डिप्रेशन किंवा नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. यात सतत कशाचे तरी वाईट वाटत राहणे, उदास वाटणे, कुठल्याच भावना न वाटणे अशा गोष्टी घडतात. थोडक्यात नैराश्याचा स्त्रीच्या विचार करण्यावर, वर्तणुकीवर आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. रजोनिवृत्तीच्या म्हणजेच मेनोपॉजच्या काळात जर डिप्रेशन आलं तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता असते. पेरी मेनोपॉज म्हणजे मेनोपॉज येण्याआधीचा काळ, या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. पेरीमेनोपॉज साधारण वयाच्या चाळिशीनंतर सुरु होतो. यात हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक बदलही व्हायला सुरुवात होते. ज्यातून काही वेळा डिप्रेशन येण्याची शक्यता असते.
डिप्रेशनची लक्षणं १) सतत उदास वाटणं. अस्वस्थता आणि अकारण चिडचिडेपणा २) कुठल्याही गोष्टीचा आनंद घेता न येणं ३) झोपेचे प्रश्न, झोप न लागणं किंवा अतिझोप येणं ४) बाह्य जगाशी संपर्क कमी होणं ५) सतत दमल्यासारखं वाटणं.
डिप्रेशनची कारणं १) रजोनिवृत्ती आणि पेरी मेनोपॉजमुळे डिप्रेशन येऊ शकतं. २) मेनोपॉजमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही डिप्रेशन येतं. ३) या काळात शरीरातील एस्ट्रोजेनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे भावनिक चढ उतार व्हायला लागतात. उदा. सतत उदासवाणं वाटणे, थकवा आणि मूड सविंग्स ४) जर तुम्हाला डिप्रेशनची लक्षणं गंभीर वाटत असतील तर लगेच डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. ५) लक्षणांचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या नुसार उपचार सांगितले जातात.
डिप्रेशन जाणवत असेल तर काही गोष्टी नक्की करा.
१) लाईफ स्टाईल बदल गरजेचा आहे हे लक्षात घ्या. २) खूप काम असलं तरी त्यांचं टेन्शन घेऊ नका. एकदम सगळं काम करण्यापेक्षा छोटी टार्गेट्स ठेवा, एक एक पूर्ण करत जा. म्हणजे ताण येणार नाही. ३) कामाचे अग्रक्रम ठरावा. काय आधी करायला हवं, काय नंतर याच नियोजन केलं की ताण येत नाही आणि निराशा वाटत नाही. ४) रोज व्यायाम करायला सुरुवात करा. ५) घराबाहेर पडा. कार्यक्रम, नाटक, सिनेमा बघायला जा. मित्रमंडळींना भेटा. ६) स्वतःसाठी वेळ काढा आणि डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठीही स्वतःला वेळ द्या. एका क्षणात बदल होत नाहीत.
आपल्या डिप्रेशनची लक्षणं दिसतायेत ही गोष्ट कुणाही पासून लपवून ठेवू नका. डिप्रेशन हा मानसिक आजार असला तरी त्याची लाज वाटून घ्यायचं कारण नाही. वेळेवर डॉक्टर्स, समुपदेशकांची मदत घेतली, उपचार घेतले, जीवनशैलीत बदल केले तर डिप्रेशनवर मात करता येऊ शकते. विशेष आभार: डॉ. उमा सिंग, (MBBS, MS)