रजोनिवृत्ती. स्त्रीच्या आयुष्यातील अटळ गोष्ट. या काळात हार्मोन्सच्या उलथापालथीमुळे स्त्रीच्या शरीरात प्रचंड बदल होतात, त्यातून काही लक्षणं उद्भवतात. ही लक्षण कधी नुसतं अस्वस्थ करतात तर कधी काळजीत पाडतात. शरीरात असणार्या हार्मोन्सचं कार्य फक्त प्रजनन प्रक्रियेपुरतं सिमीत नसतं तर आपल्या शरीराचा अख्खा सांगाडा नि दातांचं आरोग्य याशीही त्यांचा संबंध असतो. इस्ट्रोजेनची पातळी खालावण्यातून हाडांचा जो ठिसूळपणा जाणवू लागतो तो केवळ कंबरेची किंवा पाठीची हाडं कमजोर करतो असं नव्हे. या ठिसूळपणाचा संबंध जबड्यातील हाडांपर्यंतही पोहोचतो. त्यामुळं दात नि दाढांच्या तक्रारी सुरू होतात.
रजोनिवृत्ती आणि दातांच्या आरोग्याचा काय संबंध?
तोंडात असणार्या म्युकोसा म्हणजे श्लेष्मल त्वचेवर इस्ट्रोजेन रिसेप्टर्स असतात. शरीरातील इस्ट्रोजेनच्या पातळीत काही कमीजास्त झालं तर त्याचा थेट परिणाम ओरल कॅव्हिटीवर होतो. रजोनिवृत्तीच्या काळात म्हणूनच स्त्रियांना दातांचे व दाढांचे त्रास अधिक जाणवू लागतात आणि त्यामुळेच या काळात पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेणं भाग पडतं. शरीरात होणार्या हार्मोनल बदलाचा प्रजोत्पादन क्षमतेवर, पचनसंस्थेवर जसा परिणाम होतो तसाच परिणाम तोंडातील नाजूक पेशींवर होतो. तोंडातील म्युकोसा नि लाळग्रंथींमध्ये असणारे सेक्स हार्मोन रिसेप्टर्सही या प्रक्रियेत भरडले जातात. त्यातून मुखआरोग्य धोक्यात येतं.
दातदुखी कशाने..
इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळं जबड्यातील हाडांवर परिणाम होऊन दातांमध्ये फटी पडतात, ते हलू लागतात. पेरिओडॉन्टियम म्हणजे दात आणि भवतालची हाडं यांच्यामधील खाच आणि पेशींचं जाळं. हिरडी, दातांची मुळं, त्यादरम्यानची हाडं, हाडांसारखे असणारे स्नायू, पेशींचं भक्कम जाळं व त्याला ताणून आलेली निराळ्या तर्हेची त्वचा अशा कितीतरी जटिल भागांनी आपल्याला दिसणारा दातांचा सांगाडा साधलेला असतो. हा पेरिओडॉन्टिमवर सेक्स हार्मोन्समुळं सजग असतो. रजोनिवृत्तीमुळं पेरिओडॉन्टिमच आजारी होण्याची शक्यता तयार होते.
त्याची लक्षणं काहीशी अशी -
- हिरड्यांना सूज येणे व त्यातून दातांमध्ये फटी पडणं
- हिरड्या हुळहुळ्या होणं, दाह होणं
- हिरड्यांमधून रक्तस्राव, पू होणं
- खाताना वेदना
- दात सैल होणं
- तोंडाचा वास येणं
- हिरड्यांची जागा बदलणं, त्यावर लालसर, जांभळट रंग येणं
- झेरोस्टोमिया म्हणजे तोंडाला कोरड पडणं
- तोंड येणे
- दातांची झीज होण्यातून व पोकळ्या राहाण्यातून वेदना
- चावताना, चघळताना दुखणं
- तोंडाची चव जाणं
वरीलपैकी कुठलीही लक्षणं असतील तर ताबडतोब दंतवैद्य गाठावा व उपचार सुरू करावेत.
-विशेष धन्यवाद- डॉ. प्रीती देशपांडे ( M.S.(OBGY), FICOG, Endoscopy Training IRCAD (France)