Join us   

मेनोपॉज सुरु झाला, गर्भनिरोधक गोळ्या घेणं थांबवायचं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 3:41 PM

रजोनिवृत्तीचं एक वय नाही. किंवा रजोनिवृत्ती कधी होईल हे सांगणारी कुठलीही टेस्ट उपलब्ध नाही. अशावेळी रजोनिवृत्तीहा काळ पूर्ण होत नाही तोवर गर्भनिरोधक बंद करू नयेत.

ठळक मुद्दे रजोनिवृत्तीहा काळ पूर्ण होत नाही तोवर गर्भनिरोधक बंद करू नयेत. अती ताण (हायपरटेन्शन), अती  थायरॉईड, मधुमेह किंवा इतर कुठल्याही आजारपणात गर्भनिरोधक गोळ्या लगेच बंद केल्या पाहिजेत.पंचेचाळिशीनंतर रजोनिवृत्तीच्या खुणा दिसायला लागल्या असतील तर लगेच डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे. त्या वयात कुठल्या प्रकारचे गर्भनिरोधक वापरायचे याची माहिती डॉक्टरांकडून घेणं आवश्यक आहे.

तिशीनंतर गर्भधारणेची क्षमता झपाट्याने कमी कमी होऊ लागते. अर्थात अनपेक्षित प्रेग्नन्सीचा धोका ब-याच काळापर्यंत असतो. मोठ्या वयात गर्भधारणा  होण्यामध्ये अनेक धोके असतात. हॅमरेज, पायांच्या शिरांचे आजार, मृत्यू, बाळाला होऊ शकणारे आज आणि इतर..जसं काही वरचेवर गर्भपात होणं, मृतबाळाचा जन्म आणि बाळामध्ये जन्मजात असलेल्या कमतरता. त्यामुळे गर्भनिरोधक घेणं कधी थांबवायचं याचा विचार काळजीपूर्वक घेतला पाहिजे, मोठ्या वयात अनियोजित गर्भधारणा टाळली पाहिजे.

एखाद्या स्त्रीमधील प्रजनन क्षमता नेमकी वयाच्या कुठल्या वर्षी संपुष्टात येते हे सांगणं कठीण आहे कारण याबाबत कुठल्याही ठोस गोष्टी उपलब्ध नाहीत आणि प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्या बदलतात. रजोनिवृत्तीपर्यंत पोचेपर्यंत प्रत्येक स्त्रीचं शरीर पूर्णपणे बदललेलं असतं. अगदी वयाच्या पन्नाशीत असलेल्या स्त्रियांच्या बाबतीतही एकच गोष्ट सगळ्यांना लागू होते असं म्हणता येऊ शकत नाही.

तरीही साधारण प्रजननाची क्षणात ४० ते ६० च्या दरम्यान संपते.

रजोनिवृत्ती म्हणजे काय?

एका विशिष्ठ वयात स्त्रीला जशी पाळी येते तशीच ती एका विशिष्ठ वयात जाते. म्हणजे पाळी थांबते आणि स्त्रीची प्रजनन क्षमता संपते. ज्या काळात स्त्रीला नियमित पाळी येत असते त्याच काळात फक्त ती प्रजननक्षम असते.

रजोनिवृत्तीच्या आधी पेरीमेनोपॉजचा टप्पा येऊन जातो. म्हणजे प्रत्यक्ष रजोनिवृत्ती होण्यापूर्वीचा काळ. या काळात प्रचंड हार्मोनल असमतोल शरीरात तयार होतो. पेरीमेनोपॉजचा कालावधी सर्वसाधारणपणे चार वर्षांचा असू शकतो. अर्थात व्यक्तीनुसार तो बदलतो हेही लक्षात घेतलं पाहिजे. या काळात मासिक पाळी अनियमित व्हायला सुरुवात होते.

 

गर्भनिरोधक कधी बंद करावेत?

* ज्या स्त्रियांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे आणि जर त्या नॉन हार्मोनल पद्धती वापरत असतील तर त्यांनी रजोनिवृत्तीनंतर १२ महिन्यांनी गर्भनिरोधकांचा वापर थांबवला तरी चालू शकतो. मात्र पन्नाशी खालच्या स्त्रियांनी २४ महिने म्हणजे दोन वर्ष थांबावे. दोन वर्षांनंतर गर्भनिरोधक बंद करण्याचा त्या विचार करू शकतात.

* ज्या स्त्रिया डीएमपीए पद्धत वापरतात (यात इस्ट्रोजेन मोठ्या प्रमाणावर वापरलेलं असतं.) त्यांना नॉन हार्मोनल पद्धतींकडे वळण्याचा सल्ला दिला जातो. कारण सातत्याने हार्मोन्स जर शरीरात जात राहिली तर त्याचा हाडांच्या मजबुतीवर परिणाम होतो.

* गर्भनिरोधक गोळ्या रजोनिवृत्ती येईपर्यंत चालू ठेवल्या तरी चालू शकतात.

* लैंगिक आजारांचं प्रमाण चाळिशीनंतर वाढतं असंही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कंडोम हा वापरलाच गेला पाहिजे.

*  अती ताण (हायपरटेन्शन), अती  थायरॉईड, मधुमेह किंवा इतर कुठल्याही आजारपणात गर्भनिरोधक गोळ्या लगेच बंद केल्या पाहिजेत.

रजोनिवृत्तीचं एक वय नाही. किंवा रजोनिवृत्ती कधी होईल हे सांगणारी कुठलीही टेस्ट उपलब्ध नाही. अशावेळी रजोनिवृत्तीहा काळ पूर्ण होत नाही तोवर गर्भनिरोधक बंद करू नयेत. लैंगिक आजार आणि अनपेक्षित गर्भधारणा या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी कंडोमचा वापर केलाच पाहिजे. गर्भनिरोधक कधी बंद करायचे हा शेवटी त्या स्त्रीचा निर्णय असला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये पाळी जाण्याच्या काळावर या संदर्भातील कौटुंबिक इतिहासही महत्वाचा मनाला जातो. पंचेचाळिशीनंतर रजोनिवृत्तीच्या खुणा दिसायला लागल्या असतील तर लगेच डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे. त्या वयात कुठल्या प्रकारचे गर्भनिरोधक वापरायचे याची माहिती डॉक्टरांकडून घेणं आवश्यक आहे. आणि मग त्यानुसारच निर्णय घेतला पाहिजे.

विशेष आभार: डॉ. रितू जोशी

 (MS Gyn & OBSTET)