Join us   

कडाक्याच्या थंडीत ताक-दही नको, पण गरमागरम कढी चालते का? तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 3:49 PM

दही-ताकाला उत्तम पर्याय असणारी कढी खाण्याचे एकाहून एक भन्नाट फायदे

ठळक मुद्दे थंडीच्या दिवसांत दही, ताकाला उत्तम पर्याय ठरु शकते कढीगरमागरम कढीचे एकाहून एक प्रकार करा आणि वाढवा जेवणाची लज्जत

राज्यात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अशा वातावरणात सतत गरम काहीतरी प्यावेसे वाटते. शरीरातील उष्णता वाढण्यासाठी आणि घशाला आराम मिळण्यासाठी आपण सगळेच चहा, कॉफी, सूप, गरमागरम कढण असे काही ना काही आहारात घेत असतो. आहारातील महत्त्वाचा पदार्थ असलेले दही आणि ताक थंडीच्या दिवसांत नको वाटते. पण शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन देणारा हा पदार्थ खायलाच हवा असेही एकीकडे वाटत असते. एरवी खवल्यांचे दही आणि ताकाशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही पण थंडीच्या दिवसांत मात्र यावर ताबा ठेवावा लागतो. अशावेळी दह्याची कढी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

आयुर्वेदात तर दही खाण्याचे अनेक तोटे सांगितले आहेत, याबरोबरच दही कधी, केव्हा, कोणी खावे याविषयीही आयुर्वेदात नेहमी सांगितले जाते. मात्र याच दह्याचे ताक आरोग्यासाठी अतिशय चांगले असते पण थंडीत ते पीणे शक्य नसल्याने ताकाची गरमागरम कढी अतिशय उत्तम लागते. घशाला शेक मिळण्यासाठीही त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. आपल्याकडे गोळ्यांची कढी, शेवगा घालून केलेली कढी, मेथीची कढी असे एकाहून एक चविष्ट प्रकार केले जातात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे सांगत आहेत ताकाची कढी खाण्याचे एकाहून एक फायदे

(Image : Google)

कढीचे फायदे 

१. कढी ही ताकापासून तयार केली जात असल्याने दही खाण्याचेच फायदे आपल्याला कमी-अधिक प्रमाणात यातून मिळू शकतात.

२. दही गरम करुन खाऊ नये असे एकीकडे म्हणत असताना आपण ताक गरम करुनच त्याची कढी करतो, मात्र दही गरम करण्याचा दोष याठिकाणी लागू होत नाही. 

३. कढी तयार करताना आपण त्यामध्ये आलं, लसूण, कढीपत्ता, मेथ्या असे अनेक घटक वापरतो. या प्रत्येक घटकाचे आरोग्यासाठी अतिशय चांगले फायदे असून त्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

४. कढीपत्ता, लसूण, आले यांसारख्या घटकांमुळे दह्यातील दोष कमी होतात. तसेच या मसाल्याच्या पदार्थांमधील कृमीनाशक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने कढीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

५. कढी ही उत्साहवर्धक आणि आपल्याला तरतरी आणणारी ठरु शकते. थंडीच्या दिवसांत आणि सध्या एकूणच साथींचे वातावरण असताना घशाला आराम मिळण्यासाठी कढी हा अतिशय उत्तम पर्याय आहे. 

६. दही पचायला जड असते असे आपण म्हणतो, मात्र कढी पचनाला हलकी असल्याने अपचन किंवा पोटाशी निगडीत इतर तक्रारी उद्भवत नाहीत. कढी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. तसेच सर्दी-खोकला यांसाठीही कढी हा उत्तम उपाय ठरु शकतो, त्यामुळे घशाला आराम मिळण्यासाठी कमी प्रमाणात कढी खाल्लेली चांगली. 

(Image : Google)

७. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी दही खाऊ नये असे सांगितले जाते, मात्र अशांसाठी कढी हा उत्तम उपाय ठरु शकतो. यांबरोबरच मूत्रविकारांवरही कढी खाणे अतिशय उपयुक्त ठरते. 

८. दही पचण्यास जड असते, त्यासाठी यकृत आणि किडणीला अधिक कष्ट करावे लागतात मात्र कढी यकृत आणि मूत्राशय यांना स्वच्छ ठेवण्याचे काम करते.   

टॅग्स : आरोग्यअन्नहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी