Join us   

१५ ते २४ वयोगटातील ७० टक्के तरुणी मासिक पाळीत वापरतात कापड, आजारांचा गंभीर धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 11:23 AM

मासिक पाळीच्या काळात आरोग्य आणि स्वच्छता यांच्यादृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे शहरी भागातील ९० टक्के महिला तर ग्रामीण भागातील ७३ टक्के महिला मासिक पाळीच्या काळात आरोग्यदायी पद्धत वापरत असल्याचे दिसते. वयात आलेल्या मुलींना मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि आरोग्यावर त्याचे होणारे परिणाम याबाबत माहिती असायला हवी.

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्यातील एक महत्त्वाचा भाग. मुलगी वयात आली की तिला सुरू होणारी मासिक पाळी रजोनिवृत्तीपर्यंत सुरू असते. दर महिन्याला येणाऱ्या या पाळीसाठी सॅनिटरी पॅड वापरले जातात असा आपला समज आहे. मात्र आजही तरुण मुलीही मासिक पाळीदरम्यान कापडाचा वापर करतात. पूर्वीच्या काळी पॅड नव्हते त्यावेळी महिला कापड वापरत असत. पण कालांतराने सॅनिटरी पॅडचा वापर वाढला आणि कापड मागे पडले असे आपल्याला वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे झाले नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार जवळपास ७० टक्के महिला आजही सॅनिटरी पॅड म्हणून कापडाचा वापर करतात. विशेष म्हणजे या महिला १५ ते २४ या वयोगटातील असल्याचे या सर्व्हेमध्ये दिसत आहे. 

(Image : Google)

उत्तर प्रदेशमध्ये (६९.४ %), आसाम (६९.१ %), छत्तीसगड (६८.६ %) तर बिहारमध्ये (६७.५ %) महिला कापडाचा वापर करतात. भारताची सरासरी आकडेवारी ५० टक्के आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मासिक पाळीच्या काळात आरोग्य आणि स्वच्छता यांच्यादृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. मात्र याबाबत पुरेशी जागृती नसल्याने किंवा आर्थिक अडचणींमुळे महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करु शकत नसल्याचे दिसते. सध्या ६४ टक्के महिला सॅनिटरी पॅड वापरतात तर ५० टक्के महिला कापडाचा वापर करतात. साधरणपणे १५ टक्के महिला स्थानिक ठिकाणी तयार होणाऱ्या नॅपकीन्सचा वापर करतात. याआधी झालेल्या सर्व्हेमध्ये ४२ टक्के महिला सॅनिटरी नॅपकीन वापरत होत्या, तर ६२ टक्के महिला कापड वापरत होत्या. त्यामुळे मागील काही वर्षांपेक्षा आताच्या संख्येत सुधारणा आहे असे म्हणायला हरकत नाही. 

शाळेत जाणाऱ्या किंवा शिक्षण घेणाऱ्या मुली मासिक पाळीदरम्यान आरोग्यदायी पद्धत वापरत असल्याचे दिसते. तर ज्या मुली शिक्षणापासून दूर आहेत त्यांच्यामध्ये मात्र याबाबतची जागरुकता नसल्याचे दिसून येते. तसेच ज्यांची अर्थिक परिस्थिती चांगली आहे ते सॅनिटरी पॅड वापरण्याचा पर्याय निवडतात मात्र ज्यांची परिस्थिती नाही ते कापडाचाच वापर करतात. शहरी भागातील ९० टक्के महिला तर ग्रामीण भागातील ७३ टक्के महिला मासिक पाळीच्या काळात आरोग्यदायी पद्धत वापरत असल्याचे दिसते. वयात आलेल्या मुलींना मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता आणि आरोग्यावर त्याचे होणारे परिणाम याबाबत माहिती असायला हवी. त्याबाबतच्या चुकीच्या संकल्पना आणि गैरसमज यांवर चर्चा व्हायला हवी. 

 

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्य