Lokmat Sakhi >Health >Menopause > चाळीशीनंतर ‘तरुण’ राहण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी घ्यावी का? मेनोपॉजच्या त्रासातून त्यानं सुटका होते का?

चाळीशीनंतर ‘तरुण’ राहण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी घ्यावी का? मेनोपॉजच्या त्रासातून त्यानं सुटका होते का?

मेनोपॉजनंतरची हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी कुणी घेणं योग्य, तिचे फायदे तोटे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2024 06:17 PM2024-02-06T18:17:28+5:302024-02-06T18:23:41+5:30

मेनोपॉजनंतरची हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी कुणी घेणं योग्य, तिचे फायदे तोटे काय?

hormone replacement therapy after menopause, risk-benefits and health | चाळीशीनंतर ‘तरुण’ राहण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी घ्यावी का? मेनोपॉजच्या त्रासातून त्यानं सुटका होते का?

चाळीशीनंतर ‘तरुण’ राहण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी घ्यावी का? मेनोपॉजच्या त्रासातून त्यानं सुटका होते का?

Highlightsस्त्रिया आपल्या आयुष्यातील जवळपास एक तृतीयांश भाग मेनोपॉजनंतर जगतात. ते सुखकर करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनही गरजेचा आहे.

-डॉ. गौरी करंदीकर

केबिनमधून बाहेर पडलेली सोनल परत आत आली. म्हणाली, डॉक्टर, एक विचारू का? मी असं ऐकलं की पाळी गेल्यानंतर पण तरुण होण्यासाठी गोळ्या असतात. थेरपी असते म्हणे. तिला म्हंटलं थेरपी आणि सर्वांत आधी मेनोपॉज म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मेनोपॉज म्हणजे काय? स्त्रिया जन्माला येताना स्त्रीबीजाचा साठा घेऊन येतात. वयात आल्यानंतर हा साठा वापरला जाऊ लागतो. साधारण ४५ -५० व्या वर्षीपर्यंत तो पुरतो. त्यानंतर तो संपतो. दर महिन्याला बीज तयार होते, त्यामुळे गर्भाशयात अंतस्तर तयार होते व पाळी म्हणून बाहेर येते. बीजाचा साठा संपला की, अंतास्तर तयार होत नाही आणि पाळी पण बंद होते. यालाच मेनोपॉज असे म्हणतात.

 

(Image :google)

या सर्व प्रक्रियेमध्ये इस्त्रोजन हा महत्त्वाचा घटक ऊर्फ हार्मोन तयार होत असतो.
इस्त्रोजन असताना तो बायकांना अनेक प्रकारे साथ देत असतो. त्वचा टवटवीत राहणे, चेहेरा बिन सुरकुतीचा ठेवणे, सुडौल बांधा ठेवणे, हाडांची घनता कायम ठेवणे, स्मरणशक्ती छान ठेवणे, रक्तदाब आणि रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवणे असे स्त्रियांचे आयुष्य चालवण्यासाठीचे अनेक कार्य करण्यासाठी हा हार्मोन झटत असतो. त्याचबरोबर पाळी नियमित ठेवणे, योनी मार्ग आणि लघवीच्या जागेचे आरोग्य जपण्यामध्ये महत्त्वाचा रोल या इस्त्रोजनचा असतो.

मेनोपॉजनंतर हार्मोन रिप्लेसमेण्ट?

पाळी गेली की, शरीरात या इस्त्रोजनची कमतरता तयार होते. पण व्हिटॅमिनची कमतरता झाली आणि ती भरून काढली एवढे ते सोपे नसते. नैसर्गिकरीत्या बनणारा इस्त्रोजन हा औषध म्हणून घेताना अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. गर्भाशयाची सोनोग्राफी, स्तनांची तपासणी, गर्भपिशिवीमध्ये कॅन्सर नसल्याची खात्री करण्यासाठी चाचण्या कराव्या लागतात.

(Image :google)

मेनोपॉज आणि पुढे..

