Join us   

मेनोपॉजच्या काळात स्किन प्रॉब्लम्स छळतात. त्यावर हे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 5:02 PM

पाळी जाण्याच्या काळात शरीरात त्वचा नि स्नायू नैसर्गिकरित्या मऊ व तुकतुकीत राहावेत यासाठी आपोआप तयार होणार्‍या तेलाची निर्मिती थांबते. ती थांबेतच पण त्वचेची आणि स्नायूची ओलावा आणि नैसर्गिक तेल धरून ठेवायची क्षमताही कमी कमी होत जाते. या सगळ्यांतूनच त्वचेच्या तक्रारी सुरू होतात.

ठळक मुद्दे त्वचा कोरडी पडणं, खाज सुटणं, मुरूम येणं आणि वयाचा परिणाम त्वचेवर जाणवणं म्हणजे ती निस्तेज वाटणं, सुरकुतल्यासारखी होणं अशा अनेक तक्रारी याकाळात सुरु होतात.त्वचेवर पुरळ उठणं, रॅश येणं, पिग्मेंटेशन (डाग पडणं) आणि सुरकुत्या पडणं अशा तक्रारीही अनेक स्त्रियांना भेडसावतात. त्वचेला धरून ठेवणारा साचा म्हणजे मॅट्रिक्स जात राहिल्यामुळं त्वचा लोंबल्यासारखी वाटायला लागते.पाळी जाण्याच्या काळात हार्मोनल बदल होतात . इस्ट्रोजेनची पातळी खालावल्यामुळं ‘कोलॅजेन’चं उत्पादन घटतं.

रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समध्ये प्रचंड बदल होत असल्यामुळं स्त्रीच्या शरीरात कधी नव्हे इतक्या नव्याच त्रासदायक तक्रारी सुरू होतात. योनीभागातला कोरडेपणा, दाताच्या तक्रारी, हॉट फ्लॅशेश, मूड स्विंग्ज, रात्री अचानक दरदरून घाम फुटणं अशा कितीतरी तक्रारींसोबत आणखी एक तक्रार असते ती त्वचेबाबतीतली. त्वचा कोरडी पडणं, खाज सुटणं, मुरूम येणं आणि वयाचा परिणाम त्वचेवर जाणवणं म्हणजे ती निस्तेज वाटणं, सुरकुतल्यासारखी होणं अशा अनेक तक्रारी सुरु होतात.  प्री-मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याच्या पूर्वी सर्वसाधारणपणे जाणवणारा त्रास सतत खाज सुटण्याचा. या तक्रारीला मेडिकलच्या भाषेत ‘प्रुरिटस’ असं म्हणतात. असं का होतं? पाळी जाण्याच्या काळात हार्मोनल बदल होतात .  इस्ट्रोजेनची पातळी खालावल्यामुळं ‘कोलॅजेन’चं उत्पादन घटतं. कारण ते अवलंबून असतं इस्ट्रोजेनवर. कोलॅजेनमुळं आपली त्वचा तुकतुकीत राहाते. घट्ट राहाते. ती सैल पडत नाही. इस्ट्रोजेनमुळेच आपल्या ग्रंथींमधून नैसर्गिक तेल पाझरतं आणि  त्वचेला मऊपणा मिळतो. हे सगळं थांबल्यामुळं त्वचा रखरखीत होऊन खाज सुटते. गंमत म्हणजे, इस्ट्रोजेनची पातळी या दिवसांत खालावली तरी अँड्रोजेनची मात्र जैसे थे असते.

हातपाय, छाती, मान, पाठ, चेहरा, कोपर, चेहर्‍याचा टी झोन येथील त्वचेवर हार्मोन्सच्या उलथापालथीचा परिणाम होतो.  खाजेचं रूपांतर काही पेशंट्समध्ये एक्झेमापर्यंत (इसब) पोहोचतं. पाळी जाण्याच्या काळात शरीरात त्वचा नि स्नायू नैसर्गिकरित्या मऊ व तुकतुकीत राहावेत यासाठी आपोआप तयार होणार्‍या तेलाची निर्मिती थांबते. ती थांबेतच पण त्वचेची आणि  स्नायूची ओलावा आणि  नैसर्गिक तेल धरून ठेवायची क्षमताही कमी कमी होत जाते. या सगळ्यांतूनच त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. त्वचेवर खाज उठण्याशिवाय पुरळ उठणं, रॅश येणं, पिग्मेंटेशन (डाग पडणं) आणि सुरकुत्या पडणं अशा तक्रारीही अनेक स्त्रियांना भेडसावतात. त्वचेला धरून ठेवणारा साचा म्हणजे मॅट्रिक्स जात राहिल्यामुळं त्वचा लोंबल्यासारखी वाटायला लागते. एंड्रोजेनिक अ‍ॅलोपोसियामुळे नखं चटकन तुटू लागतात आणि केस अगदी पातळ व्हायला सुरूवात होते.

