Join us   

पाळी लवकर का जाते? या आजाराची लक्षणं कोणती? उपचार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 2:33 PM

प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअरची परिस्थिती निर्माण व्हायला अनेक वर्ष लागू शकतात. काही जणींच्या बाबतीत हे अगदी काही महिन्यातही घडू शकतं.

ठळक मुद्दे बऱ्याच वेळा काही विशिष्ट कारण यामागे नसतं. काहीजणींमध्ये इस्ट्रोजेन या हार्मोनच्या लेव्हलमध्ये बदल झालेला असतो.आपल्याला प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर आहे ही बातमी अनेकजणींसाठी ताण निर्माण करणारी असते.प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर आहे याचे निदान काही महत्वाच्या चाचण्या केल्यानंतरच होऊ शकतं. यात रक्त चाचणी, ट्रान्सव्हजनल सोनोग्राफी यांचा समावेश असतो.

प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर म्हणजे लवकर रजोनिवृत्ती येणं. सर्वसाधारणपणे वयाच्या ४२ ते ५६ या वयात रजोनिवृत्ती येते. म्हणजे पाळी जाते. भारतात पाळी जाण्याचं सरासरी वय ४६. २ वर्ष आहे. तर परदेशात ५१ वर्ष. पण वयाच्या १९ ते ३९ या वयोगटातल्या महिलांना काहीवेळा प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर म्हणजे यावेळी रजोनिवृत्ती होऊ शकते. एरवी पाळी जाताना जी लक्षणं असतात तशीच याही वेळी दिसतात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे मासिक पाळी अनियमित होणं. किंवा अचानक बंद होणं. प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअरची परिस्थिती निर्माण व्हायला अनेक वर्ष लागू शकतात. काही जणींच्या बाबतीत हे अगदी काही महिन्यातही घडू शकतं.

प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअरची लक्षणं

१) बऱ्याच वेळा काही विशिष्ट कारण यामागे नसतं. काहीजणींमध्ये इस्ट्रोजेन या हार्मोनच्या लेव्हलमध्ये बदल झालेला असतो.

२) आपल्याला प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर आहे ही बातमी अनेकजणींसाठी ताण निर्माण करणारी असते. कारण याचा थेट अर्थ असा असतो की ती स्त्री यापूढे मूल जन्माला घालू शकणार नसते. ती प्रजननक्षम राहात नाही.

३) अनियमित मासिक पाळी हे महत्वाचं लक्षण असतं. याशिवाय रजोनिवृत्तीत ज्या प्रमाणे हॉट फ्लॅशेस होतात, मूड स्वीन्ग्स आणि प्रचंड घाम येणं यासारख्या समस्या उद्भवतात त्याच समस्या प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअरमध्ये दिसून येतात.

प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअरची कारणं १) रेडिएशन थेरपी २) केमो थेरपी ३) पेल्व्हिक इन्फ्लमेटॉरी डिसीज ४) ट्युबरक्युलॉसिस ५) पेल्विक शस्त्रक्रिया ६) तीव्र एन्डोमेट्रिओसिस ७) टर्नर सिंड्रोम (जो अनुवांशिक असतो) ८) गालगुंडांसारखे संसर्ग ९) हायपोथायरॉईडीझम सारखे हार्मोनल डिसऑर्डर १०) त्वचाक्षय, संधिवात

उपचार

१) प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर आहे याचे निदान काही महत्वाच्या चाचण्या केल्यानंतरच होऊ शकतं. यात रक्त चाचणी, ट्रान्सव्हजनल सोनोग्राफी यांचा समावेश असतो. या चाचण्यांच्या कार्यपद्धतींनंतर प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर आहे की नाही या निष्कर्षावर डॉक्टर्स येतात.

२) रक्त चाचणीनुसार एफएसएच आणि एलएच हे हार्मोन्स असणं. ही चाचणी पाळीच्या २ ते ५ दिवसाच्यामध्ये केली जाते. या रक्त चाचणीतून प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर आहे की नाही हे नीट समजू शकतं. प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअरच्या लेव्हल्सचा वंध्यत्वावरील उपचारांमध्येही उपयोग होतो.

३) ट्रान्सव्हजनल सोनोग्राफीमुळे उपचार नक्की काय करायला हवे हे निश्चित होतं. यात अंडाशयाचा आकार, अंडाशयात जर गाठी असतील तर त्या किती आहेत, त्यांचे आकार कसे आहेत याची तपासणी होते. ही चाचणी पाळीच्या ३ ते ५ दिवसांच्यामध्ये केली जाते. अंडाशयाचा आकार लहान असेल तर प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर असल्याची शक्यता असते.

४) जर मूल होण्यासाठी प्रयत्न सुरु असतील आणि प्रिमॅच्युअर ओव्हरीन फेल्युअर असल्याचा संशय आला तर लगेच फर्टिलिटी स्पेशालिस्टना भेटलं पाहिजे. डॉक्टर्सकडून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन मिळू शकेल.

५) जर मूल जन्माला घालण्याचे प्रयत्न सुरु नसतील तर स्त्री रोग तज्ज्ञ जे उपचार करायला सांगतील ते केले पाहिजेत. ज्यात मल्टीव्हिटॅमिन्स, कॅल्शिअम,  हार्मोनल उपचार असू शकतात. जर लक्षणं तीव्र स्वरूपाची असतील तर हार्मोनल रिप्लेसमेण्ट थेरपीही सांगितली जाऊ शकते.

विशेष आभार: डॉ. मानसी मेढेकर  (M.S. D.N.B., F.I.C.O.G)