Join us   

हातापायांना मुंग्या येतात, बधीर झाल्यासारखे वाटतात अवयव, ही मेनॉपॉजची कुठली लक्षणं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:49 PM

मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या कामाला बहुउपयोगी ठरणार्‍या इस्ट्रोजेनची पातळी खालावण्यातून शरीर अस्थिर होतं. त्याचं कामकाज बिघडतं. जी कामं पूर्वी बिनबोभाट व्हायची त्याचा वेगच लुळा पडतो आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे हातापायात मुंग्या येतात.

ठळक मुद्दे मुंग्या येण्याचं प्रमाण खूप वाढलं किंवा त्यातून येणारं बधीरपण फार काळ टिकत असेल अन याकडे नेहमीची गोष्ट म्हणून दुर्लक्ष झालं तर लक्षणं बळावू शकतात.या स्थितीला मेडिकलच्या भाषेत ‘पॅरेस्थेसिया’ असं म्हणतात.योग्य आहार, सुयोग्य जीवनशैली स्वीकारण्यातून या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येणं शक्य असतं.

 रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समध्ये प्रचंड बदल होत असल्यामुळे शरीराच्या नव्याच अडचणींना स्त्रियांना सामोरं जावं लागत्ं. या अडचणींच्या माळेतली एक तक्रार म्हणजे मुंग्या येण्याची. हात, पाय, पावलं, दंड असा शरीराचा कुठलाही भाग एकदम जडावतो आणि काही काळ अर्धवट संवेदनेत जातो. ही तक्रार गंभीर म्हणता येणार नाही, पण रोजचं नॉर्मल जगताना अध्येमध्येच येणार्‍या मुंग्यांनी अवयव हैराण होतात हे मात्र खरं. असं का होतं नि त्यावर करायचं काय हे नीट समजून घेतलं तर ही तक्रार कमी करता येणं शक्य असतं. हातापायांत मुंग्या येतात म्हणजे?

या स्थितीला मेडिकलच्या भाषेत ‘पॅरेस्थेसिया’ असं म्हणतात. एकाच स्थितीत बराच काळ बसल्यामुळं शरीराच्या कुठल्याही भागात अचानक जडपणा येऊन काही काळ तो अवयव झोपून जाणं म्हणजे मुंग्या येणं. विशिष्ट स्थितीत बसल्यामुळं किंवा उभं असल्यामुळं विशिष्ट जागेची नस किंवा धमनी दाबली जाते व अवयव निद्रिस्त होतो. मात्र स्थितीत बदल केल्यावर थोड्या वेळात सगळं काही नेहमीसारखं होऊन जातं.

 

लक्षणं काय? - सरपटल्याची भीतीदायक भावना - बधीरपण काही काळासाठी अवयवात कमी संवेदना असणं किंवा पूर्णपणे नसणं - तीव्र किंवा दुखल्याची संवेदना - टोचल्यासारखं वाटणं - काही अवयवांवर सुईनं किंवा टोकदार वस्तूनं खुपसल्याची भावना होणं - त्वचेची संवेदनशीलता तीव्र होणं, ती बदलत राहाणं - काही स्त्रियांना शरीरावर एखादा किडा किंवा मुंगी सरपटते आहे असा भास होतो. प्रत्यक्षात असं नसतं. या स्थितीला फॉर्मिकेशन असं म्हणतात.   या मुंग्या कशा काय येतात? मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या कामाला बहुउपयोगी ठरणार्‍या इस्ट्रोजेनची पातळी खालावण्यातून शरीर अस्थिर होतं. त्याचं कामकाज बिघडतं. जी कामं पूर्वी बिनबोभाट व्हायची त्याचा वेगच लुळा पडतो आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे हातापायात मुंग्या येतात. मात्र हार्मोनल बदलाशिवाय मुंग्या येण्याची आणखीही कारणं असू शकतात.  जसे  थायरॉईड, स्ट्रोक, आकडी, हायपर व्हेंटिलेशन, स्पायन कॉर्ड इन्जुरी, कार्पल टनेल सिंड्रोम, डायबेटिक न्यूरोपॅथी, ड्रग टॉक्सिसिटी, व्हिटॅमीन बी 12 चा अभाव, सततची चिंता आणि व्याकूळता इ. मुंग्या येण्याचं प्रमाण खूप वाढलं किंवा त्यातून येणारं बधीरपण फार काळ टिकत असेल तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. याकडे नेहमीची गोष्ट म्हणून दुर्लक्ष झालं तर लक्षणं बळावू शकतात. मान, पाठ नि डोक्याच्या भागाची हानी, बरळल्यासारखं बोलणं, भान जाणं, अशक्तपणा, अवयवांची संवेदना जाणं, चालण्यात अडचणी येणं अशा गोष्टी होण्याची शक्यता असू शकते, म्हणूनच लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

यावर उपाय काय?  योग्य आहार, सुयोग्य जीवनशैली स्वीकारण्यातून या लक्षणांवर नियंत्रण मिळवता येणं शक्य असतं. भरपूर पाणी पिणं, शरीरात ऊर्जा तयार होईल असे व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं, पुरेशी झोप घेणं यातून पाळीच्या दरम्यान उद्भवणार्‍या तक्रारी बाजूला सारता येतात. अशा चांगल्या सवयींच्या पालनातूनही हातापायात मुंग्या येण्याची तक्रार वाढत राहिली तर डॉक्टर हवाच. डॉक्टर कदाचित औषधांऐवजी अल्टरनेटिव्ह थेरपी सुचवू शकतात. एप्सम सॉल्ट बाथ, अ‍ॅक्युपंक्चर, मसाज, व्हिटॅमिन बी 12 अशा वेगळ्या उपायांनी लक्षणं अटोक्यात येण्याची शक्यता असते.