 

यावर उपाय  काय? - घराबाहेर पाऊल टाकताना सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडू नका. एसपीएफ 30 किंवा त्याहून जास्त असलेलं सनस्क्रीन योग्य. एज स्पॉट हे पाळी जाण्याच्या काळात उद्भवणारं लक्षण. वेगवेगळ्या जागा बदलणारं पिग्मेंटेशन हे सूर्याच्या उष्णतेतूनच होतं, त्यामुळं सनस्क्रीन अत्यंत गरजेचं. ते दर दोन तासांनी नव्यानं लावायला हवं. अनेकदा ढगाळ वातावरणातही त्वेचेला हानी पोहोचवणारी किरणं असतात. त्यामुळं ही काळजी नेहमीच घ्यायला हवी. - कितीही असह्य झालं तरी खाजवू नका. त्रास होत असेल तर थंड पाण्याच्या घड्या वापरा. नखं टोकदार ठेवू नका. - शांत झोपा, काळजी करू नका. - स्मोकिंग आणि अल्कोहोल टाळा. नियमित व्यायाम करा. - खाण्यात स्मार्ट फॅट्स वापरा. खाण्यात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स ठेवल्यानं त्वचा मऊ व तेलयुक्त राहाते. आक्रोड, सॅल्मन, अ‍ॅल्ग्यू ऑईल्स, अंडी, फ्लॅक्स सीड्स, सूर्यफुलाचं तेल अशा गोष्टीतून ओमेगा 3 मिळतं. त्यांचा आहारात वापर असू द्या. - स्टीम बाथ एकवेळ फायद्याची ठरते पण गरम पाण्याची अंघोळ आधीच ओलावा हरवलेल्या त्वचेसाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यातून त्वचा अधिक कोरडी पडण्याचा धोका हमखास असतो. त्यामुळं गरम पाण्याची अंघोळ कितीही हवीहवीशी वाटली तरी टाळणं योग्य. - सुगंधी फेसाचे साबण ओल हरवलेल्या त्वचेला अधिक नुकसान पोहोचवतात. त्यामुळं सुवासिक नसलेले सौम्य साबण वापरावेत. - अंघोळीहून आल्या आल्या ताबडतोब मॉयश्‍च्युराझर वापरावं. नैसर्गिक खनिज तेलयुक्त क्रीम अथवा पेट्रोलियम जेलीचा खूप फायदा होतो. - हायड्रोकोर्टिजन क्रीम खाजणार्‍या त्वचेसाठी लाभदायी ठरते. - शरीर आतून आर्द्र राहिल याची काळजी घेणं महत्त्वाचं. - अ आणि क जीवनसत्वे असणारी टॉपिकल क्रीम त्वचा राखते. चेहर्‍यावरील त्वचेचं कोरडेपण आणि खाज टाळण्यासाठी त्वचा रोज तज्ज्ञ ग्रीन टी, व्हिटॅमीन सी, शिआ बटर, लॅक्टिक अ‍ॅसिड, हिअ‍ॅल्युरॉनिक अ‍ॅसिड वापरण्याचा सल्ला पेशंटनुसार देतात. - फायटोएस्ट्रोजेनसारखं हर्बल सप्लिमेंट वापरता येणं शक्य असतं. - चेहर्‍यावर जमा होणारी मृत त्वचा निपटून काढण्यामुळेही तिचा तकतकितपणा, तजेला आणि चमक टिकून राहाते.

रजोनिवृत्तीदरम्यान उद्भवणार्‍या त्वचेच्या आणखी काही अडचणी - हायपोथायरॉइडिझम हा हार्मोन्सबाबतीतला मुद्दा वगळला तरी त्वचेच्या तक्रारी निर्माण होण्याचं कारण बुरशी संसर्ग आणि  जीवनसत्त्वांची कमतरता हे ही असू शकतं. - पाळी जाण्यापूर्वीच्या लक्षणांचा भाग म्हणून त्वचेच्या तक्रारी उत्पन्न झाल्या असतील तर अँटिबायोटिक्सपेक्षा अँटिअँड्रोजेन्सचा फायदा जास्त होतो. लेसर पील थेरपीचाही उपयोग होऊ शकतो. मात्र त्यासाठी त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला आवश्यक. - डर्मल फिलर्स, कोलॅजेन बिल्डिंग फिलर्स यांच्यामुळं त्वचा सैल पडणं, सुरकुत्या येणं कमी होऊ शकतं. पाळी जाण्यापूर्वी होणार्‍या बदलांमध्ये आणखी एक आढळणारी तक्रार म्हणजे सेबेर्‍हिक केराटॉसिस. याचा अर्थ नॉन कॅन्सरस स्किन कंडिशन. वाढत्या वयाचा जणू हा पुरावा. गुलाबी, तपकिरी, काळ्या अशा कोणत्याही रंगाचे मस किंवा चामखीळ चेहर्‍याच्या, मानेच्या किंवा अन्य त्वचेवर उठणं ही सर्वसामान्यपणे आढळणारी गोष्ट आहे. हे एक किंवा अनेक चामखीळ फ्रीजिंग किंवा स्क्रेपिंग पद्धतीनं आवश्यकतेनुसार काढून टाकता येतात. ---