पाळीच्या त्या ४ दिवसांतलं दुखणं (menstrual pain) म्हणजे अनेकींच्या अंगावर काटा आणणारं. कोणाचं खूप जास्त पोट दुखतं, तर कुणाला खूपच जास्त ब्लिडिंग (bleeding) होतं. थकवा, चिडचिड आणि अशक्तपणा हे तर जवळपास प्रत्येकीलाच जाणवतं. हा सगळा त्रासच एवढा असतो की मग पाळीचे ४ दिवस मग आपण कोणतेही प्रोगाम ठरवत नाही आणि आधीच ठरलेल्या कोणत्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागीही होऊ शकत नाही. दर महिन्याचं हे दुखणं कमी करायचं असेल तर प्रत्येकीने दररोज हे ५ व्यायाम केलेच पाहिजेत. (5 yogasana for every woman)
केवळ पाळीचा त्रास कमी करायचा म्हणूनच नाही तर आपल्या प्रजनन संस्थेशी संबंधित असणाऱ्या अवयवांना निरोगी ठेवायचं असेल तर रोजचा हा व्यायाम न चुकता करा, असं तज्ज्ञ सांगत आहेत. कारण प्रजनन संस्थेचा कोणताही आजार मागे लागला तर तो तुम्हाला अनेक शारिरीक त्रास निर्माण करणार. त्यामुळे अशा प्रकारच्या त्रासाचा संभाव्य धोका टाळायचा असेल तर हे काही व्यायाम अगदी आतापासूनच सुरू करा. दररोज फक्त १० मिनिटे स्वत:ला द्या आणि फिट रहा. हा उपाय इन्स्टाग्रामच्याapala.yoga या पेजवर शेअर करण्यात आला आहे. pcos, endometriosis, PMS असा त्रास तुम्हाला असेल तर हे व्यायाम करायलाच हवेत, असंही सुचविण्यात आलं आहे.
प्रत्येकीने करावे हे ५ व्यायाम
१. बटरफ्लाय
हे आसन करण्यासाठी ताठ बसा. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडा. पाय शक्य तेवढे शरीराच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी पायांचे तळवे पकडा. आता दोन्ही पाय वर- खाली, वर- खाली या पद्धतीने हलवा. असे करताना गुडघे जमिनीला टेकतील याची काळजी घ्या. हे आसन २ मिनिटांसाठी करावे.
२. बद्धकोनासन
बटरफ्लाय झाल्यानंतर त्याच अवस्थेत पाय तसेच जमिनीला टेकवा आणि १ मिनिटासाठी शांत बसा. यावेळी पाठीचा कणा ताठ हवा आणि पाय शक्य तेवढे जमिनीला टेकलेले ठेवा.
३. पुढे वाकून बद्धकोनासन
वरील बद्धकोनाची अवस्था केल्यानंतर त्याच अवस्थेत एकदा दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली वाका. कपाळ जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. ही अवस्था ३० सेकंद ते १ मिनिट टिकविण्याचा प्रयत्न करा.
४. भुजंगासन
भुजंगासन करण्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून छातीच्या दोन्ही बाजूला ठेवा. श्वास घेत घेत डोके, मान छाती वर उचलण्याचा प्रयत्न करा. ही अवस्था ३० सेकंद टिकवा.
५.धनुरासन
धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा. पाय गुडघ्यात वाकवून वर उचला डोके, मान आणि छाती उचला. दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. ३० सेकंदांपर्यंत आसन अवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा.