काही जणींची पाळी खूपच अनियमित (irregular periods) असते. कधी खूपच लवकर येते तर कधी ८, १० अगदी १५ दिवस उशिराही येते. मासिक पाळीच्या बाबतीतली अशी ही अनियमितता आरोग्यासाठी अजिबातच योग्य नाही. कारण नियमित स्वरुपात येणारी पाळी हे महिलांच्या उत्तम आरोग्याचं लक्षण असतं. म्हणूनच तर मासिक पाळी (menstruation) नियमित करण्यासाठी ३ योगासनं महिनाभर नियमितपणे करा. पाळी तर वेळेत येईलच पण त्यासोबतच ही आसने केल्यामुळे इतरही अनेक फायदे होतील, अशी माहिती इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
पाळी नियमित करणारी योगासनं
१. उत्कट कोनासन (utkata konasana)
उत्कट कोनासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये १ ते दिड फूट अंतर घ्या. पायाची बोट तुमच्या समोरच्या दिशेलाच असतील अशा पद्धतीने पायाची पोझिशन ठेवा. यानंतर गुडघ्यातून दोन्ही पाय वाकवा आणि शक्य तितकं शरीर खाली नेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात डोक्यावर घेऊन नमस्काराच्या अवस्थेत तळहात एकमेकांना जोडा. एकावेळी ही आसन अवस्था ८ सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने ३ वेळ करा.
२. स्कंदासन (skandasana)
स्कंदासन करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा. दोन्ही पायातले अंतर वाढत नेऊन ते १ ते दिड फूट करा. यानंतर पायाचे तळवे अगदी समोर न ठेवता बाहेरच्या बाजूने थोडेसे तिरके करा. यानंतर एक पाय गुडघ्यातून वाकवा, शरीराचा भार त्या पायावर घेण्याचा प्रयत्न करा. असे करताना दुसरा पाय तिरक्या रेषेत पण सरळ राहील याची काळजी घ्या. अशाच पद्धतीने आता दुसऱ्या पायाने करावे. हे आसन पण एकदा केल्यावर ८ सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा, अशाच पद्धतीने ३ वेळा करा.
३. मलासन (malasana)
मलासन करण्यासाठी सरळ उभे राहून दोन्ही पायात अंतर घ्या. दोन्ही हात छातीजवळ नमस्काराच्या अवस्थेत जोडा. दोन्ही पायांचे तळवे बाहेरच्या बाजुने असावेत. आता हळूहळू त्याच अवस्थेत खाली बसा. बसताना दोन्ही हातांचे कोपरे दोन्ही पायांच्या आत असतील, अशा पद्धतीने बसावे.
उत्कटकोनासन, स्कंदासन, मलासन करण्याचे इतर फायदे
१. pelvic opening asanas म्हणून ही ३ आसने ओळखली जातात. पाळी नियमित करणे हा या आसनांचा सगळ्यात मुख्य फायदा.
२. प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांमध्ये रक्तपुरवठा सुरळीत करण्यात मदत होते.
३. PCOS and endometriosis यासारखा त्रास कमी होण्यास मदत.
४. काही जणींना पिरेड्समध्ये खूपच जास्त ब्लिडिंग होते. हा त्रास कमी करण्यासाठी महिनाभर ही ३ आसने नियमितपणे करावीत.
४. पुरुष आणि स्त्री दोघांमधील प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी हे आसन उपयुक्त ठरते.
५. पचनक्रियेच्या समस्या कमी होतात.
६. लेग टोनिंगसाठी उपयुक्त. त्यामुळे मांड्या, पोटऱ्या पाठ या भागातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
ही ३ आसने कुणी करू नयेत
- प्रेग्नंन्सीच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये ही तिन्ही आसने करू नयेत.
- गुडघेदुखी आणि अर्थरायटिसचा त्रास असणाऱ्यांनी ही आसने करू नयेत. किंवा करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- पाठ, कंबरदुखीचा त्रास असेल तरीही ही आसने करणे टाळावे.
- टाचदुखीचा त्रास असल्यास हे आसन करणे टाळावे.