डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
मेनोपॉजबाबत महिलांच्या मनात बरेच गौरसमज असतात. हे गैरसमज वेळीच दूर झाले नाहीत तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. इतकेच नाही तर मेनोपॉजबाबत आपण डॉक्टरांशी न बोलता ओळखीच्यांशी किंवा नातेवाईकांमधील महिलांशी बोलतो. यामुळे आपल्या मनात असणाऱ्या शंका दूर न होता त्याबाबत आणखी गुंतागुंत निर्माण होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेनोपॉजशी निगडीत समस्यांवर अतिशय प्रभावी असे उपाय उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणतेही दुखणे कारण नसताना सहन करत राहायची काहीच गरज नाही. फक्त वैद्यकीय सल्ला वेळेवर घेऊन त्याचे तंतोतंत पालन करायला हवे. कोणतेही दुखणे अंगावर काढणे ही आपल्याकडील महिलांची खासियत असून त्यामुळे अडचणी जास्त वाढतात (Navratri Special Health Misconceptions about Menopause).
आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा..
मेनोपॉजचं वय साधारणपणे ४८-४९ वर्षे आहे.आयुष्याच्या या टप्प्यावर इतरही अनेक व्याधी शरीरात प्रवेश करतात. मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड यांसारख्या समस्या चाळिशीनंतर सुरू होतात. यासाठीच्या तपासण्या नियमितपणे करणे गरजेचे असते. या तपासण्या बहुतेक स्त्रिया अजिबातच करत नाहीत आणि मग होणाऱ्या त्रासाला मेनोपॉजचे नाव देऊन मोकळ्या होतात.
- पाळीचे त्रास, सतत वाढणारे वजन,अंगावर सूज, त्वचेचा कोरडेपणा, केस गळणे या सर्व गोष्टी थायरॉईडच्या समस्येमध्ये दिसू शकतात.
- योनीमार्गात सतत खाज सुटणे,लघवीचा जंतुसंसर्ग,अशक्तपणा,शरीराचा विशेष करून पायाचा दाह होणे,वजन वाढणे ही लक्षणे मधुमेहाचीही असू शकतात.
- छातीत धडधडणे, एकदम घाम येणे, डोकेदुखी, मुंग्या येणे, मूड्समध्ये सातत्याने होणारे बदल हे वाढलेल्या रक्तदाबामुळेही किंवा क्वचित हृदयरोगाचे लक्षण असू शकते.
- संधीवाताची सुरुवातसुद्धा साधारण चाळिशीनंतर होऊ शकते.
त्यामुळे स्वतःच हा त्रास मेनोपॉजचा आहे असे निदान न करता डॉक्टरांचा सल्ला वेळेत घ्यावा हे उत्तम!! मेनोपॉजचा त्रास भारतीय बायकांना कमी होतो अशी वैद्यकीय क्षेत्रात आत्तापर्यंत समजूत होती. एकत्र कुटुंब पध्दतीमुळे आपल्या स्त्रियांना कौटुंबिक आधार उत्तम असायचा, मानसिक एकटेपणा येत नसे. बदलत्या काळानुसार कुटूंबाचा आकार छोटा होत गेल्याने स्त्री हल्ली मेनोपॉजच्या वयात खूप एकटी पडू लागली आहे. घरट्याबाहेर पडलेली मुलं आणि कामात मग्न नवरा अशी परिस्थिती असल्याने या स्त्रिया फार लवकर नैराश्याने घेरल्या जातात आणि मग निराश मन वेगवेगळ्या व्याधींना शरीरात लगेच आमंत्रण देतं. तेव्हा मेनोपॉज हा वैताग किंवा व्याधी न होता ती आयुष्यातील एक फेज आहे हे लक्षात घेऊन त्याकडे सकारत्मकतेने पाहूया आणि वेळीच योग्य ती काळजी घेऊया.
(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)
(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)