Join us   

मेनोपॉजची कारणं सांगते म्हणत तिला कामचुकार ठरवलं, चिडवलं! असा त्रास महिलांना होतो कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2024 10:00 AM

मेनोपॉजची समस्या महिलांना छळते तेव्हा त्यांचा त्रास समजून घ्यावा असं वातावरण का नाही?

ठळक मुद्दे आपल्याला झाला तो त्रास इतर महिलांना होऊ नये म्हणून कॅरेन काम करते आहे.

माधुरी पेठकर मासिक पाळी या विषयावर जितकं मौन बाळगलं जातं तितकंच रजोनिवृत्ती अर्थात मेनोपाॅजबद्दलही बाळगलं जातं. यावर बोलणं महिलांना नकोसं वाटतं. हा विषय वैयक्तिक, खाजगी आहे. त्यावर चारचौघांत चर्चा कशाला, पाळी सुरू होते तशी थांबतेही. त्यावर बोलण्यासारखं काय? असा विचार करून बायका रजोनिवृत्तीवर बोलायचं टाळतात आणि निमूट त्रास सहन करत राहतात.

आता एका विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. स्काॅटलंड येथील 'युनिव्हर्सिटी ऑफ अबरदिन' हे विद्यापीठ रजोनिवृत्तीच्या काळातील मानसिक आरोग्याचा महिलांवर, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीवर होणारा परिणाम, त्यांना या काळात आवश्यक असलेला आधार, मदत, सुविधा आणि सामाजिक धोरण काय असायला हवं यासंदर्भात अभ्यास आणि संशोधन करत आहे. कॅरेन फार्क्युहार्सन ही ५० वर्षीय महिला विद्यापीठाच्या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावते आहे. रजोनिवृत्तीत महिलांना ज्या लक्षणांचा सामना करावा लागतो त्याचा त्यांच्या व्यावसायिक जीवनावर काय परिणाम होतो हे कॅरेन शोधते आहे. रजोनिवृत्तीच्या काळात व्यावसायिक पातळीवर तिलाही वरिष्ठांकडून हेटाळणी आणि अपमान सहन करावा लागला होता.

कॅरेन एका इंजिनिअरिंग फर्ममध्ये २७ वर्षे काम करत होती; पण ती जेव्हा रजोनिवृत्तीच्या टप्प्यात आली तेव्हा तिची चलबिचल व्हायला लागली, ती अस्वस्थ राहू लागली. आरोग्याच्या समस्येमुळे तिला वरचेवर सुट्या घ्याव्या लागत होत्या; पण कॅरेनसारखं मेनोपाॅजचं कारण पुढे करते असं तिच्या कंपनी मालकाला वाटू लागलं आणि एके दिवशी तर 'तू तुझ्या या मेनोपाॅजसोबतच राहा' असं म्हणत त्यानं तिला राजीनामा देण्यास सांगितलं.

तिने सरळ कंपनी मालकावर केस ठोकली. खटला सुरू झाला. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने कॅरेनच्या बाजूने निकाल दिला. कंपनी मालकाला तिला ३७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा दंड ठोठावला. रजोनिवृत्तीच्या टप्प्यातील महिलांवर टीका करणं, हिणवणं, असंवेदनशीलता बाळगणं, नोकरीवर काढून टाकणं हे चुकीचं आहे, नव्हे दंडास पात्र आहे याकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं. आपल्याला झाला तो त्रास इतर महिलांना होऊ नये म्हणून कॅरेन काम करते आहे.  

टॅग्स : आरोग्यमहिला