मासिक पाळी येणे आणि ती नियमित असणे हे स्त्रियांचे आरोग्य चांगले असण्याचे एक महत्त्वाचे लक्षण असते. साधारणपणे २८ दिवसांनी येणारी मासिक पाळी अनियमित होण्याची समस्या गेल्या काही वर्षात तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरातील कामे, ऑफीस आणि इतर ताण आणि मुख्यत:जीवनशैलीतील बदल यांमुळे मासिक पाळीच्या तारखा पुढे-मागे होण्याची समस्या वाढली आहे. विविध कारणांनी हॉर्मोन्समध्ये होणारे बदल हे यामागचे मुख्य कारण आहे. अनेकींना ४ दिवसाची पाळी १० ते १५ दिवस सुरूच राहते.काहींना केवळ २ दिवसच रक्तस्त्राव होतो. दरम महिन्याला ठराविक अंतराने येणारी मासिक पाळी काहींना २ ते ३ महिन्यातून एकदा येते तर काहींना अगदी १५ ते २० दिवसांतच पुन्हा पुन्हा पाळी येते (3 Easy Exercises to get periods on time) .
यामुळे अतिरिक्त रक्तस्त्राव, त्यामुळे येणारा थकवा, अंगदुखी यांसारख्या समस्या डोकं वर काढतात. हा सगळा त्रास दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरही हॉर्मोन्स नियंत्रीत करण्याची औषधे देतात आणि मग काही काळासाठी या समस्येवर आराम मिळण्यास मदत होते. पण नैसर्गिकरित्या मासिक पाळी नियमित असावी यासाठी नियमितपणे काही योगासने केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. ही आसने कोणती याविषयी प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी इन्स्टाग्रामद्वारे महत्त्वाची माहिती देतात. त्यामुळे तुमचीही मासिक पाळी नियमित नसेल तर ही आसनं नक्की करुन पाहा, ज्यामुळे तुमची पाळी नियमित होण्यास मदत होईल.
१. वायू निशंकासन
मलासनामध्ये खाली बसायचे, दोन्ही हाताचे तळवे पायाच्या तळव्यांच्या खाली घालायचे. हात आणि पायांची पोझिशन तशीच ठेवून कंबरेतून वर उठण्याचा प्रयत्न करायचा. हा व्यायाम किमान १० वेळा करायचा. नियमितपणे हा व्यायाम केल्यास पाळी नियमित होण्यास निश्चितच मदत होईल.
२. बद्ध कोनासन
पायाचा नमस्कार घालून टाचा जास्तीत जास्त जांघेच्या जवळ राहतील असा प्रयत्न करायचा. त्यानंतर कंबरेतून एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने असे १० वेळा गोल फिरायचे. जात्यावर दळण दळण्याची जी पोझ असते ती करायची ज्यामुळे पाळीशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते.
३. पर्वतासनातून भुजंगासन
आपण ही दोन्ही आसनं वेगवेगळी करतो. मात्र एकदा पर्वतासन आणि त्यातूनच भुजंगासन असे करायचे. यामुळे पोटाच्या स्नायुंचा चांगला व्यायाम होण्यास मदत होते, ही सायकल किमान १० वेळा करायची.
फायदे
१. पुनरुत्पादन करणाऱ्या अवयवांमील ऊर्जा वाढण्यास याचा चांगला उपयोग होतो.
२. पेल्विक स्नायू मजबूत करण्यास आणि पेल्विकचे आरोग्य सुधारण्यास फायदा होतो.
३. हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.