कधी कधी खूप गरम होते, अचानक घाम येतो. अगदी आपल्याला काही बरेवाईट होईल का इतकी धडधड होत झोप उडते. झोप अपुरी झाल्याने सकाळी व्यायाम होत नाही आणि हे पोटाचा घेर सुटत चाललाय. शिवाय कधी कधी खूप निराश वाटतं, रडावसं वाटतं मी अशी नव्हते आधी!
मेनोपॉजच्या काळात अनेकींना असा त्रास होतो.
१. पाळी बंद होण्याच्या आधी आणि नंतरचा एक काळ आहे, जेव्हा इस्त्रोजनची कमतरता जाणवू लागते आणि ही सगळी लक्षणे दिसू लागतात. पाळी साधारण ४५-५० वयापर्यंत बंद होते. काही स्त्रियांची पाळी पन्नाशीनंतरसुद्धा बंद होऊ शकते.
२. पण खूप आधी म्हणजे ४० व्या वर्षाआधी बंद झाली तर त्याला प्रिमॅच्युअर मेनोपॉज किंवा ओव्हरीयन इन्सफिशियन्सी म्हणतात. या स्त्रियांना हार्मोन रिप्लेसमेण्ट थेरपी अथवा एचआरटी देणे गरजेचे आहे. काहींना नैसर्गिकरीत्या किंवा काहींना शस्त्रक्रिया किंवा कॅन्सरसारख्या आजारांच्या औषध उपचारांमुळे लवकर मेनोपॉज येतो.

३. इस्त्रोजनसारखे किंवा इस्त्रोजन असलेली औषधं यात दिली जातात. त्यामुळे मेनोपॉजनंतर होणारे बदल काही वर्षे लांबवता येतात.
४. प्रिमॅच्युअर ओव्हरीयन इन्सफिशियन्सीबरोबर अचानक घाम येणे, हॉट फ्लॅशेस, योनी मार्ग आणि लघवीची जागा इथला कोरडेपणा, लघवी करताना त्यावरचा ताबा कमी होणे व हाडे ठिसूळ होऊ नये या साठी एचआरटी दिली जाते.
५. गोळ्या, त्वचेवर लावायचे पॅच, योनी मार्गाद्वारे वापरायचे जेल असे अनेक प्रकाराने वापरता येतील, अशी साधने उपलब्ध आहेत.

एचआरटी कुणासाठी नाही..

१. ज्या स्त्रियांना स्तनाचा अथवा गर्भाशयाचा कर्करोग झाला असेल, ज्यांना हृदयविकार असतील, मायग्रेनसारखी डोकेदुखी असेल, रक्त लवकर गोठण्याची प्रकृती किंवा विकार असतील, यकृताचे विकार असतील त्यांना एचआरटी देणे वर्ज असते. एचआरटीसारखे पण वेगळ्या प्रकारांनी मदत करतील, अशी औषधे देता येतात.
२. ज्या स्त्रियांना मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तात लिपिड वाढलेले आहे, स्थूल आहेत किंवा सिगरेटचं व्यसन आहे, त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक असल्या खेरीज एचआरटी देता येत नाही.
३. शिवाय ज्यांना एचआरटी दिली जाते त्यांची नियमित तपासणी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे जरूरी आहे.
४. ज्यांना विविध विकार आहेत, त्यांना एचआरटीमुळे जास्त फायदा होईल की, जास्त धोका निर्माण होऊ शकेल, हे त्यांचे डॉक्टर तपासणी आणि चर्चा करून ठरवू शकतात.
५. याशिवाय गर्भाशय काढलेले आहे किंवा नाही यावर पण काही उपचार अवलंबून असतात.

(Image :google)

संशोधन काय सांगते..

मेनोपॉजनंतर १० वर्षे किंवा ६५ वर्षांचे वय होईपर्यंत एचआरटी दिली जाऊ शकते. संशोधन सांगते की, त्याहून अधिक काळ आणि जास्त वर्षे त्याचा वापर करायचा की, नाही याचा विचार होणारा त्रास आणि थेरपीमुळे मिळणारे फायदे हे लक्षात घेऊन उपचार करावे लागतात. त्यामुळे फक्त सुंदर दिसणे नव्हे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी एचआरटी उपयुक्त ठरू शकते. त्यासोबत योग्य आहार कॅल्शियम आणि व्हिटॅमिन जरूरीचे असतात. नियमित व्यायाम, कार्डिओसोबत स्नायू बळकट ठेवणारे व्यायामही करायला हवे. बायकांना मेनोपॉजनंतर स्नायूंमध्ये दुखापत, हाडे ठिसूळ होत असल्यामुळं लवकर फ्रॅक्चर होऊ शकते.

मन:स्वास्थ्यासाठी नियमित मेडिटेशन, एखादा छंद जोपासणे, नवनवीन कला गोष्टी शिकत राहणे मन:स्वास्थ्य आणि स्मरणशक्ती दोन्ही जपण्यासाठी मदत होते. आयुर्मान वाढत असल्यामुळे स्त्रिया आपल्या आयुष्यातील जवळपास एक तृतीयांश भाग मेनोपॉजनंतर जगतात. ते सुखकर करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनही गरजेचा आहे.

(स्त्री आरोग्य व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ)
khrc@hotmail.com

Web Title: hormone replacement therapy after menopause, risk-benefits and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.