पाळी येणं हे प्रत्येकीच्या आयुष्यात जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढंच महत्त्वाचं आहे पाळी जाणं. पाळी जाण्याच्या या प्रक्रियेलाच आपण मेनोपॉज म्हणतो. या काळात प्रत्येकीला जाणवणारा त्रास वेगवेगळा असतो. कुणाला खूप जास्त त्रास होतो तर कुणाला पाळी कधी गेली हे कळतंही नाही. कुणाची खूप जास्त जाडी वाढते तर कुणी मानसिक दृष्ट्या खूपच अस्थिर होऊन जातं. मेनोपॉज ही एक नैसर्गिक घटना आहे. ती घडावी म्हणून कुणी काहीही प्रयत्न करण्याची गरज नसते. पण मेनाेपॉजचा त्रास होऊ नये, म्हणून प्रत्येकीने स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे, असंही ऋजूता दिवेकर यांनी सांगितलं.
याविषयी सांगताना ऋजूता म्हणतात की पाळी येणार असते तेव्हा साधारण एखाद्या वर्षभरापासून तिच्या शरीरात बदल दिसू लागतात. हे बदल पाहून वयाने मोठ्या असणाऱ्या अनुभवी महिलांना लगेचच समजते की काही दिवसात या मुलीला पाळी येणार. तसंच काहीसं मेनोपॉजचं असतं. मेनोपॉज एकदम येत नाही. तो येण्याआधी एक- दिड वर्ष तुमच्या शरीरात काही बदल सुरू झालेले असतात. एखाद्या वयस्कर स्त्रीला हे बदल लगेचच ओळखूही येतात. ही लक्षणं दिसू लागल्यावर मेनोपॉजसाठी शरीर तयार करण्याचा विचार करत असाल तर तशी चूक करू नका. मेनोपॉज यायचा तेव्हा येईल, पण तुम्ही मात्र कमी वयापासूनच आहार आणि व्यायाम यांच्यावर जोर द्या, असेही दिवेकर यांनी आवर्जून सांगितले.
मेनोपॉजविषयी महत्त्वाचे
१. शरीरात होतात बदल
मेनोपाॅजदरम्यान तुमचं शरीर निश्चितच बदलतं. पण बदलण्याला बिघडणं समजू नका. कारण योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आपण मेनोपॉजनंतर आपलं शरीर बिघडणार नाही याची काळजी घेऊ शकतो. शरीर बदलणं आणि बिघडणं यात खूप अंतर आहे. थोडी काळजी घेतली तर हे अंतर निश्चितच जपता येतं. मेनोपॉजदरम्यान इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी कमी होत जाते. ही पातळी हळू- हळू कमी झाली तर मेनोपॉजचा त्रास जाणवत नाही. यासाठी योग्य आहार घेण्याची आणि शरीरात होणारे सगळे बदल शांततेत स्विकारण्याची गरज आहे. मेनोपॉजदरम्यान आपलं इस्ट्रोजन जसं कमी होतं तसंच बॉडी फॅट वाढत जातं. ते याेग्य प्रमाणात वाढलं तर मेनोपॉजदरम्यान खूप जास्त वजन वाढणं, हेअर लॉस, मानसिक अस्थैर्य असे काही त्रास जाणवत नाहीत. मेनोपॉजचा पॅच निघून गेल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमचं वाढलेलं वजन नियंत्रणात आणू शकता.
२. आपल्याकडच्या खाद्य पदार्थांमधलं वैविध्य जपा
आपल्याकडचं लोकल, सिझनल आणि ट्रॅडिशनल फूड खायला जे डाएट परवानगी देत असेल, असंच डाएट फॉलो करा. आपल्याकडे प्रत्येक हंगामात, प्रत्येक सणाला वेगवेगळे पदार्थ केले जातात. ही खाद्य संस्कृती आपली मोठी ताकद आहे. ज्या सणात ज्या पदार्थाचं महत्व आहे किंवा ज्या हंगामात जे फळं, पदार्थ मिळतात, ते भरपूर खा. आपल्या संस्कृतीनुसार जर खाद्य पदार्थांमधली ही विविधता जपली तर शरीराला मोठ्या प्रमाणात मायक्रो न्यूट्रीएंट्स मिळतात. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, आयर्न, फॉलिक ॲसिड असे घटक जर शरीराला योग्य प्रमाणात मिळाले तर निश्चितच मेनोपॉजचा त्रास कमी होतो.
३. वेटलॉस कसा असावा
वेटलॉस करताना वजन कमी करण्याच्या मागे लागण्यापेक्षा चांगलं आणि सकस खाण्याचा प्रयत्न करा. सस्टेनेबल वेटलॉस कसा होऊ शकेल, याकडे लक्ष द्या. सस्टनेबल वेटलॉस म्हणजे जो तुम्हाला तुमचे स्थानिक खाद्य पदार्थ खाण्याची परवानगी देतो. खाण्यातला आनंद मिळवून देतो आणि रात्रीची उत्तम झोप देऊन तुम्हाला फिट ठेवतो. झपाट्याने वजन कमी करण्याच्या नादात लागू नका. हळू- हळू वजनावर नियंत्रण मिळवा. वेटलॉस हा हळूवार आणि टिकून राहणारा असावा.
४. असं ठेवा व्यायामाचं रुटीन
दर आठवड्यात तीन तास वर्कआऊट करणं गरजेचं आहे. यामध्ये दोन दिवस तुम्ही स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि बोन डेन्सिटी, मसल टोन करणारा व्यायाम केला पाहिजे. दोन दिवस योगासने केली पाहिजेत आणि उरलेले दोन दिवस सायकलिंग, वॉकिंग किंवा इतर कोणताही व्यायाम प्रकार केला पाहिजे.
५. या गोष्टीही लक्षात ठेवा
शरीरातले हार्मोन्स संतूलित ठेवण्यासाठी वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं खूप जास्त गरजेचं आहे. रात्री ९: ३० ते ११ यावेळेत आपण झोपलंच पाहिजे आणि सकाळी ६- ७ च्या दरम्यान उठलं पाहिजे. दुपारी २० मिनिटांची छोटीशी नॅप नक्की घ्या. कारण यामुळे शरीरातले हार्मोन्स नियंत्रित ठेवायला खूप जास्त मदत होते. पण २० मिनिटांपेक्षा जास्त अजिबात झोपू नका. झोप कंट्रोल होत नसेल तर खुर्चीवर बसून डूलकी घ्या. हे रूटीन अगदी तरूण वयापासून पाळलं तर मेनोपॉजचा त्रास अजिबातच जाणवणार नाही, असंही ऋजूता यांनी सांगितलं.