कामातून थोडी विश्रांती घेऊन २०-२०-२० हा नियम वापरा. (म्हणजेच २० फूट अंतरावर नजर ठेवून दर २० मिनिटांनी २० सेकंदांचा विराम घ्या)
२. पाल्मिंग- डोळ्यांना आराम देऊन पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी सर्वोत्तम आणि अतिशय महत्वाचा व्यायाम आहे. हातांचे तळवे एकमेकांवर घासून त्यामध्ये उष्णता व उर्जा निर्माण करा. हे गरम झालेले तळवे दोन्ही डोळ्यांवर ठेवा, असे करत असताना शरीर सैल सोडून दीर्घ श्वास घेत राहा. तासनतास स्क्रीनसमोर बसल्यानंतर किंवा पुस्तक वाचल्यानंतर हा व्यायाम करावा.
३. डोळ्यांना मसाज करा- आपण स्क्रीनसमोर बसलेले असतो तेव्हा डोळ्यांभोवतीच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांना धूसर दिसते आणि डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांभोवती गोलाकार मसाज केल्याने डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या नसा सैल होऊन दृष्टी स्वच्छ होते. अंगठ्याच्या सहाय्याने हलकेच दाब देत बुबुळापाशी, भुवयांच्या खाली व डोळ्यांभोवती अंगठा फिरवा. डोळ्यांची बुबुळे काळजीपूर्वक दाबा. अशाप्रकारे 3 वेळा करा.
४. थंड गुलाबपाण्यात कापूस भिजवणे - ही क्लुप्ती मुलांसाठी व्यायाम म्हणून वापरावी. यामुळे मुलांच्या डोळ्यांना आराम पडतो व डोळ्यांचे जडत्व जाऊन डोळे शांत होतात. कापूस गुलाबपाण्यात भिजवा आणि २-३ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. जास्त वेळ ऑनलाईन शाळा किंवा डिजिटल/ व्हिडीओ बैठका झाल्यानंतर दिवसातून दोन वेळा असे करायला हरकत नाही.
(लेखिका नेत्रयोगतज्ज्ञ आहेत)